रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जून 2024 (15:36 IST)

चंद्राच्या दुर्गम भागावर यान उतरवल्याचा चीनचा दावा, खडकाचे नमुने घेऊन परतणार

china flag
चीनच्या मानवविरहित यानानं चंद्रावर दुर्गम भागात यशस्वीरित्या लँडिंग केलं असल्याचा दावा केला आहे. चंद्राच्या ज्या भागात कोणी यान पाठवत नाही अशा ठिकाणी हे यान उतरल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
चीनमधील राष्ट्रीय अंतराळ व्यवस्थापनानं (CNSA) दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील प्रमाण वेळेनुसार रविवारी सकाळी 06.23 वाजता (GMT प्रमाणवेळेनुसार शनिवारी 22.23 वाजता) चँग ए-6 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एटकेन बेसिनमध्ये उतरलं.
 
3 मे रोजी ही मोहीम लाँच करण्यात आली होती. या भागातील मौल्यवान खडकाचा भाग आणि माती गोळा करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. इतिहासात प्रथमच अशाप्रकारची मोहीम राबवण्यात आली आहे, असं चीनने म्हटलं आहे.
 
या यानातील प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या सर्वात जुन्या खडकातून काही नमुने गोळा करू शकतं.
 
या यानाचं लँडिंग करणं कठीण असल्यानं मोठं आव्हान होतं. कारण अशा प्रकारेच चंद्राच्या दुर्गम भागात पोहोचल्यानंतर यानाशी संपर्क साधणं अत्यंत कठीण असतं.
 
यापूर्वी हे यश मिळवणारा चीन एकमेव देश आहे. त्यांनी 2019 मध्ये त्यांचं चँग ई-4 ची यशस्वी लँडिंग केलं होतं.
 
चीनमधील वेनचँग स्पेस लाँच सेंटरमधून प्रक्षेपण केल्यानंतर चँग ए-6 यान उतरण्यापूर्वी चंद्राच्या कक्षेत फिरत उतरण्याची प्रतीक्षा करत होतं.
 
त्यानंतर यानातील लँडरचा भाग ऑर्बिटरपासून वेगळा झाला आणि चंद्राच्या या दुर्मिळ भागावर त्याचं लँडिंग झालं. ज्या भागात लँडिंग झालं, तो भाग कायम पृथ्वीपासून दूर राहिलेला आहे.
 
या संपूर्ण प्रक्रियेबाबत चीनमधील सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनं सीएनएसएच्या हवाल्यानं माहिती दिली.
 
यान चंद्राच्या दिशेनं लँडिंगसाठी खाली सरकत असताना मार्गात असलेल्या अडथळ्यांबाबत माहिती मिळण्यासाठी एक स्वयंचलत यंत्रणा वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उजेड आणि अंधाराची माहिती मिळण्यासाठी एक कॅमेरा लावण्यात आला होता. त्यामुळं चंद्राच्या पृष्ठभागावर नेमकं कुठं लँडिंग करावी यासाठी त्याद्वारे मदत मिळाली.
 
चंद्रावर लँडिंगसाठी सुरक्षित असलेल्या ठिकाणापासून अंदाजे 100 मीटर वर काही काळ लँडरनं घिरट्या घातल्या आणि लेझर 3D स्कॅनरचा वापर करून ते हळूवारपणे खालच्या दिशेला आलं.
 
या मोहिमेसाठी क्युकिआओ-2 या उपग्रहाद्वारे मदत पुरवण्यात आली होती, अशी माहिती CNSA नं दिली.
या यानाचं लँडर जवळपास तीन दिवस चंद्राच्या या भागात राहून त्याठिकाणच्या वेगवेगळ्य घटकांचे नमुने गोळा करणार आहे. या मोहिमेमध्ये अभियांत्रिकेतील नावीन्य, मोठा धोका आणि अनेक कठीण बाबींचा समावेश होता, असं CNSA नं म्हटलं.
 
"कदाचित आजवर कोणीही पाहिले नाही, अशा खडकाचे नमुने आम्हाला पाहायला मिळण्याची शक्यता असल्यानं सर्वांमध्येच खूप उत्साह आहे," असं युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमध्ये चंद्र भूविज्ञानाचे विशेषज्ञ प्राध्यापक जॉन पर्नेट-फिशर यांनी सांगितलं.
 
अमेरिकेच्या अपोलो मोहिमेच्या वेळी आणि चीनच्या आधीच्या मोहिमांमधून आणलेल्या दगडांचंही त्यांनी विश्लेषण केलं आहे.
 
पण चंद्राच्या आजवर समोर न आलेल्या भागातील खडकाच्या नमुन्याच्या अभ्यासामुळं उपग्रहांची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले.
 
आतापर्यंत समोर आलेले खडक हे प्रामुख्यानं ज्वालामुखीपासून तयार झालेले आहेत. आइसलँड किंवा हवाईमध्ये अशाप्रकारचे खडक आढळतात.
 
पण चंद्राच्या या दुर्गम भागातील खडकामध्ये वेगळ्याप्रकारचे रासायनिक घटक आढळू शकतात.
 
"यामुळं ग्रहांची निर्मिती कशी होते? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आवरण कसं तयार होतं? सौरमंडळात पाण्याची उत्पत्ती कशी झाली ? अशा अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरं यातून मिळू शकतात," असं प्राध्यापक म्हणाले.
या मोहिमेमध्ये ड्रील आणि मॅकेनिकल आर्मचा वापर करून खडक आणि मातीचे जवळपास 2 किलो नमुने गोळा करण्याचा उद्देश असल्याचं सीएनएसएनं सांगितलं.
 
दक्षिण ध्रुवावरील एटकेन बेसिन हा खड्डा हा सौरमंडळामध्ये ज्ञात असलेल्या सर्वांत मोठ्या खड्ड्यांपैकी एक आहे.
 
त्याठिकाणाहून प्रोबद्वारे चंद्राचा आतील भाग म्हणजे ज्याठिकाणी चंद्राचं केंद्र आहे त्या ठिकाणातून नमुने गोळा केले जाऊ शकतात, असं प्राध्यापक पर्नेट फिशर म्हणाले.
 
चंद्राचा दक्षिण ध्रुव हा चांद्र मोहिमांसाठीचा पुढचा टप्पा आहे. याठिकाणी बर्फ असण्याची शक्यता असल्यानं देशांना या भागाबाबत अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता आहे.
 
याठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेबाबत पुरावे आढळल्यास संशोधनासाठी याठिकाणी मानवी तळ उभारण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढतील.
 
ही मोहीम यशस्वी झाली तर, एका विशेष कॅप्सुलमध्ये याठिकाणचे नमुने गोळा करून ते परत पृथ्वीवर येईल.
 
या नमुन्यांतील साहित्य मूळ स्थितीत राहावं म्हणून त्याला विशेष प्रकारे जतन केलं जाईल.
 
या खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्याची पहिली संधी चीनच्या शास्त्रज्ञांना दिली जाईल. त्यानंतर जगातील इतर संशोधकांना त्यासाठी अर्ज करता येईल.
 
चीननं चंद्रावरून नमुने गोळा करण्याच्या उद्देशानं आखलेली ही दुसरी चांद्रमोहीम आहे.
 
2020 मध्ये चँग ई-5 या मोहिमेत ओशेनस प्रोसेरम या चंद्राच्या जवळच्या भागातून 1.7 किलोचे नमुने आणले होते.
 
चीननं चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी पाण्याचा शोध घेण्याच्या उद्देशानं या दशकात आणखी तीन मानवविरहीत चंद्रमोहीमांचे उद्दीष्ट ठेवले आहे.
 
2030 पर्यंत चीनच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याचा व्यापक दृष्टीकोन त्यामागं आहे.
 
अमेरिकेनंही 2026 मध्ये त्यांच्या आर्टेमिस 3 मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
 
Published By- Priya Dixit