शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (20:28 IST)

इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली आहे का? पाकिस्तानात आता काय होईल?

तीन महिन्यांत दोनदा अटक. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांच्यावरच्या कायदेशीर कारवाईमुळे चर्चेत आहेत.तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक इम्रान यांना अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील.
 
मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात.
 
अटकेनंतरही शांतता
खरंतर अटकेनंतर घरी बसून राहू नका, शांततेत निषेध व्यक्त करा या त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही.
 
सरकारचा दावा आहे की, लोकांना इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ अर्थात पीटीआय या पक्षासोबत जायचं नाहीये.
 
तर तज्ज्ञांच्या मते यामागे वेगळी कारणं आहेत.
 
इम्रान सत्तेत आले, तेव्हा पाकिस्तानातल्या एस्टॅब्लिशमेंटचा म्हणजे लष्कर आणि गुप्तहेर संस्थेतील लोकांचा पाठिंबा लाभला होता.
 
पण या दोन्हींसोबतचं त्यांचं नातं बिघडत गेलं, तसं त्यांना सत्ताही गमवावी लागली असं काही जाणकार सांगतात.
 
इम्रान पंतप्रधानपदी असतानाच हे नातं बिघडत गेलं होतं. पण पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट न पाहता, त्यांनी पाकिस्तानी लष्करावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली.
 
मे महिन्यात त्यांच्या अटकेनंतर समर्थकांनी लष्कराच्या इमारतींवरही हल्ला केला होता.
 
प्रत्युत्तर म्हणून लष्करानं त्यातल्या हजारो समर्थकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर मिलिट्री कोर्टात कारवाई केली.
 
मानवाधिकार संघटनांनी याला विरोध केला. पण या कारवाईनं इम्रान यांच्या पक्षाचा कणाच मोडला आहे.
 
पाकिस्तानी मीडियातील काहींनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार लष्करानं इम्रान खान यांच्याविषयीच्या बातम्यांवरही निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला होता.
 
या सगळ्या प्रकारामुळे खान यांच्या काही पाठिराख्यांनीही सोशल मीडियावर इम्रान खान यांच्याविषयी लिहिणं, पाहणं, बोलणं बंद केलं.
5 ऑगस्टला इम्रान यांना अटक झाली, त्यानंतर सरकारनं म्हटलं होतं की शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ते अटक करणार नाहीत.
 
पण इम्रान यांच्या घराबाहेर जमलेल्या समर्थकांना पोलिसांनी पकडून नेल्याचं बीबीसी उर्दूच्या पत्रकारांनी पाहिलं. या समर्थकांना अटक झाली होती की नुसतंच ताब्यात घेतलं होतं, हे स्पष्ट नाही.
 
नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिस अधिकाऱ्यांनी बीबीसीला माहिती दिली आहे की त्यांनी पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाच्या शंभर समर्थकांना अटक केली आहे. कुठेही इम्रान यांचे समर्थक एकत्र जमा होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
इम्रान यांचं पुढे काय होईल?
वॉशिंग्टनच्या विल्सन सेंटर थिंक टँकमध्ये दक्षिण आशिया विभागाचे संचालक मायकल कुगलमन सांगतात, “9 मे रोजीच्या आंदोलनानंतर जे पडसाद उमटले, ते पाहिल्यावर इम्रान यांच्या पाठिराख्यांना सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालायचा नाही आहे. येत्या काही काळात ते रस्त्यावर उतरतील की मतदानातच याचं प्रतिबिंब पडेल हा प्रश्नच आहे”
 
इम्रान यांच्याविरोधात वेगवेगळ्या कोर्टांमध्ये अनेक खटले सुरू आहेत आणि त्यातल्या काही खटल्यांत इम्रान यांना दिलासा मिळवून देण्यात वकिलांना यश आलं आहे.
 
आताही त्यांची टीम कारावासाच्या शिक्षेविरोधात कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. पण पुढे काय होईल हे सांगता येणार नाही.
 
इम्रान यांची शिक्षा कायम राहिली आणि ते कुठलीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरले, तर त्यांच्या पक्षाचं काय होईल हा मोठा प्रश्नच आहे.
 
इम्रान यांच्या पक्षाचं काय होईल?
कोर्टात कारवाईला सामोरं जावं लागलेले इम्रान खान हे एकटेच पाकिस्तानी पंतप्रधान नाहीत. अलीकडच्या काळात नवाझ शरीफ, बेनझीर भुट्टो आणि लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्यावरही काही ना काही कारवाई झाली होती.
राजकीय विश्लेषक झैनब समनताश सांगतात, “नवाझ शरीफ यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी संघर्ष सुरु ठेवला. पण इम्रान खानना घराणेशाही मंजूर नाही, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत पक्षाची धुरा कोण सांभाळेल हा प्रश्नच आहे.”
 
पीटीआय पक्षाचे अध्यक्ष परवेझ इलाही आधीच अटकेत आहेत. त्यामुळे इम्रान यांच्या गैरहजेरीत पक्षाचे व्हाईस चेयरमन शाह महमूद क़ुरैशी नेतृत्त्व करत आहेत.
 
पण इम्रान यांच्या बाजूनं आणि लष्कराविरोधात मोठं आंदोलन उभारणं त्यांना जमेल का याविषयी राजकीय विश्लेषक सलमान गनी यांना शंका वाटते.
 
ते सांगतात, “पाकिस्तानातले राजकारणी पक्षाला चालना देत नाही, तर केवळ नेता म्हणून आपली छबी मोठी करण्यावर भर देतात. त्यामुळे इम्रान यांचा पर्याय केवळ इम्रान खानच आहेत. त्यांच्या गैरहजेरीत पीटीआय पक्षाकडे असा कुणी नेता नाही ज्याच्यात नेतृत्त्वाची क्षमता किंवा पक्षाच्या समर्थकांना जोडून ठेवण्याची ताकद असेल.”
 
इम्रान खान यांच्या पहिल्या अटकेनंतरच्या काळात त्यांच्या पक्षातले अनेक वरिष्ठ राजकीय नेते एकतर पक्ष सोडून गेले आहेत, अटकेच्या सावटाखाली आहेत किंवा दडी मारून बसले आहेत. त्यामुळे यातून सावरणं इम्रान यांच्यासाठी सध्यातरी कठीण दिसतंय.
 
राजकीय विश्लेषक डॉ. हसन अस्कारी रिझवी सांगतात की काही काळासाठी पीटीआय पक्ष संकटात सापडला आहे आणि इम्रान यांची शिक्षा कायम राहिली तर काही काळासाठी तो बाजूलाही पडू शकतो. पण म्हणजे इम्रान खान यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत झाला, असं म्हणता येणार नाही असंही ते सांगतात.
 
“इम्रान यांची व्होट बँक त्यांच्या सोबत राहील आणि ती वाढूही शकते. इतिहासात याआधी असं घडलं आहे.
 
“1985 साली जनरल झिया सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकून राहणं अशक्य वाटत होतं. पनामा पेपर्स प्रकरणी नवाझ शरीफ यांना अयोग्य ठरवण्यात आलं, तेव्हा पीएमएल-एन पक्षावरही हीच वेळ आली होती.
 
“पण या देशात सत्तेत असलेले लोक अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या नावाखाली राजकीय प्रतिस्पर्ध्यांना राजकारणापासून दूर करतात तेव्हा अनेकदा त्यांचे फासे उलटे पडताना दिसतात.”
 














Published by- Priya Dixit