काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्तीचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कठोर केले जात आहेत.
दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलमध्ये कोणत्याही कार्यक्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आपल्या लसीकरणाचा किंवा कोव्हिड निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
वय वर्षं 3 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी हा नियम लागू असेल, असं इस्रायल प्रशासनाने म्हटलं आहे.
देशातील रेस्टॉरंट, कॅफे, म्यूझियम, लायब्ररी, जिम, स्विमिंग पूल यांसारख्या ठिकाणी ग्रीन पास सिस्टिम लागू करण्यात आली आहे.
पण, दुकानं किंवा मॉलमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही.
इस्रायलमध्ये जगाच्या तुलनेत सर्वाधिक लसीकरण झालेलं असलं तरी अजूनही कोव्हिडसंदर्भात युद्धजन्य परिस्थिती कायम आहे, असं देशातील कोव्हिड प्रतिबंधनाचं काम करणाऱ्या पथकाने म्हटलं.
दैनिक जेरुसलेम पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे, अशी माहिती सलमान झारका यांनी संसदीय समितीला बुधवारी दिली.
या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये येत्या 6 सप्टेंबर रोजी रोश हॅशानाह म्हणजेच ज्यू नववर्षाच्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता बळावते, असा इशारा झारका यांनी दिला आहे.
परिस्थिती न सुधारल्यास आपल्याला पूर्वीप्रमाणे लॉकडाऊन लागू करावा लागेल. आपल्या घराबाहेर 100 मीटरपेक्षा जास्त अंतरापलिकडे नागरिकांना जाता येणार नाही, असे निर्बंध लावले जाऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं.
इस्रायलमध्ये जून महिन्यापासून सर्वाधिक संसर्गजन्य अशा डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढला आहे.
मंगळवारी (17 ऑगस्ट) इस्राईलमध्ये 7 हजार 870 कोरोना रुग्ण आढळून आले. तर सोमवारी (16 ऑगस्ट) ही संख्या 8 हजार 752 इतकी होती.
गेल्या आठवड्यात कोरोनामुळे 120 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर 600 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
इस्रायलमधील कोरोना निर्बंध जून महिन्याच्या मध्यात शिथिल करण्यात आले होते. पण वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध पुन्हा कडक केले जाऊ शकतात.
त्यासाठी ग्रीन पास यंत्रणा राबवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. बुधवारपूर्वी 12 वर्षांच्या वरील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी ग्रीन पास दाखवण्याची आवश्यकता होती.
आता ही वयोमर्यादा घटवून 3 वर आणली आहे. 3 ते 11 वयोगटातील मुलं लस घेण्यास अद्याप पात्र नसल्याने त्यांच्या कोरोना चाचणीचा खर्च सरकारकडूनच केला जातोय. पाच वर्षांखालील बालकांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचं तिथं मानलं जाता आहे.
पात्र असूनही लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी वेगळे नियम आहेत. इस्रायलमध्ये अद्याप सुमारे 10 लाख नागरिकांनी पात्र असूनही लस न घेतल्याचं दिसून आलं आहे. या नागरिकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 11 टक्क्यांपर्यंत आहे. अशा नागरिकांच्या कोरोना चाचणीचा खर्च त्यांनी स्वतः करायचा आहे, असं इस्रायल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
इस्रायलने नागरिकांना सध्या कोरोना लशीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. 50 वर्षांवरील नागरिकांना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसंच सहव्याधी असलेल्या नागरिकांना फायजर लशीचा तिसरा डोस देण्यात येत आहे.
आतापर्यंत सुमारे 11 लाख नागरिकांनी लशीचा बुस्टर डोस घेतलेला आहे.