शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मार्च 2023 (14:49 IST)

Philippines Ferry Fire: फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना, बोटीला आग लागून बर्‍याच जणांचा होरपळून मृत्यू

Philippines Ferry Fire: फिलिपाइन्समध्ये एका बोटीला लागलेल्या आगीमुळे 31 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवर जवळपास 261 लोक होते, त्यापैकी 230 जणांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
 
आपत्ती अधिकारी निक्सन अलोन्झो यांनी सांगितले की, लेडी मेरी जॉय 3 ही बोट बुधवारी मिंडानाओ बेटावरील सुलू प्रांतातील जोलो बेटावर झांबोआंगा शहरातून जात होती. दरम्यान, बोटीला अचानक आग लागली. या घटनेनंतर बोटीवरील अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या.
 
फिलिपाइन्स कोस्ट गार्ड आणि मच्छिमारांसह बचाव कर्मचार्‍यांनी 195 प्रवासी आणि 35 क्रू मेंबर्सची सुटका केली. बेसिलानचे गव्हर्नर जिम सुलीमन यांनी सांगितले की, बोटीच्या प्राथमिक शोधात 18 मृतदेह सापडले आहेत. नंतर मृतांचा आकडा वाढला. 
 
आगीच्या कारणाबाबत माहिती नाही
आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही. बासिलानचे गव्हर्नर म्हणाले की, वाचलेल्यांना झांबोआंगा आणि बासिलान येथे नेण्यात आले आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 
 
तटरक्षक दलाने जारी केलेल्या प्रतिमांमध्ये जळत्या जहाजावर पाण्याची फवारणी होत असल्याचे दिसून आले आहे. जवळपास, काही तटरक्षक लहान बोटींचा वापर करून पाण्यात उडी मारलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसतात.