शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (16:07 IST)

लॉसिओ आर्टोबिया: 'जनतेच्या हिता'साठी बॅंक लुटून क्रांतिकारकांना पैसे पुरवणारा बंडखोर

"मी जनतेच्या हितासाठी बँक लुटली. याला चोरी म्हणता येणार नाही कारण, आपण जेव्हा एखाद्या गरिबाला लुबडतो तेव्हा त्याला चोरी म्हटलं जातं. जो एखाद्या चोराला लुटतो त्याला माफी मिळायला हवी आणि जो व्यक्ती बँक लुटतो त्याचा तर सन्मान व्हायला हवा."
 
लॉसिओ आर्टोबियासाठी बँक लुटणे म्हणजे एक प्रकारचं क्रांतिकारक काम होतं. पण ही लूटमार स्वतःच्या फायद्यासाठी न करता सामाजिक हित समोर ठेऊन केली असेल तरच तिला क्रांतिकारी लेबल लावता येईल, असं लॉसिओचं म्हणणं होतं. लोसिओने जगातल्या कित्येक बँकांना आपल्या तालावर नाचवलं आहे.
 
लॉसिओ आर्टोबियाची ओळख एक चांगले अनार्किस्ट म्हणजेच अराजकतावादी अशी होती. त्यांच्यासाठी कायदा आणि नैतिकतेमध्ये धूसर अशी रेषा होती.
 
दिवसा मजूर म्हणून काम करणारे लॉसिओ रात्रीच्या अंधारात दरोडेखोर म्हणून काम करायचे. अशिक्षित असलेलं हे व्यक्तिमत्त्व आयुष्याच्या शेवटापर्यंत 'बंडखोर'च राहिलं.
 
दरोडेखोर, कथित अपहरणकर्ता आणि तस्कर अशी ओळख असणारे लॉसिओ आर्टोबिया, 1980 च्या दशकात जगातील मोस्ट वाँटेड लोकांपैकी एक होते.
 
लॉसिओच्या हाताखाली किमान डझनभर लोक काम करायचे. त्यांनी त्यावेळची जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या नॅशनल सिटी बँकचे अनेक ट्रॅव्हलर्स चेक बनवून गंडा घालण्यात यश मिळवलं होतं.
 
पण या घोटाळ्यात नेमका किती पैसा लुटला गेला याची काही मोजदाद लागलीच नाही. पण खुद्द लॉसिओने सांगितल्याप्रमाणे, जवळपास 20 मिलियन अमेरिकन डॉलरची लूट करण्यात आली होती. हा सर्व पैसा लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील सरकारांविरुद्ध गनिमी काव्याने लढणाऱ्या गटांना आर्थिक मदतीत दिला गेला.
 
असं म्हटलं जातं की, या दरोड्यांमुळे ब्लॅक पँथर्सचा हेड आल्ड्रिच क्लेव्हरला पळून जाण्यास मदत झाली. आणि याच पैशांची मदत घेऊन बोलिव्हियातील नाझी क्लॉस बार्बीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला.
 
आता या सगळ्या गोष्टी किती खऱ्या आहेत आणि यातलं किती खोटं आहे हे माहीत नाही, पण या सगळ्यात लॉसिओ आर्टोबियाची गोष्ट एखाद्या फिल्मी स्क्रिप्टपेक्षा काही कमी नाही.
 
त्यांनी स्वतः म्हटलं होतं की, गनिमी कारवायांच्या रणनीतींबद्दल त्यांनी स्वतः चे-ग्वेराशी चर्चा केली होती.
 
फिल्मी लाईफ
 
लॉसिओ आर्टोबियाचा जन्म 1931 मध्ये कास्केंट शहरातील एका कुटुंबात झाला. त्यांच्या आत्मचरित्रात ते लिहितात की, "माझ्या लहानपणी ज्या गोष्टींवर प्रतिबंध होता त्या गोष्टींची मी कधीच आदर केला नाही. जेव्हा केव्हा मला एखाद्या गोष्टीची गरज पडायची तेव्हा ती गोष्ट मिळवण्यासाठी मला जे जे योग्य वाटायचं ते ते मी करायचो."
 
उदाहरण म्हणून बघायचं झालंच तर, ते लहान असताना त्यांच्या शहरात असलेल्या चर्चसमोरच्या तलावात तेव्हाचे श्रीमंत लोक श्रद्धेपोटी काही पैसे टाकायचे. लॉसिओ ते पैसे चोरायला मागे पुढे पाहायचे नाहीत.
 
ते लोकांच्या बागेतील फळं चोरायचे. थोडक्यात जगण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व काम करायचे.
 
अशा छोट्या मोठ्या चोऱ्यांनंतर त्यांनी सीमेवर होणाऱ्या तस्करीच्या कामात रस घेतला. ते त्यांच्या भावासोबत तंबाखू, औषधे आणि दारूची तस्करी करायचे.
 
पण ते जेव्हा तारुण्यात आले, तेव्हा मात्र त्यांना सैन्यात भरती व्हावं लागलं. कारण त्याकाळी सैन्यात लष्करी सेवा देणं अनिवार्य होतं. आता सैन्यात भरती झाल्यामुळे लष्कराच्या गोदामांपर्यंत पोहोचणं सोपं होतं, त्यांच्यासाठी आता एक नवं जग खुलं झालं होतं.
 
आता त्यांनी सैनिकांचे बूट, शर्ट, घड्याळे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरायला सुरुवात केली. हे सगळं सामान ते कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून त्याची तस्करी करायचे.
 
काही दिवसातच या चोरीची माहिती सैन्याला मिळाली. पण अटक होण्यापूर्वीच लॉसिओ तिथून निसटले आणि त्यांनी फ्रान्स गाठलं. नाहीतर त्यांना एकतर तुरुंगाची हवा खावी लागली असती, नाहीतर त्यांना फायरिंग स्क्वाड समोर उभं केलं असतं.
 
ते फ्रान्सला पोहोचले खरे पण आता अडचण अशी होती की त्यांना फ्रेंच भाषेतलं अक्षरही कळत नव्हतं. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की, "मी फ्रान्समध्ये आलो तेव्हा मला कशाचीही माहिती नव्हती." पण लवकरच ते एका कंस्ट्रक्शन कंपनीत कामाला लागले आणि ह्यात असेपर्यंत तेच काम करत राहिले.
 
ते म्हणायचे, "कामामुळे ज्याची ओळख होते तोच खरा माणूस आहे. मलाही माझ्या कामातून मोक्ष मिळालाय."
पण त्यांचं खरं रूप लपवून ठेवण्यामागे याच कामाचा हातभार होता. आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या दरोड्यांमध्ये एखादया अशिक्षित मजुराचा सहभाग असू शकतो याची कोणाला कल्पनाच आली नाही.
 
हा तो काळ होता जेव्हा फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये हजारो स्पॅनिश कम्युनिस्ट, अराजकतावादी, समाजवादी आणि बंडखोर आश्रयाला यायचे.
 
पण जेमतेम वाचू शकणार्‍या लॉसिओला राजकारणाचं कोणतंही ट्रेनिंग मिळालं नव्हतं. ते त्यांच्या आठवणींमध्ये लिहितात की, "एकदा एका मित्राने त्यांना विचारलं की, तुझे राजकीय विचार काय आहेत? तू कोण आहेस?"
 
यावर लॉसिओ म्हणाले की ते कम्युनिस्ट आहेत. कारण फॅसिझमला विरोध करणारे सर्वच जण कम्युनिस्ट असतात असं त्यांना वाटायचं.
 
त्यांच्या या उत्तरावर त्यांचा मित्र हसला आणि म्हणाला, "काय गंमत आहे! तू कम्युनिस्ट बनायला चालला आहेस पण तू अनार्किस्ट आहेस."
 
राजकीय चेतना
लॉसिओने हा शब्द त्यांच्या वडिलांकडून ऐकला होता. एकदा त्यांचे वडील रागात असताना म्हणाले होते की, "जर मी पुन्हा जन्माला आलो तर अनार्किस्ट म्हणून जन्माला येईन."
 
ही त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात होती. "इथूनच माझ्यासाठी सत्याची सुरुवात झाली आणि हेच खरं स्वातंत्र्य होतं."
 
त्यांनी काही फ्रेंच कोर्सेस शिकण्यासाठी लिबर्टेरियन युथमध्ये आपल्या नावाची नोंद केली. त्यामुळे त्यांचं पॅरिसच्या सीन मार्थ भागात येणजाणं वाढलं. याच भागात नोबेल पारितोषिक विजेते अल्बर्ट कॅमोस आणि इतर प्रसिद्ध लोक राहायचे.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या फ्रेंच भाषेच्या शाळांनी त्यांच्यासाठी शिक्षणाची दारं बंद केली होती, तीच दारं त्यांच्यासाठी थियेटर ग्रुप्सच्या माध्यमातून उघडी झाली.
 
एकदा सीएनटीच्या सेक्रेटरीने त्यांच्याकडे मदत मागताना विचारलं की, "तुमच्याकडे एक अपार्टमेंट असल्याचं आमच्या ऐकिवात आहे. सध्या आमच्या एका मित्राला राहण्याची सोय हवीय. त्याची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही त्याची मदत करू शकाल का?."
 
या मित्राचं नाव होतं कावाको साबती. हा कावाको कॅटालोनियामध्ये असताना फ्रेंच विरोधी गटांमध्ये सामील झाला होता. स्पेनमधील मोस्ट 'वॉन्टेड' लोकांमध्ये त्याचं नाव अग्रक्रमावर होतं. बर्नार्ड थॉमसच्या मते, लॉसिओवर त्याचा खूप प्रभाव होता. ते त्याला अनार्किजमचा गुरु म्हणायचे.
 
लॉसिओने कावाकोला लपायला मदत केली होती. जेव्हा त्याला अटक झाली आणि तो सहा महिन्यांच्या शिक्षेसाठी तुरुंगात गेला तेव्हा त्याच्याकडे थॉमसन मशीनगन आणि पिस्तूल सापडलं होतं.
 
याच हत्यारांच्या साहाय्याने लॉसिओने पहिल्यांदा बँक लुटली होती. या लुटीच्या धंद्याला ते जप्ती म्हणायचे. कारण राज्य जेव्हा एखाद्याची मालमत्ता ताब्यात घेतं तेव्हा त्याला जप्ती म्हणतात.
 
पहिल्या बँकेच्या लुटीचा किस्सा..
त्याकाळात लॉसिओ खूप मेहनत मोलमजुरी करून आठवड्याला 50 फ्रँक कमवायचे. पण एका चोरीनंतर त्यांनी 16 मिनिटांत लाखो फ्रँक कमावले होते. पहिल्या चोरीनंतर त्यांनी आणखीन बँका लुटायला सुरुवात केली. पण त्यांनी कंस्ट्रक्शन काम कधी सोडलं नाही. ही लुटीची रक्कम क्रांतिकारी कामासाठी वापरली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.
 
त्या काळात सिक्युरिटी कॅमेरे नसल्यामुळे बँक लुटणं तसं सोपं होतं. पण त्यांना हे काम आवडायचं नाही कारण या कामात कोणीतरी जखमी होण्याची भीती असायची. त्यांनी एका मुलाखतीमध्ये चेहऱ्यावरचे भाव न बदलता सांगितलं होतं की, "पहिल्यांदा बँक लुटायला गेल्यावर भीतीने माझी पॅंट ओली झाली होती."
 
पुढे त्यांनी थॉमसन मशीनगन ऐवजी एक प्रिंटिंग प्रेस विकत घेतली.
 
प्रिंटिंग प्रेस अनार्किस्ट लोकांसाठी मोठं हत्यार होतं.
 
प्रिंटिंग मध्ये काम करत असताना त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने बनावट स्पॅनिश ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यास सुरुवात केली. या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून लोकांना इतर देशात पळून जायला मदत मिळायची.
 
त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की, "या व्यवसायामुळे गाड्या भाड्याने घेणं, बँकेत अकाऊंट काढणं, प्रवासी कागदपत्रे तयार करणं सोपं झालं होतं. शिवाय यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत नव्हते. यामुळे जे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद होते ते सुद्धा खुले झाले."
 
कागदपत्रांनंतर त्यांनी त्यांचा मोर्चा करन्सी नोटकडे वळवला. लॉसिओने अमेरिकन डॉलरची एक चांगली कॉपी तयार केली होती. ते सांगायचे, "आम्ही याआधी जी काही कामं केली होती त्या तुलनेत डॉलरची कॉपी बनवणं सोपं होतं."
 
पण या नोटा बनवण्यासाठी सर्वात अवघड गोष्ट होती ती म्हणजे कागद आणणं. यासाठी त्यांनी अमेरिकेच्या विरोधक देशांची मदत घ्यायचं ठरवलं. लॉसिओने पॅरिसमधील क्युबन राजदूताशी संपर्क साधला. जेणेकरुन त्यांना पॅरिस विमानतळावरून जात असलेल्या चे ग्वेराला भेटता येईल. पण ही बैठक झाली की नाही हे सांगणं कठीण आहे.
 
क्युबन क्रांतीमुळे अनार्किस्ट, कम्युनिस्ट आणि भांडवलशाहीला विरोध असणारे अनेकजण प्रभावित झाले होते. इतिहासकार ऑस्कर फ्रॅन हर्नांडेझ यांच्या मते, त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते क्युबन दूतावासाच्या संपर्कात असण्याची शक्यता होती. पण चे ग्वेरा त्यांना भेटले की नाही हे सांगता येणार नाही.
 
लॉसिओ उत्साही होते आणि त्यांच्याकडे एक साधीसोपी योजना होती. त्यानुसार, क्युबा लाखो डॉलरची छपाई करून ते डॉलर्स बाजारात आणेल, यातून अमेरिकन डॉलर रसातळाला जाईल. पण या बनावट नोटा तयार करण्यासाठी ज्या प्लेट्स लागणार होत्या त्या देण्याचं काम लॉसिओ यांच्यावर येऊन पडलं.
 
लॉसिओने केलेल्या दाव्याप्रमाणे, त्यावेळी चे ग्वेरा क्युबाचे अर्थमंत्री होते आणि त्यांना या प्रकरणावर हवी तेवढी स्पष्टता मिळत नव्हती. त्यामुळे लॉसिओला याचं वाईट वाटलं.
 
त्यांच्या मते, आपल्याच करन्सी नोटची नकली कॉपी कोणी तयार करू नये. कारण असा गुन्हा केल्यास 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली जात होती.
 
लॉसिओ त्यांच्या पुस्तकात लिहितात, "म्हणूनच आम्ही ट्रॅव्हलर्स चेक तयार करायचं ठरवलं. याची कॉपी केल्यास फक्त पाच वर्षांची शिक्षा व्हायची."
 
ट्रॅव्हलर्स चेक देऊन एका बँकेतून 30,000 फ्रँक खरेदी करण्यासाठी ते ब्रुसेल्सच्या ट्रेनमध्ये चढले. त्यावेळी नॅशनल सिटी बँक ही जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक होती.
 
नकली चेक तयार करणं काही सोपं काम नव्हतं. त्यांनी 100 डॉलर्सच्या 25 चेक्सच्या 8,000 शीट्स बनवल्या. लॉसिओच्या वेगवेगळ्या टीमने बँकेत जाऊन त्यावेळी सुमारे दोन कोटी डॉलर्स काढले.
 
त्यावेळी युरोपातील वेगवेगळ्या शहरात आपली टीम पाठवून चेक कॅश मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचे. हे चेक वठवताना त्यावरचे नंबर चोरले जायचे.
 
त्या पैशांचं पुढे काय व्हायचं?
इतिहासकार ऑस्कर फ्रेन हर्नांडेझ सांगतात की, "त्यांनी नेमके किती पैसे चोरले, या पैशांचं काय केलं आणि कोणाला, कुठे पाठवले? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत." पण या पैशांतून ते स्वतः श्रीमंत झाले हे म्हणणं चुकीचं आहे.
 
लॉसिओ आर्टोबिया आणि त्यांचे सहकारी सांगतात त्याप्रमाणे, त्या पैशाचा वापर लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना आणि सशस्त्र गटांना वित्तपुरवठा करण्यासाठी केला गेला.
 
हर्नांडेझच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेची कारणं, गुप्तचर संशोधन आणि पोलिस स्रोतांच्या अनुपलब्धतेमुळे ही लिस्ट अस्तित्वात नाहीये. "त्यामुळे लॉसिओच्या आत्मकथेत त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यांचे कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत."
 
लॉसिओला हिंसाचाराचा तिटकारा होता. त्यामुळेच त्यांनी बँकांची लूट करणं सोडून दिलं. या लुटीत कोणीतरी मारलं जाईल, जखमी होईल अशी भीती त्यांना सतत वाटत राहायची. पण त्यांनी लुटलेले पैसे स्पेनमधील सशस्त्र गट असलेल्या ईटीएला मदत स्वरूपात देण्यात आले. आणि विशेष म्हणजे लॉसिओचा यावर कोणताही आक्षेप नव्हता.
 
लॉसिओने 2015 मध्ये एका स्पॅनिश टीव्ही कार्यक्रमात याचं समर्थन करताना म्हटलं होतं की, त्यांच्या बालपणात आणि तारुण्यात त्यांच्यावर अन्याय झाला होता. "माझ्या मनात स्पेन आणि नॉर्वेविषयी तिरस्कार होता, कारण मी माझं आयुष्य भीतीच्या छायेत घालवलं होतं. त्यामुळे ज्यांनी याविरोधात हत्यारे उचलली होती, त्यांना माझा पाठिंबा होता."
 
पण त्यांच्या या विरोधाचाही बळी गेला होता.
 
बऱ्याच ठिकाणी बनावट ट्रॅव्हलर्स चेक पकडण्यात आले. फर्स्ट नॅशनल सिटी बँकेने हे चेक स्विकारण्यावर बंदी आणल्याने खळबळ उडाली. ज्या लोकांनी हे चेक खरेदी केले होते त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत.
 
खरेदीदार हे सर्व चेक्स 30 टक्के कमी किंमतीत विकत घेईल अशी ऑफर लॉसिओला त्यांच्या एका मित्राने दिली होती.
 
पण जून 1980 मध्ये लॉसिओला अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली.
 
रोलँड डोमास हे त्यांचे वकील होते, ते नंतर फ्रान्सचे अर्थमंत्री झाले. लॉसिओ सांगतात की, "हे पैसे आमच्यासाठी नव्हते हे आम्हाला लगेच समजलं. ते पैसे खरं तर राजकारणासाठी होते. बनावट ट्रॅव्हलर्सचे चेक बनवून ते सिस्टीम मध्ये फिरवल्याने सरकार कमकुवत होईल असं आम्हाला वाटायचं."
 
डोमासचे स्पेनशी राजनैतिक संबंध असल्याने त्यांनी लॉसिओला ईटीएशी संपर्क करण्यात मदत करावी असं सांगितलं. त्यांनी स्पॅनिश राजकारणी हावियर रोपेरेज यांचं अपहरण केलं होतं.
 
31 दिवसांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1981 मध्ये सशस्त्र टोळ्यांनी स्पेनमधील ऑस्ट्रियन आणि एल साल्वाडोर दूतावासातील कर्मचाऱ्यांचं अपहरण केल्यावरही लॉसिओचीच मदत घ्यावी लागली.
 
फर्स्ट नॅशनल सिटी बँकेचे नंतर काय झालं?
खटला सुरू असताना लॉसिओ सुमारे सहा महिने तुरुंगात होते. या काळात पोलिसांना कोणत्याही प्रिंटिंग प्लेट्स सापडल्या नाहीत. आणि जोपर्यंत या प्लेट्स बनावट नोटा बनवणाऱ्यांकडे होत्या तोपर्यंत ही मूळ समस्या सुटणार नव्हती.
 
शेवटी वाटाघाटी करण्यासाठी बँका कशाबशा तयार झाल्या. फ्रेंच पंतप्रधानांचे सल्लागार आणि वकील असलेल्या थियरी फगार्ट यांनी लॉसिओची भेट घेतली. त्यांनीच बँकेच्या वकिलांना वाटाघाटीसाठी तयार केलं.
 
फागार्ट सांगतात, "बँकेच्या कारभारासाठी या गोष्टी हानिकारक असल्याने त्या तात्काळ थांबवाव्या असं फर्स्ट नॅशनल सिटी बँकेच्या वकिलांचं म्हणणं होतं. आणि या प्रकरणात बरेचसे लोक तुरुंगात गेले होते."
 
"पण मूळ समस्या सुटली नव्हती. त्यामुळे सिटीबँक आणि लॉसिओच्या वकिलांनी वाटाघाटीतून ही समस्या सोडवण्याचा विचार केला. यामागे लॉसिओ मास्टरमाईंड होते हे सर्वांनाच माहीत होतं."
 
फगार्ट सांगतात, ज्या बँकेतून लॉसिओ आणि त्यांच्या साथीदारांनी लाखो डॉलर्सची चोरी केली होती, त्या बँकेने या सर्वांवरचे आरोप मागे घेतले होते. त्या बदल्यात बँकेला पॅरिसमधील एका लॉकर मध्ये लपवलेल्या प्लेट्स मिळाल्या."
 
यासंबंधीत डॉक्युमेंटरी मध्ये वकील सांगतात की, बँकेचे कर्मचारी उपस्थित असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत हा व्यवहार पार पडला. एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल असं हे दृश्य होतं. फगार्टच्या सांगतात त्याप्रमाणे, सेटलमेंटचा भाग म्हणून बँकेने त्यांना ब्रीफकेसमध्ये मोठी रक्कम दिली.
 
लॉसिओच्या म्हणण्यानुसार, चार कोटी फ्रँकमध्ये ही डील पार पडली होती, त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. पण यातला एकही पैसा त्यांनी स्वतः जवळ ठेवला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
क्रांती करण्याचा विचार सोडून कुटुंबासाठी वेळ..
बीबीसीने या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी बँकेशी संपर्क साधला होता, मात्र बँकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
 
लॉसिओने पन्नाशी गाठली होती. आता त्यांनी क्रांतीकारी आयुष्य सोडून आपला उरलेला वेळ कुटुंबासाठी द्यायचं ठरवलं. ते पुन्हा पॅरिसजवळ मजूर म्हणून काम करू लागले.
 
इतिहासकार हर्नांडेझ म्हणतात, "अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कधीच माहिती होत नाहीत, त्या आहे त्या स्वरूपात स्वीकाराव्या लागतात."
 
"पण यात विशेष असं काही असेल तर, एक व्यक्ती दुसऱ्या देशातून येतो, त्याच्या जवळ ना राजकीय पाठिंबा असतो ना राजकीय चेतना. फ्रान्समध्ये येऊन तो अनार्किस्ट होतो आणि नंतर अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे व्हीलन असतानाही तो हीरो ठरतो."
 
2020 साली लॉसिओने जगाचा निरोप घेतला. त्यांनी त्यांच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की, मी गुन्हेगारी विश्वाला कधीच रामराम ठोकला नव्हता. कधी कधी तर मला माझ्या स्वतःच्या अनुभवांवरच विश्वास बसत नाही."
 
Published By- Priya Dixit