शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (08:37 IST)

विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असान्ज यांची मुक्तता

court
वर्षभराच्या कायदेशीर लढाईनंतर विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असान्ज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकीलीक्सने म्हटलंय. यानुसार असान्ज युकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल.
 
राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीची माहिती मिळवण्यासाठी कारस्थान रचून, ती माहिती उघड केल्याचा आरोप 52 वर्षांच्या असान्ज यांच्यावर आहे.
 
इराक आणि अफगाणिस्तानातील युद्धाबद्दलची माहिती असणाऱ्या विकीलीक्स फाईल्स जगजाहीर केल्याने अनेकांची आयुष्यं धोक्यात आली, असा दावा अमेरिकेने गेली अनेक वर्षं केलाय.
गेली 5 वर्षं ब्रिटीश तुरुंगात घालवलेल्या असान्ज यांनी अमेरिकेत प्रत्यापर्णाचं प्रकरण तुरुंगातूनच लढवलं होतं.
 
बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी वृत्तसंस्था सीबीएस (CBS) च्या माहितीनुसार असान्ज यांना अमेरिकेत तुरुंगवास होणार नाही आणि त्यांनी युकेमध्ये तुरुंगवासात घालवलेल्या कालावधीच्या बदल्यात त्यांना 'क्रेडिट' मिळेल. (म्हणजे भविष्यात एखाद्या प्रकरणी तुरुंगवास झाल्यास त्यांनी युकेत तुरुंगात घालवलेल्या कालावधीचा काळ त्या शिक्षेतून वजा होईल.)
 
न्याय खात्याच्या पत्रानुसार असान्ज यानंतर ऑस्ट्रेलियाला परततील.
 
1901 दिवस लहानशा कोठडीत घालवल्यानंतर मंगळवारी असान्ज बेलमार्श तुरुंगातून बाहेर पडल्याचं विकीलीक्सने एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर म्हटलंय.
 
त्यानंतर 'दुपारी त्यांना स्टॅनस्टेड विमानतळावर सोडण्यात आलं, तिथून विमानाने युकेतून ऑस्ट्रेलियाला रवाना झाले' असंही या निवेदनात म्हटलंय.
विकीलीक्सने ऑनलाईन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जीन्स-निळ्या टीशर्टमधल्या असान्ज यांना स्टॅनस्टेड विमानतळाकडे नेताना दिसत असून त्यानंतर विमानात चढताना दिसतात.
 
बीबीसीने हा व्हिडीओ पडताळलेला नाही.
 
ज्युलियन यांची पत्नी स्टेला असान्ज यांनी 'हा दिवस प्रत्यक्षात यावा यासाठी इतकी वर्षं प्रयत्न करत राहणाऱ्यांचे' आभार मानले आहेत.
 
अमेरिकेसोबत झालेल्या या तडजोडीनुसार असान्ज त्यांच्यावरील एका आरोपामध्ये ते दोषी असल्याचं स्वीकारतील. बुधवारी 26 जून रोजी नॉर्दर्न मरिआना बेटांवरील कोर्टामध्ये ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेच्या हवाईमधल्या किंवा इतर कुठल्याही फेडरल कोर्टापेक्षा पॅसिफिक समुद्रातील अमेरिकन कॉमनवेल्थमधील हे बेट ऑस्ट्रेलियापासून जवळ आहे.
 
हे प्रकरण फार काळासाठी ताणलं गेल्याचं, ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटल्याचं AFP वृत्तसंस्थेने म्हटलंय.
 
असान्ज यांचे वकील रिचर्ड मिलर यांनी CBSला प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. तर बीबीसीनेही असान्ज यांच्या अमेरिकेतील वकीलांना संपर्क केलेला आहे.
 
असान्ज यांच्यावरील खटला हा राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा त्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी दीर्घकाळापूर्वी केला होता.
 
असान्ज यांच्यावरील कारवाई थांबवावी या ऑस्ट्रेलियाच्या विनंतीचा आपण विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एप्रिल महिन्यात म्हटलं होतं.
 
तर त्याच्या पुढच्याच महिन्यात असान्ज यांना युके हायकोर्टाकडून दिलासा मिळाला होता. अमेरिकेत प्रत्यापर्ण करण्यात येण्याच्या विरोधात नवीन अपील करण्याला या कोर्टाने मान्यता दिली. यामुळे भविष्यात अमेरिकेत हा खटला कसा चालवला जाईल आणि असान्ज यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल का, या मुद्द्यांवर असान्ज यांना अमेरिकेला आव्हान देता आलं.
 
'बायडन प्रशासनाने या लाजीरवाण्या कारवाईपासून स्वतःला दूर ठेवावं' असं या निर्णयानंतर स्टेला असान्ज यांनी पत्रकार आणि समर्थकांशी बोलताना म्हटलं.
 
अमेरिकन प्रशासनाला सुरुवातील विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असान्ज यांच्यावर 18 आरोपांसाठीचा खटला चालवायचा होता. हेरगिरी, अमेरिकन सैन्याचे गुप्त रेकॉर्ड्स, अफगाणिस्तान आणि इराक युद्धांसंबंधीचे परराष्ट्र संबंध विषयक गोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध करण्याविषयीचे हे आरोप होते.
 
ज्युलियन असान्ज यांनी 2006 मध्ये विकीलीक्सची स्थापना केली. याद्वारे 1 कोटी कागदपत्रं जगजाहीर केल्याचा दावा त्यांनी केलाय. ' गोपनीय कागदपत्रं फुटण्याचं अमेरिकन सरकारच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं प्रकरण' असल्याचं अमेरिकन सरकारने नंतर म्हटलं होतं.
 
अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टरमधून चित्रित करण्यात आलेला एक व्हीडिओ 2010 मध्ये या वेबसाईटने प्रसिद्ध केला. यामध्ये रॉयटर्सच्या दोन बातमीदारांसोबत डझभरापेक्षा जास्त इराकी सामान्य नागरिक बगदादमध्ये मारले जात असल्याचं दिसत होतं.
असान्ज यांच्या एक सहकारी, अमेरिकन लष्कराच्या विश्लेषक चेल्सी मॅनिंग यांना 35 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर 2017 मध्ये बराक ओबामा प्रशासनाने ही शिक्षा रद्द केली.
 
असान्ज यांच्यावरही बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या वेगळ्या प्रकरणांत स्वीडनमध्ये आरोप करण्यात आले होते, जे त्यांनी फेटाळले.
 
असान्ज यांनी 7 वर्षं इक्वाडोरच्या लंडन दूतावासात लपून घालवली. स्वीडीश केसमुळे त्यांना अमेरिकेत पाठवलं जाईल, असं त्यांचं त्यावेळी म्हणणं होतं.
 
मूळ तक्रारीला बराच काळ उलटून गेल्याचं म्हणत 2019 मध्ये स्वीडिश प्रशासनाने ही केस बंद केली आणि नंतर युके प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलं. स्वीडनमध्ये प्रत्यापर्णासाठी कोर्टासमोर शरण न आल्याने त्यांच्यावर खटला चालवला गेला.
 
या सगळ्या कायदेशीर लढायांच्यादरम्यान असान्ज सार्वजनिकरित्या कुठेही फारसे दिसले नाहीत आणि गेली अनेक वर्षं त्यांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या येत होत्या. 2021 मध्ये तुरुंगात असताना त्यांना स्ट्रोकही येऊन गेला.
 
Published By- Priya Dixit