हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार आहेत. इस्लामाबादस्थित परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई आणि पत्नीची भेट होणार आहे. ही भेट दुपारी 12.30 वाजता असेल.
कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाकिस्तानकडून केवळ 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. यावेळी भारताचे उप-उच्चायुक्त जे पी सिंह सुद्धा उपस्थित असतील.
मानवतेच्या दृष्टीकोनातून कुलभूषण यांना आई आणि पत्नीला भेटण्यास परवानगी दिल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. या भेटीबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी अधिकृतरित्या सांगितले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांची आई आणि पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.