गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (16:36 IST)

पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली 670 लोक दबल्याची भीती

land slide
संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनात सुमारे 670 लोक गाडले गेल्याचा अंदाज आहे.पापुआ न्यू गिनीमधील स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख, सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितलं की, "पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतात शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे सुरुवातीला या घटनेत जेवढं नुकसान होईल असं वाटलं होतं त्याहीपेक्षा जास्त भीषण परिणाम झाले आहेत."
 
सेरहन अक्टोप्राक म्हणले की, "सुमारे 150 पेक्षा जास्त घरं ढिगाऱ्याखाली दबली आहेत."
 
दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरात असणाऱ्या या देशातील एन्गा प्रांतात डोंगराळ प्रदेशात ही घटना घडली आहे.
 
अक्टोप्राक म्हणाले की, "जमीन अजूनही सरकत असल्याने" बचावकर्त्यांनासुद्धा धोका आहे. तसंच, ते पुढे म्हणाले की, पाणी वाहत आहे आणि यामुळे सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
भूस्खलनाचा फटका बसलेल्या भागात जवळपास 4 हजार लोक राहतात.
 
मदतकार्यात सहभागी असलेल्या केअर ऑस्ट्रेलिया या मानवतावादी संस्थेने मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता वयात केली आहे. कारण आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे या भागात येऊन राहिलेल्या निर्वासितांची संख्या अधिक आहे.
या आपत्तीमुळे किमान 1,000 लोक बेघर झाले आहेत. सेरहन अक्टोप्राक म्हणाले की या घटनेमुळे शेतं वाहून गेली आहेत. पाण्याचे स्रोत नष्ट झाले आहेत.
 
पापुआ न्यू गिनीमधली ही घटना शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 03:00 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी लोक झोपेत असण्याची शक्यता जास्त होती.
 
अक्टोप्राक म्हणाले की ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले जात आहेत. "लोक मातीखाली दफन केलेले मृतदेह काढण्यासाठी काठ्या, कुदळ, मोठे शेतीची अवजारं वापरत आहेत."
 
रविवारपर्यंत, या ठिकाणी पाच मृतदेह सापडले होते यासोबतच इतर काही मृतदेहांचे तुकडे देखील बाहेर काढण्यात आले आहेत.
 
भूस्खलनामुळे वाहून आलेल्या ढिगाऱ्यात मोठंमोठे दगड, झाडं आणि माती आहे. काही भागात 8 मीटर (26 फूट) पर्यंत हा गाळ साचलेला आहे.
 
एन्गा प्रांतात फक्त एकच महामार्ग आहे आणि केअर ऑस्ट्रेलियाने सांगितले की, रस्त्याच्या मोठ्या भागांवर मलबा पडला होता, ज्यामुळे घटनास्थळावर जाण्यास अडचणी येत होत्या.
 
एएफपी या वृत्तसंस्थेने सांगितलं की, रविवारी मोठी यंत्रसामग्री इथे मदतीसाठी येणं अपेक्षित आहे.
 
Published By- Priya Dixit