सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (21:54 IST)

किम जाँग उन : अलीशान ट्रेन, स्पेशल विमान, संडास असलेली कार, कोट्यवधींची यॉट आणि बरंच काही...

उत्तर कोरियाचे शासक किम जाँग उन 12 सप्टेंबरला सकाळी रशियाला पोहोचले. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार रशियाचं बंदर असणाऱ्या व्लादिवोस्तॉक शहरात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील.
 
दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने बातमी दिली आहे की किम ज्या हत्यारबंद ट्रेनने परदेशी दौरे करतात ती प्योंगयांगमधून निघाली आहे.
 
पुतीन आणि किम जाँग उन यांची भेट 12 सप्टेंबरला होऊ शकते. क्रेमलिननेही (रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय आणि निवासस्थान) किम रशियात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
जर किम आणि पुतीन यांची भेट झाली तर उत्तर कोरियाच्या या नेत्यांचा हा गेल्या चार वर्षांतला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असेल.
 
कोव्हिड साथीनंतरचा हा त्यांचा पहिला दौरा असेल.
 
रशियाला का गेले आहेत किम जाँग उन?
एका अमेरिकेन अधिकाऱ्याने बीबीसीचे अमेरिकन पार्टनर सीबीएस या न्यूज चॅनलशी बोलताना म्हटलं की पुतीन आणि किम युक्रेन युद्धासाठी शस्त्रांचा सौदा होऊ शकतो.
 
किम 2019 साली जो परदेश दौरा केला होता तेव्हाही ते रशियालाच गेले होते.
 
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी अण्वस्त्र नष्ट करण्याच्या चर्चा विफल झाल्यानंतर ते रशियाला गेले होते.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी आधी म्हटलं होतं की रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनीही नुकताच उत्तर कोरिया दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर कोरियाने रशियाला तोफगोळे आणि इतर शस्त्रास्त्र विकावेत यासाठी प्रयत्न केले.
 
असं म्हटलं जातंय की रशियाला 122 मिमी आणि 152 मिमी तोफगोळ्यांची गरज आहे. त्यांच्याकडे या तोफगोळ्यांचा साठा कमी आहे. पण उत्तर कोरियाने आपल्या शस्त्रांस्त्रांबद्दल नेहमीच गुप्तता बाळगली आहे. ते पाहाता रशियाची मागणी पूर्ण करणं त्यांच्यासाठी सोपं नाही.
 
किम जाँग उन यांचा रशिया दौरा
किम जाँग उन रशियाला हवाई मार्गाने नाही तर ट्रेनने गेलेत. असं म्हटलं जातंय की या ट्रेनमध्ये कमीत कमी 20 बुलेटप्रुफ कार ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही ट्रेन इतर ट्रेन्सच्या तुलनेच जड आहे.
 
त्यामुळे ही ट्रेन ताशी 59 किमीपेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाही. त्यामुळे व्लादिवोस्तोक शहरापर्यंत पोचण्यासाठी त्यांना एक संपूर्ण दिवस लागला. हा प्रवास 1180 किलोमीटरचा आहे.
 
या ट्रेनच्या वेगाची तुलना केली तर लंडनच्या हायस्पीड ट्रेनचा वेग ताशी 200 किमी आहे तर जपानच्या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 320 किमी आहे.
 
या ट्रेनचं नाव ताईयांघो आहे. कोरियन भाषेत या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. हा शब्द उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्यासाठीही वापरला जातो.
 
परदेशात जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास करण्याची प्रथा किम जोंग उन यांचे आजोबा किम इल सुंग यांनी सुरू केली होती. ते व्हिएतनाम आणि पूर्व आशियातल्या देशांमध्ये आपल्या ट्रेनमधून जायचे.
 
या आलिशान ट्रेनच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने जवान तैनात असतात. ते ट्रेनच्या मार्गावर आणि त्यामध्ये येणाऱ्या स्टेशन्सवर तपासणी करत असतात.
 
किम जाँग उनचे पिता किम जाँग इल यांनी उत्तर कोरियावर 1994 ते 2011 पर्यंत शासन केलं. त्यांना हवाई प्रवासाची भीती वाटायची. त्यामुळे ते ट्रेनने प्रवास करायचे.
 
किम जाँग इल यांच्या कार्यकाळात तीन स्वरुपाच्या ट्रेन धावत असत. अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था असलेली एक ट्रेन, किम प्रवास करत असलेली एक ट्रेन आणि तिसऱ्या ट्रेनमध्ये अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात असे.
 
त्यांनी 2001 साली मॉस्कोचा 10 दिवसांचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात रशियन सैन्य कमांडर कॉन्स्टँटिन पुलिकोव्स्की किम जाँग इल यांच्यासोबत होते. त्यांनी आपल्या आठवणी ‘ओरिएंट एक्स्प्रेस’ या पुस्तकात लिहिल्या आहेत.
 
ते लिहितात, “या ट्रेनमध्ये रशियन, फ्रेंच, चिनी, कोरियन कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ मागवता यायचे. पुतीनच्या खाजगी ट्रेनमध्येही या ट्रेनसारख्या सोयी नव्हत्या.”
 
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार 2011 साली एका दौऱ्यात हार्ट एटॅकमुळे किम जोंग इल यांचा मृत्यू झाला.
 
दक्षिण कोरियात 2009 मध्ये ‘चोसुन इलबो’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार किम जाँग यांच्यासाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित असलेले 90 डबे होते.
 
पिवळ्या पट्ट्याच्या या हिरव्या ट्रेनमध्ये कॉन्फरन्स रूम, दर्शक कक्ष आणि बेडरूम आहेत. या ट्रेनमध्ये सॅटलाईट फोन आणि टीव्हीही लावलेले आहेत.
 
किम जाँग उन यांचं खाजगी जेट
या ट्रेन व्यतिरिक्त किम इतर आलिशान साधनांनी फिरताना आढळून आलेले आहेत. उत्तर कोरियातले बहुतांश लोक गरीब आहे त्या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास चटकन लक्षात येतो.
 
किम यांनी स्वित्झरलँडच्या निवासी शाळेत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि त्यामुळे विमानाने फिरणं त्यांच्यासाठी नवी गोष्ट नाहीये.
 
त्यांनी सत्तेत आल्यानंतर 2018 साली आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चीनमध्ये केला होता. ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटायला डेलियन या शहरात गेले होते. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ते उत्तर कोरियात दौऱ्यावर जाताना आपल्या खाजगी जेट विमानाने जातात.
 
ज्या विमानाने ते चीनला गेले होते ते विमान रशियात बनलं होतं.
 
किम यांच्या या खाजगी जेटमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा दिलेल्या आहेत. यात काम करताना आणि मीटिंग घेताना त्यांचे फोटो प्रसारित होत राहातात. याच विमानाने किम यांची बहीण किम यो जोंग यांनी 2018 साली ऑलिम्पिकच्या एका उच्च प्रतिनिधी मंडळासोबत दक्षिण कोरियाचा दौरा केला होता.
 
दक्षिण कोरियातली माध्यमसंस्था योनहपनुसार या विमानाची ओळख त्याच्या ‘PRK-615’ या क्रमांकाने होते. हा क्रमांक या दोन्ही देशांमध्ये 2000 साली 15 जूनला जो करार झाला त्याचं प्रतिक म्हणून वापरला जातो अशी एक अटकळ आहे.
 
किम जाँग उन यांच्या आलिशान गाड्या
किम यांनी 2018 साली चीनची राजधानी बिजिंगचा दौरा केला होता. पण एकदा या शहरात आल्यानंतर त्यांनी फिरण्यासाठी आपली आवडती गाडी मर्सिडिज बेंझ – एस क्लास वापरली होती.
 
दक्षिण कोरियातलं वृत्तपत्र ‘जोंगअंग इल्बो’ नुसार ही गाडी खास ट्रेनमधून आणण्यात आली होती. या बातमीनुसार 2010 मध्ये बनलेल्या या गाडीची किंमत जवळपास 1.8 मिलियन डॉलर आहे.
किम यांची ही आवडती गाडी पनमुनजोम शहरात 2018 साली झालेल्या आंतर-कोरियाई शिखर परिषदेतही दिसली. यावेळी त्यांनी आपल्या अंगरक्षकांसह सीमा पार केली होती.
 
त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात एक टॉयलेट कारही आहे. या कारमध्ये खास पद्धतीने तयार केलेलं बाथरूम आहे.
 
रहस्यमय नावेचा मालक कोण?
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांमध्ये किम जाँग उन यांचे फोटो प्रसिद्ध होत असतात. या फोटोंमध्ये ते होड्यांमध्ये, पाणबुडीत, बसमध्ये, स्की लिफ्टमध्ये दिसलेले आहेत. पण परदेशात मात्र ते असं काही करताना दिसलेले नाहीत.
 
सरकारी माध्यमांनी मे 2013 मध्ये सैन्याच्या अखत्यारित येणाऱ्या एका मासे पकडणाऱ्या धक्क्यावर किम फिरत असतानाचे फोटो प्रकाशित केले. एसके न्यूजला त्यांच्या मागे एक मोठी नाव दिसली होती.
 
ही रहस्यमयी नाव कोणाच्या मालकीची आहे याबदद्ल नीट माहिती समोर आली नाही पण या नावेची किंमत जवळपास सात मिलीयन डॉलर आहे.
 
आता प्रश्न असा आहे की आलिशान गोष्टी उत्तर कोरियाला निर्यात करण्यावर अनेक निर्बंध आहेत. असं असताना ही आलिशान नाव तिथे कशी पोचली? या नावेची प्रचंड किंमत पाहून किम जाँग उनच याचे मालक असतील असा होरा आंतरराष्ट्रीय संस्थांचा आहे.
 
सन 2015 मध्ये वॉशिंग्टनच्या रेडियो फ्री एशियाने म्हटलं की एका संशोधकाने दक्षिण प्योंग प्रांतात एका नदीकिनारी असलेल्या किम यांच्या घरात एक हेलिपॅड शोधून काढलं होतं.
 
हा संशोधक यूएस कोरिया इंस्टिट्युट ऑफ जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ अडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजमध्ये काम करत होता. त्यांचं म्हणणं होतं की या हेलिपॅडचा वापर किम, त्यांचं कुटुंब आणि इतर पाहुणे करतात.
 

















Published By- Priya Dixit