पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच, एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	इस्लामाबादमध्ये शनिवारी दुपारी 12 वाजल्यानंतर तोशाखाना प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. ही या प्रकरणातली तिसरी सुनावणी होती. त्यावेळी इम्रान खान यांचे वकील हजर झाले नव्हते. याआधीच त्यांच्या वकिलाला 12 वाजेपर्यंत हजर राहण्यासाठी कोर्टाने वेळ दिला होता. त्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे.
				  				  
	 
	कोर्टाने इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खान यांना ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर, पोलिसांनी इम्रान खान यांना त्यांच्या लाहोरमधील निवासस्थानातून अटक केली आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	इम्रान खान यांच्या अटकेनंतर लाहोरमधील यांच्या निवास्थानाभोवती मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.
				  																								
											
									  
	 
	कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनंतर इम्रान खान यांना 5 वर्षांसाठी निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरतील, असं पाकिस्तान निवडणूक आयोगाचे वकील अमजद परवेझ यांनी सांगितलं.
				  																	
									  
	 
	याआधी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने इम्रानविरुद्धच्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली होती.
				  																	
									  
	 
	इम्रान खान यांच्यावर तोशाखान्यातून ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील 'जाणूनबुजून लपविल्याचा' आरोप होता. न्यायालयात हे आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
				  																	
									  
	 
	इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने (PTI) कोर्टाचा निर्णय पक्षपाती असल्याचं म्हटलं आहे.
				  																	
									  
	 
	PTI ने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती दिली.
	 
	“सत्र न्यायालयाचा निर्णय हा राजकीय सूडाचं सर्वात वाईट उदाहरण आहे,” असं तहरीक-ए-इन्साफच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
				  																	
									  
	 
	इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे? पाकिस्तानातल्या या घडामोडींचा अर्थ समजून घेऊयात.
				  																	
									  
	 
	या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली एप्रिल 2022 मध्ये. तेव्हा अविश्वास ठरावानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचं सरकार पडलं आणि शाहबाझ शरीफ यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडी सरकार सत्तेत आलं.
				  																	
									  
	 
	त्यानंतर 11 महिन्यांच्या काळात इम्रान यांच्यावर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले आणि वेगवेगळ्या प्रकरणांत त्यांची चौकशी सुरू झाली. तोशाखाना प्रकरण त्यापैकीच एक आहे.
				  																	
									  
	 
	तोशाखाना प्रकरण काय आहे?
	तोशाखाना म्हणजे मराठीत कोषागार किंवा भांडार. हा पाकिस्तानच्या कॅबिनेटअंतर्गत येणारा विभाग आहे.
				  																	
									  
	 
	मंत्री, खासदार, अधिकारी किंवा इतर सरकारी पदावरील व्यक्तींना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची जबाबदारी या विभागाकडे असते.
				  																	
									  
	 
	यात प्रामुख्यानं इतर देशांतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
	 
				  																	
									  
	पाकिस्तानातील कायद्यानुसार कुणाला अशी भेटवस्तू मिळाली, तर ती तोशाखानात जमा करणं गरजेचं असतं.
				  																	
									  
	 
	पंतप्रधान आणि राष्ट्रपती 30 हजार पाकिस्तानी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तू स्वतःसाठी ठेवू शकतात. पण त्यापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू तोशाखानात जमा कराव्या लागतात.
				  																	
									  
	 
	यात एक पळवाटही आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याला मिळालेली महागडी भेटवस्तू स्वतःसाठी ठेवायची असेल, तर त्या वस्तूच्या किंमतीच्या काही टक्के पैसे मोजून ते ही वस्तू स्वतःसाठी ठेवू शकतात.
				  																	
									  
	 
	2001 सालच्या नियमांनुसार 15 टक्के तर 2011 सालच्या नियमांनुसार 20 टक्के रक्कम मोजून अशा भेटवस्तू ठेवता येत असत. 2018 साली ही किंमत 50 टक्के करण्यात आली.
				  																	
									  
	 
	गेल्या 21 वर्षांत सर्वच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी काही ना काही भेटवस्तू अशी किंमत मोजून स्वतःसाठी विकत घेतल्या आहेत.
				  																	
									  
	 
	यात अननस, चहा, कॉफी, बेडशीट्स अशा साध्या गोष्टींपासून, लॅपटॉप, आयफोन, सिगार बॉक्स, दागिने, महागडी घड्याळं, गाड्या आणि रायफल-बंदुकांसारख्या शस्त्रांचाही समावेश आहे.
				  																	
									  
	 
	पण इम्रान यांनी भेटवस्तू म्हणून मिळालेल्या काही घडाळ्यांची माहिती तोशाखानाला कळवली नाही, आणि पाकिस्तान इन्फर्मेशन कौंसिलने त्याविषयी विचारणा केल्यावरही त्यांनी ही माहिती लपवली, असे आरोप त्यांच्यावर आहेत.
				  																	
									  
	 
	इम्रान यांनी ही घड्याळं विकून 3.6 कोटी डॉलर्सची कमाई केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्या प्रकरणीच इम्रान यांच्याविरोधात इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं.
				  																	
									  
	 
	पण इम्रान यांच्यावर हा एकच आरोप नाही. पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तांनुसार इम्रान यांच्यावर न्यायाधीशांचा अपमान केल्याचे, निवडणूक अधिकाऱ्यांपासून माहिती लपवल्याचे आणि जमावबंदीचा आदेश मोडून सभा घेतल्याचे आरोपही लावण्यात आले आहेत.
				  																	
									  
	 
	आणि त्यांच्याविरोधात विविध कोर्टांमध्ये किमान 18 ते 20 खटले सुरू आहेत. इम्रान यांनीही इलेक्शन कमिशनविरोधात खटले दाखल केले आहेत.
				  																	
									  
	 
	एकूणच हे प्रकरण इतक्यात मिटणार नाही, हे स्पष्ट आहे.
	 
	पाकिस्तानातील घडामोडींचा काय परिणाम होईल?
				  																	
									  
	इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ अर्थात पीटीआय पक्षाच्या समर्थकांचा आरोप आहे की पोलीस त्यांना जाणूनबुजून त्रास देत आहेत. इम्रान यांच्यावर राजकीय विरोधातून आरोप होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
				  																	
									  
	 
	तर पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब म्हणतायत की पीटीआय समर्थक अराजकता पसरवत असून, देशाला गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवत आहेत.
				  																	
									  
	 
	या सगळ्या परिस्थितीविषयी राजकीय विश्लेषक हसन असकारी रिझवी यांनी बीबीसीशी बोलताना चिंता व्यक्त केली आहे.
				  																	
									  
	 
	ते सांगतात, “पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. पाकिस्तानात राजकारण आणि कायदा सुव्यवस्था वाईट आहे. अशात एकच अंदाज लावता येतो की येत्या काही दिवसांत हे संकट आणखी गहिरं होईल, अफरातफरी आणि अशांततेचं वातावरण राहील.”
				  																	
									  
	 
	हसन रिझवी यांना वाटतं की “या परिस्थितीत IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) सोबत सुरू असलेली बोलणी फिसकटू शकते, ज्यानं आणखी नाराजी पसरेल आणि राजकीय वातावरण आणखी तंग होईल. पाकिस्तानात नेमकं काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही.”
				  																	
									  
	 
	एक मात्र नक्की, हा पाकिस्तानच्या इतिहासातला एक निर्णायक क्षण असू शकतो. या घटनेनं पाकिस्तानच्या राजकारणाची दिशा ठरू शकते आणि त्यात सैन्याची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. दक्षिण आशियातल्या शांततेवरच या घडामोडींचा परिणाम होऊ शकतो.
				  																	
									  
	 
Published By- Priya dixit