रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (12:57 IST)

अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाने आखली योजना

मागील दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेले नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांना पुढील वर्षीच्या म्हणजे 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात अंतराळातून पृथ्वीवर परत आणलं जाईल.
नासाने जाहीर केलंय की, हे दोन्ही अंतराळवीर ज्या बोईंग स्टारलायनर अंतराळयानातून अंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) वर गेले, ते यान आता त्यांच्याविनाच परतणार आहे.
 
या दोन अंतराळवीरांनी गेल्या 5 जूनला अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केलं होतं. त्यांची ही मोहिम 8 दिवसांची असणार होती. मात्र, आता त्यांना तब्बल 8 महिने अंतराळात थांबावं लागणार आहे.
स्टारलायनर हे अंतराळयान जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजवळ पोहोचले, तेव्हा त्यात बिघाड होऊन त्याचे 5 थ्रस्टर्स बंद पडले. हे थ्रस्टर्स यानाला दिशा देण्याचं काम करतात.
 
या यानातील हेलियम गॅसही संपल्यामुळे यानाला ज्वलनशील इंधनावर अवलंबून राहावं लागलं.
नासाने आपल्या अंतराळविरांना अंतराळात नेण्यासाठी बोईंग आणि स्पेस एक्स या कंपन्यांना कमर्शियल फ्लाईट्साठी कोट्यवधी डॉलरचं कंत्राट दिलं आहे.बोईंगला 4.2 अब्ज डॉलर तर एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीला 2.6 अब्ज डॉलरचे कंत्राट मिळाले आहे.
 
स्पेस एक्समध्ये दोन सीट्स रिकाम्या राहतील
आतापर्यंत स्पेस एक्स या कंपनीने माणसांना घेऊन 9 अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. मात्र, यावेळी पाठवले जाणारे बोईंग यान हे मानवरहीत असेल.
 
बोईंग आणि नासाच्या वैज्ञानिकांनी स्टारलायनर या अंतराळयानातील तांत्रिक बिघाड समजून घेण्यासाठी खूप वेळ घालवला आहे.त्यांनी आतापर्यंत पृथ्वीवर आणि अंतराळातही अनेक तपासण्या केल्या, डेटा एकत्र केला. त्यांना समस्येच्या मुळापर्यंत पोहोचून स्टारलायनर यानातूनच दोन्ही अंतराळवीरांना परत आणता येईल अशी आशा होती.
 
शनिवारी एका पत्रकार परिषदेत नासाचे संचालक बिल नेल्सन यांनी सांगितलं की, अवकाशात अडकलेल्या अंतराळयानात तांत्रिक सुधारणा करण्यासाठी नासा आणि बोईंग एकत्र मिळून काम करत आहेत.
ते म्हणाले की, "अंतराळात मोहिम आखणे हे जोखमीचे काम आहे. भलेही हे सर्वात सुरक्षित किंवा सवयीचं उड्डाण असेल, मात्र जेव्हा एखाद्या टेस्ट फ्लाईटचा विषय असतो तेव्हा ना ते सुरक्षित असतं ना सवयीचं. सुरक्षितता हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि तेच आमचं मार्गदर्शक तत्वही आहे."

आता फेब्रुवारी 2025 पर्यंत दोन्ही अंतराळवीरांचा अंतराळ स्टेशनवरील मुक्काम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून ते स्पेस एक्सच्या क्रु ड्रॅगन स्पेसक्राफ्टने परत येऊ शकतील.
या कालवधीत स्पेस एक्सला आपले पुढील यान लाँच करण्यास वेळ मिळेल. जे सप्टेंबरच्या शेवटी लॉंच केलं जाईल.सुरुवातीला या यानातून 4 जण जाणार होते. मात्र आता अंतराळ स्थानकापर्यंत केवळ दोघेच जातील.
जेणेकरून या यानात सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासाठी जागा राहील. पुढील वर्षात फेब्रुवारीत जेव्हा हे यान पृथ्वीवर परतेल तेव्हा हे दोन्ही अंतराळवीर त्यातून परत येतील.

क्रू विनाच परतेल स्टारलायनर विमान'
नासाने जाहीर केले आहे की, हे दोन्ही अंतराळ प्रवासी याआधीही दोन वेळा दीर्घकाळ अंतराळात राहिलेले आहेत. टेस्ट फ्लाईटशी संबंधीत जोखीम त्यांना माहित आहे. दीर्घकाळ अंतराळात राहावे लागणे हा देखील त्याचाच एक भाग आहे. नासाने सांगितले की, 58 वर्षीय सुनिता विल्यम्स आणि 61 वर्षीय विल्मोर यांनी आपल्या परतीच्या योजनेचे पूर्णत: समर्थन केले आहे. पुढील काही महिने ते अंतराळ स्थानकात संशोधन, अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीचे काम आणि कदाचित स्पेसवॉकही करतील.
 
अंतराळयानातील तांत्रिक बिघाडांमुळे बोईंग स्टायलायनरला याआधीही अनेक वर्ष विलंब लागलेला आहे.
याआधीच्या मानवरहित मोहिमेदरम्यानसुध्दा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता.
 
एक प्रसिद्धीपत्रकात बोईंगने सांगितले की, क्रू आणि अंतराळयानाची सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करण्यावर आमचा भर आहे. तसेच, आम्ही नासाने आखलेल्या मोहिमेची अंमलबजावणी करत असून सुरक्षित आणि यशस्वी मानवरहित यानासह परतण्याचा आमचा प्रयत्न असेल.
 
स्टारलायनरमध्ये नेमका काय बिघाड झाला होता ?
स्टारलायनर यान पाठवले तेव्हा त्यातून एका ठिकाणाहून सूक्ष्म स्वरूपात हेलियम गॅसची गळती सुरू झाली होती. अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत आणखी दोन ठिकाणाहून गळती सुरू झाली.
 
लॉंचिंगवेळी ही गळती सूक्ष्म प्रमाणात होती. मात्र, दुसऱ्या ठिकाणी झालेली गळती 5 पट अधिक होती.
यान अंतराळस्थानकाकडे जात असतानाच 28 मॅन्युअरिंग थ्रस्टर बंद पडले. ज्यापैकी 4 पुन्हा सुरू झाले. त्यानंतर प्रोपल्शन सिस्टिमद्वारे हेलियम गळती झाल्याचे निदर्शनास आले.
पृथ्वीवर केलेल्या तपासणीत कळले की, अति उष्णतेमुळे टेफ्लॉन सील फुलले आणि थ्रस्टरची समस्या उद्भवली होती. ज्यामुळे इंधन कंबशन चेंबरमध्ये जाऊ शकले नाही.
बोईंगचे मार्क नापी यांनी सांगितले की, ही समस्या केवळ मानवयुक्त फ्लाईट टेस्टमध्ये निदर्शनास येऊ शकते.काही वैज्ञानिकांचं मत आहे की, ही समस्या मानवरहित टेस्ट मिशन किंवा यान डिझाईन करतेवेळीच लक्षात येऊ शकते.
 
बोईंग यांनाची ही काही पहिलीच समस्या नाही.
बोईंगचे पहिले मानवरहित उड्डाण 2019 मध्ये करण्यात आले होते, त्यावेळीही सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने ते इंजन सुरू होऊ शकले नाही आणि यान अंतराळस्थानकापर्यंत पोहोचू शकले नव्हते.
तर दुसरा प्रयत्न 2022 मध्ये करण्यात आला होता. परंतु यानात पुन्हा थ्रस्टर आणि कुलींग सिस्टीम बिघाड झाला होता.
यादरम्यान बोईंगचे प्रतिस्पर्धी एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सने चार वर्षांपूर्वी ड्रॅगन स्पेसक्राफ्ट या यानाला अंतराळस्थानकापर्यंत पोहोचवलं होतं. तेव्हापासून ते यान अंतराळयात्रींच्या सामानाची ने-आण करत आहे.
आणि हे सगळं तेव्हापासून घडतंय जेव्हापासून बोईंनच्या पृथ्वीवर उडणाऱ्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाडाबाबत होणाऱ्या चौकशा वाढल्या होत्या.
आता हे निश्चित होत आहे की, लाँचपॅड बनविण्यासाठी बोईंग स्टारलायनरला एक लांबचा पल्ला गाठावा लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)
Published By- Priya Dixit