रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , बुधवार, 13 डिसेंबर 2017 (09:14 IST)

पाकिस्तानचे न्यायाधीश भारतापेक्षा जास्त तटस्थ

कर्जबुडवेप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मद्यउद्योजक विजय मल्ल्याने भारतीय न्यायव्यवस्थेच्या तटस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय आणि प्रसारमाध्यमे निष्पक्ष नाहीत. भारतापेक्षा पाकिस्तानमधील न्यायाधीश अधिक तटस्थ आहेत, असे मल्ल्याच्या वकिलांनी म्हटले आहे.
 
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. याबद्दल लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी मल्ल्याचे वकील मल्ल्याचे वकील क्‍लारे मॉन्टगोमरी आणि डॉ. मार्टिन लाऊ यांनी वेस्टमिन्स्टर न्यायालयात हा आरोप केला. यासोबतच भारतीय न्यायव्यवस्था, न्यायाधीश आणि प्रसारमाध्यमांच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले.
 
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश सरकारच्या बाजूने निर्णय देतात. निवृत्तीनंतर सरकारकडून एखादे चांगले पद मिळावे, हा त्यामागील हेतू असतो. भारतातील न्यायव्यवस्था अतिशय भ्रष्ट आहे,’ असेही मल्ल्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. “भारतात विजय मल्ल्या यांच्या विरोधात माध्यमांकडून “मीडिया ट्रायल’ सुरु आहे. त्यामुळे भारतात मल्ल्या यांच्या विरोधातील खटला निष्पक्षपणे चालवला जाणार नाही,’ असेही वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले.
 
काही खटल्यांमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या न्यायाधीशांनी सरकारच्या बाजूने निर्णय दिले आहेत. सरकारकडून चांगले पद मिळावे, यासाठी न्यायाधीश सरकारच्या बाजूने निकाल देतात. हे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे, असे मल्ल्याचे वकील डॉ. लाऊ यांनी न्यायालयाला सांगितले.
 
मल्ल्याने देशातील विविध बॅंकांचे 9 हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्याच्यावर कर्जाची रक्कम थकवणे, फसवणूक करणे असे आरोप आहेत. भारतातून पळून गेलेला मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.