India vs Sri Lanka 2023: आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहितने सांगितले की, ही खेळपट्टी कालच्या तुलनेत कोरडी दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेलही हा सामना खेळत आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारतीय संघ आज सलग तिसऱ्या दिवशी मैदानात उतरणार आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना रविवारी दुपारी सुरू झाला, जो सोमवारी रात्री संपला. यानंतर टीम इंडियाला आज (मंगळवारी) श्रीलंकेसोबत सामना खेळायचा आहे. श्रीलंकेतील उष्ण आणि दमट वातावरणात सतत क्रिकेट खेळणे कठीण आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी सोमवारी रात्री 19 षटके टाकली होती आणि आता पुन्हा आज त्यांना किमान 30 षटके टाकावी लागणार आहेत. भारतीय खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक असू शकते.
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर आहे. बीसीसीआयने एक अपडेट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला. मार्चमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. आरोग्य अपडेट जारी करताना बीसीसीआयने लिहिले- श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे, मात्र पाठीच्या दुखण्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आज श्रीलंकेविरुद्ध भारताच्या सुपर-4 सामन्यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही.
भारतीय संघाने सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय (228 धावा) मिळवला. अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. आता भारताला श्रीलंका किंवा बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकावा लागेल आणि टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल.
श्रीलंकेने सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा २१ धावांनी पराभव केला होता. या रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने अप्रतिम गोलंदाजी करत अखेरच्या षटकांमध्ये श्रीलंकेचा संघ विजयी झाला. आता श्रीलंका भारताविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलाल्गे, महेश टेकश्ना, कसून राजिता, मथिशा पाथिराना.
Edited by - Priya Dixit