रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 18 मार्च 2024 (15:34 IST)

गुप्तहेर ते रशियाचे अनभिषिक्त सम्राट, पुतिन यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?

bladimir putin
व्लादिमीर पुतिन सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्रप्रमुख होणार आहेत. गेली सुमारे 25 वर्ष रशियाची सत्ता पुतिन यांच्याच हातात राहिली आहे. या 25 वर्षांत म्हणजे पाव शतकाच्या काळात जगात काय काय नाही घडलं? एक नवी पिढी लहानाची मोठी झाली आणि मार्गी लागली. कालगणनेचं एक नवं सहस्त्रक सुरू झालं. इंटरनेट ईमेलपासून सोशल मीडियापर्यंत विस्तारलं. जगात आर्थिक संकटं येऊन गेली. युद्ध झाली. भारतानं वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी असा प्रवास पाहिला. अमेरिकेतही चार राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. अमेरिकेनं अफगाणिस्तानात युद्ध पुकारलं आणि दोन दशकांनी अमेरिका बाहेर पडताच तालिबान पुन्हा सत्तेत आलं. सद्दाम हुसेनच्या अंतानंतर इराक, सीरिया धुमसत राहिलं, ट्युनिशिया- इजिप्तमध्ये अरब स्प्रिंगनं सत्तापालट झाले. पण रशियावर पुतिन यांची पकड आणखी घट्ट होत गेली. 1999 मध्ये आधी काळजीवाहू पंतप्रधान, मग राष्ट्राध्यक्ष, मग पंतप्रधान आणि मग पुन्हा राष्ट्राध्यक्ष या नात्यानं पुतिनच रशियाचे सत्ताधीश राहिले. आंतरराष्ट्रीय राजकारणातही पुतिन यांचा दबदबा राहिला आहे आणि त्यांच्याविषयी अनेक कहाण्या समोर येत राहतात. त्यात विरोधकांना त्यांनी कसं चिरडलं, हेही सांगितलं जातं. केजीबी या हेरगिरी करणाऱ्या रशियन संस्थेतले गुप्तहेर ते एक प्रकारे रशियाचे अनभिषिक्त सम्राट या पुतिन यांच्या प्रवासाविषयी बोलताना त्यांचे समर्थक एका माचोमॅनची प्रतिमा उभी करतात. 71 वर्षांचं वय असूनही त्यांचा फिटनेस कसा चांगला आहे, याची चर्चा होताना दिसते. हातात रायफल धरून रक्षा करणारे पुतिन.. मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅकबेल्ट होल्डर पुतिन.. बर्फाळलेल्या पाण्यात उडी मारणारे पुतिन.. हातात वाघाचे बछडे धरणारे पुतिन.. अशी त्यांची अनेक रूपं रशियातली सरकारी माध्यमं दाखवत असतात. तर दुसरीकडे पुतिन रशियात दडपशाही राबवत असल्याचा, तिथे लोकशाहीला फारसं महत्त्व दिल जात नसल्याचा आरोप त्यांचे विरोधक, विश्लेषक आणि पाश्चिमात्य देश करतात. असा आरोप करणाऱ्या काही प्रमुख विरोधकांना मिळालेली वागणूक पाहता पुतिन यांच्याविषयी वारंवार प्रश्न उभे राहतात, ज्याची उत्तरं अर्थातच अधांतरी असतात. 2024 मध्येही रशियातली निवडणूक असेच प्रश्न निर्माण करणारी ठरली. हे प्रश्न फक्त पुतिन यांच्याविषयीचे नाहीत, तर लोकशाहीच्या अस्तित्त्वाविषयीचेच प्रश्न आहेत. ते समजून घ्यायचे असतील, तर आधी पुतिन यांचा प्रवास कसा झाला, हेही पाहावं लागेल.
 
केजीबी ते रशियन राष्ट्रप्रमुख
व्लादिमीर पुतिन यांचा जन्म दुसऱ्या महायुद्धानंतर सात वर्षांनी, 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड शहरात झाला, जे आता सेंट पीटर्सबर्ग म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या जन्माआधी या शहरावर जर्मनीनं कब्जा केला होता, तेव्हा पुतिन यांचं कुटुंब कसंबसं त्यातून वाचलं. लहानपणीच्या त्या कठीण काळाचा पुतिन यांच्यावर मोठा परिणाम झाल्याचं सांगितलं जातं. लहानपणी व्लादिमीर आपल्यापेक्षा वयानं मोठ्या मुलांशी मारामारीही करत असत. लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीतून कायदा आणि अर्थशास्त्रात शिक्षण घेतल्यावर त्यांनी थेट केजीबी या रशियन गुप्तहेर संस्थेत काम करू सुरू केलं 16 वर्ष त्यांनी केजीबीमध्ये काम केलं, आणि या काळात पूर्व जर्मनीतही वास्तव्य केलं. 1989 साली पूर्व जर्मनीतलं रशिया पुरस्कृत कम्युनिस्ट सरकार कोसळलं आणि जर्मनीचं एकीकरण झालं, तेव्हा पुतिन यांनी त्या घडामोडी जवळून पाहिल्या. पुतिन तेव्हा ड्रेस्डेनमध्ये केजीबी मुख्यालयात होते. रस्त्याच्या पलीकडे पूर्व जर्मनीच्या गुप्तहेर संघटनेच्या कार्यालयावर जमावानं हल्ला केला, तेव्हा पुतिन यांनी तिथे तैनात रशियन लष्कराकडे मुख्यालयाच्या संरक्षणासाठी मागणी केली, पण ‘मॉस्कोतून आदेश आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही आणि मॉस्को गप्प आहे,’ असं उत्तर त्यांना मिळालं. पुढच्याच वर्षी पुतिन मायदेशात परतले, तेव्हा तिथे राजकीय अस्थिरता होती. तेव्हा पुतिन यांनी 16 वर्षं गुप्तहेर म्हणून काम केल्यानंतर 1991मध्ये केजीबीचा राजीनामा दिला, तो राजकारणात प्रवेशासाठीच. अगदी लवकर ते राजकारणातल्या पायऱ्या चढत गेले. पुढे 1999 मध्ये रशियाचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष आणि लोकप्रिय उदारमतवादी नेते बोरिस येल्तसिन यांनी वाढत्या वयामुळे राजकारणातून निवृत्ती घेतली, तेव्हा त्यांचे राजकीय वारसदार म्हणून व्लादिमीर पुतिन यांचं नाव आपसूकच पुढे आलं. 1999 मध्ये पुतिन आधी रशियाचे काळजीवाहू पंतप्रधान झाले आणि 2000मध्ये निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. रशियन घटनेतल्या तरतुदीनुसार कुणीही दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाही. त्याप्रमाणे 2008मध्ये पुतिन यांचा कार्यकाळ संपायला हवा होता. पण, पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं आणि ते एक पायरी उतरून पुन्हा पंतप्रधान झाले. पंतप्रधान असतानाही सगळे प्रमुख निर्णय पुतिनच घ्यायचे एवढी त्यांची पक्षावर पकड होती. पुन्हा 2012मध्ये पुतिन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मग आपला दुसरा कार्यकाळ संपत असताना 2021 मध्ये त्यांनी देशात घटनादुरुस्ती केली. राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळाची मर्यादा आठ वर्षांऐवजी सोळा वर्ष एवढी केली. 15 ते 17 मार्च 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना 87% मते मिळाल्याचा दावा त्यांच्या पक्षानं केला आहे. या निकालावरही शंका घेतली जाते आहेच. पण पुतिन यांनी आता आणखी सहा वर्षांसाठी आपणच राष्ट्राध्यक्षपदी राहणार यावर शिक्कामोर्तब केलं आहे. इतकंच नाही तर त्यापुढची म्हणजे 2030 ची निवडणूक जिंकून पुतिन आता 2036 पर्यंत सत्तेत राहू शकतात. त्यामुळे पुतिन जोसेफ स्टालिन यांना मागे टाकून नंतर सर्वाधिक काळ रशियावर राज्य करणारे नेते ठरतील. रशियाला पुन्हा ‘गतवैभव’ मिळवून देणं, हे आपलं स्वप्न असल्याचं पुतिन वारंवार सांगत आले आहेत. पण खरी परिस्थिती काय आहे?
 
पुतिन आणि रशियाची प्रतिमा
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया (तेव्हाची सोव्हिएत युनियन) या जगातल्या दोन महासत्ता होत्या. पण जर्मनीचं एकीकरण आणि सोव्हिएत युनियनचं विघटन यांमुळे हळूहळू आंतरराष्ट्रीय राजकारणातलं रशियाचं महत्त्व थोडं कमी झालं. पुतिन यांना हेच बदलायचं होतं. त्यामुळेच पश्चिम आशिया आणि युरोपातही त्यांनी काही कारवाया केल्या, ज्यामुळे रशियातली त्यांची लोकप्रियता अफाट वाढली. 1999 मध्ये झालेल्या मॉस्को बाँबस्फोटानंतर चेचन्यामधलं बंडही त्यांनी क्रूरपणे मोडून काढलं. मग चेचेन हल्लेखोरांनी बेसलानमध्ये शाळेत हल्ला केला आणि एक हजार जणांना ओलीस ठेवलं, तेव्हा रशियानं केलेल्या कारवाईतही 330 जण मारले गेले, ज्यामुळे सरकारवर टीका झाली, पण हल्लेखोरांना योग्य प्रत्युत्तर दिल्याची भावनाही अनेकांनी मांडली. कारकीर्दीच्या त्या सुरुवातीच्या काळात एकीकडे असा रक्तपात होत असताना, रशियाच्या तेलसाठ्यांच्या जोरावर तिथली अर्थव्यवस्था मात्र सुधारली. मग सीरियात बंडखोरांविरुद्ध कारवाईसाठी सीरियन सरकारला त्यांनी उत्स्फूर्त मदत केली, ज्यावर एकीकडे टीका झाली पण इस्लामिक स्टेट्सचा पाडाव करण्यात त्यांच्या लष्करी कारवाईचा हातभार लागला. क्रायमिया या प्रांताला पुतिन यांनी युक्रेनमधून पुन्हा रशियात आणलं. या सगळ्यामुळे रशियात पुतिन यांची प्रतिमा आणखी सुधारली. कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रश्न, रशिया त्वरित त्यात उतरते आणि प्रसंगी लष्करी कारवाईलाही डगमगत नाही, असा लौकिक पुतिन यांनी मिळवला. बीबीसी मॉनिटरिंगच्या ओल्गा रॉबिनसन पुतिन यांच्या वाटचालीविषयी लिहितात, “राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच व्लादिमीर पुतिन केजीबीचे अधिकारी म्हणून लोकांना माहीतच होते. त्यांची ती कारकीर्दही गाजली. पण, 1990 च्या दशकात ते राष्ट्रीय पुढारी म्हणून लोकांच्या समोर आले. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. अगदी 80% लोकांची त्यांना मान्यता होती. मॉस्कोमध्ये झालेल्या बाँबस्फोटांप्रकरणी केलेली कारवाई आणि क्रायमियात तातडीने उचललेली पावलं हा पुतिन यांचा स्वभाव लोकांना आवडला.
 
Putinफोटो स्रोत,GETTY IMAGES
ओल्गा पुढे म्हणतात, “पुतिन सतत टेलिव्हिजनवर लोकांसमोर विविध रुपात यायचे. ते दर्शनही लोकांना आवडत होतं. किंबहुना मीडियावर संपूर्ण अंकुश ठेवता आल्यामुळेच ते इतके लोकप्रिय झाले असंही काहींचं म्हणणं आहे. "काहीही असो. परदेशातही त्यांनी मान मिळवला. आणि रशियाला मिळवून दिला. विरोधकांवर विषप्रयोग आणि डोपिंग सारख्या प्रकरणांमुळे मात्र ते वादात सापडले.” युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’च्या नावाखाली पुतिन यांनी युद्ध छेडलं आणि युरोपसोबतचे त्यांचे संबंध चिघळले. पण रशियात त्यांची पकड त्यामुळे ढिली झालेली दिसत नाही. उलट ती आणखी आवळली गेली.
 
विरोधकांचा बिमोड आणि टीका
आपल्या विरोधातला आवाज बंद करण्यासाठी राजकीय विरोधकांना मारूण टाकण्याचा आरोप पुतिन यांच्यावर केला जातो. त्यासाठी केजीबीमधल्या अनुभव आणि साधनांचा वापर करून त्यांनी कधी विष-प्रयोग तर कधी पॉइंट ब्लँक गोळी मारणं अशा गोष्टी घडवून आणल्याचा आरोप केला जातो. 2024 साली पुतिन यांचे विरोधक अलेक्सी नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू झाला, तेव्हा पुतिनच त्यामागे असल्याचा आरोप नवालनी यांच्या समर्थकांनी केला. याआधी नवालनी यांच्यावर विषप्रयोगही झाला होता. फक्त नवालनीच नाही तर युक्रेन युद्धातल्या परिस्थितीवर टीका करून बंड करणारे ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचाही 2023 मध्ये विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. तर 2015 मध्ये बोरिस नेमस्तोव्ह यांची एक पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
 
खासगी आयुष्य आणि आंतरराष्ट्रीय वाद
पुतिन यांच्या खासगी आयुष्याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचं दिसतं. त्यांनी 2013 साली पत्नी लुडमिला हिला घटस्फोट दिला होता. 30 वर्ष त्यांचं लग्न टिकलं आणि या जोडप्याला दोन मुली होत्या. पुतिन यांची एक मुलगी मारिया वोरोन्सोवा नावानं ओळखली जाते आणि ती एक व्यवसाय चालवते. तर दुसरी मुलगी कॅटरिना टिखोनोव्हा एका संशोधन संस्थेची प्रमुख आहे. कॅटरिनाला अक्रोबॅटिक्समध्येही रस आहे. एरवी पुतिन यांच्या मनात काय आहे याचा थांग लागणं बहुतेक जणांना कठीणच वाटतं. ते अनेकदा लोकांकडे संशयानंच पाहतात आणि वर्षानुवर्षं सोबत असलेल्या काही मोजक्या लोकांवरच विश्वास ठेवतात. अशा लोकांवर मग पैशाची, सवलतींची बरसात होताना दिसते. पाश्चिमात्य जगातील नेत्यांचा विचार केला, तर पुतिन यांची फारशी कुणाशी मैत्री सोडाच, पण धड संवादही होत नाही असं चित्र आहे. याला जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँगेला मर्कल काही प्रमाणात अपवाद ठराव्यात. पुतिन यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, हे त्यांना उमगलं होतं. मर्कल यांनी एकदा म्हटलं होतं की, 'पुतिन वास्तवाच्या जगापासून दूर एका वेगळ्या जगात राहात असल्यासारखे वावरतात.' मर्कल यांनी पुतिन यांच्यासोबत संवाद साधण्याचा आणि वाटाघाटी करण्याचा वारंवार प्रयत्न केला होता, पण युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यावर त्या निष्कर्षावर पोहोचल्या की 'पुतिनना युरोप नष्ट करायचा आहे.' देशांतर्गत परिस्थिती पाहिली, तर पुतिन यांनी रशियातल्या मीडियावर अंकुश ठेवला आहे आणि त्यांच्या सरकारला पोषक अशाच बातम्या देण्याचा आग्रह केला जातो. त्यांच्या कार्यकाळात रशियाला खेळातही नामुष्कीला सामोरं जावं लागलं. 2015 मध्ये रशियात डोपिंग होत असल्याचं म्हणजे त्यांचे अनेक खेळाडू कामगिरी सुधारण्यासाठी प्रतिबंधित पदार्थांचं सेवन करत असल्याचं उघड झालं होतं. तेव्हा सरकारी संस्थाच अॅथलीट्सना उत्तेजक द्रव्य पुरवत होत्या आणि ते घेण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या, असंही वाडा या संस्थेच्या तपासात स्पष्ट झालं. त्यानंतर ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतली एकूण 57 मेडल रशियाला परत करावी लागली. पुतिन यांच्या कारकीर्दीला काळा बट्टा लावणारा आणखी एक वाद म्हणजे 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप केल्याचा अमेरिकेत झालेला आरोप. तेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी निवडून आल्यावर पुतिन यांना आपला मित्र म्हटलं. पुतिन यांनी हा हस्तक्षेप केला असा आरोप सिद्ध करणं कठीण असलं तरी त्याविषयीची चर्चा मात्र गेल्या आठ वर्षांत वारंवार झाली आहे. कोव्हिडच्या जागतिक साथीच्या काळातही रशियात बनणाऱ्या लशींची उपयुक्तता आणि कोव्हिडमुळे रशियात होणारे मृत्यू या गोष्टी लपवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.
 
युक्रेन युद्ध आणि जगाशी नातं
खरंतर 9/11च्या हल्ल्यांनंतर त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशनाही फोन केला होता. त्या दिवसांत रशिया आणि पाश्चिमात्य देशांचे संबंध सुधारताना दिसले. पण ही स्थिती फार काळ टिकली नाही. 2007 साली म्युनिक सुरक्षा परिषदेत त्यांचं एक वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. पुतिन म्हणाले होते, “एका देशानं (अयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं) अनेकदा आपल्या मर्यादा आणि सीमा अनेक प्रकारे मोडल्या आहेत.” स्वतः पुतिन मात्र अनेकदा रशियाच्या सीमा विस्तारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. फेब्रुवारी 2022 मध्ये पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केलं, तेव्हा एक मोठं भाषण आणि निबंधांतून त्याचं समर्थन केलं. पण पुतिन रशियाच्या सीमा विस्तारत असल्याचे, अनेक भाग गिळंकृत करत असल्याचे आरोप युक्रेन युद्धाच्याही आधीपासून होत आहेत. 2008 मध्येच पुतिन यांनी जॉर्जियातले अबखाझिया आणि साऊथ ओसेटिया हे प्रदेश लष्करी कारवाई करून ताब्यात घेतले. जॉर्जियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिखेल शाकाश्विली हे नेटो राष्ट्रगटाचं समर्थन करत असल्यानं पुतिन यांनी हे पाऊल उचललं. आर्क्टिक प्रदेशातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि सागरी मार्गांवर आणखी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशिया वारंवार करताना दिसली. मग 2014 मध्ये युक्रेनमध्ये अंतर्गत क्रांतीनंतर सत्तांतर झालं, त्यावेळी क्रायमिया युक्रेनमधून बाहेर पडून रशियात सहभागी झाला. त्यावेळी पुतिन यांनी क्रायमियाला लष्करी समर्थन पुरवलं. त्याच वेळी रशिया समर्थक गटांनी युक्रेनच्या डोनबास प्रांतावर पकड मिळवली. एकीकडे पुतिन रशिया-बेलारूस-चीन-सीरिया-इराण-व्हेनेझुएला अशी आपली वेगळी फळी उभारतानाही दिसतात. या सगळ्या गोष्टींमुळे अमेरिका आणि युरोप या पाश्चिमात्य देशांनी आणि त्यांच्या समर्थक राष्ट्रांनी पुतिन यांच्यावर वारंवार टीका केली आहे आणि त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणीही होताना दिसते. थोडक्यात, पुतिन यांनी एकविसाव्या शतकातली पहिली 24 वर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि ते कुठल्या दिशेनं जातात, यावर पुढच्या अनेक वर्षांमधल्या घडामोडी अवलंबून राहतील.
 
Published By- Dhanashri Naik