Imran Khan: इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार ,इस्लामाबाद पोलीस लाहोरला रवाना
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानाबाहेर चिलखती पोलिसांची वाहने आली. दरम्यान, इस्लामाबादमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना अटक करण्याच्या उद्देशाने पोलीस तेथे पोहोचले होते. पीटीआयचे कार्यकर्ते इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर जमू लागले आहेत.
एका महिला दंडाधिकाऱ्याला संबोधित करताना धमकी दिल्याप्रकरणी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी आणि इस्लामाबाद पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध धमकीची भाषा वापरल्याबद्दल सोमवारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.
तोशाखाना प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल आणि गेल्या वर्षी एका सार्वजनिक सभेत एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी अटक वॉरंट बजावण्यात आले होते. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जफर इक्बाल यांनी तोशाखाना प्रकरणाची सुनावणी केली आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी पोलिसांना माजी पंतप्रधानांना अटक करून न्यायाधीशांना धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यास सांगितले होते. तोशाखाना प्रकरणात 18 मार्चला आणि न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी इम्रानला 21 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.
Edited By - Priya Dixit