मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (11:21 IST)

महिलेच्या खात्यात चुकून जमा झाले 55 कोटी रुपये आणि मग...

black money
थेवामानोगरी मनीवेलच्या बँक खात्यात चुकून 7 दशलक्ष डॉलर (55 कोटी 79 लाख रुपये) पोहोचल्यावर तिला वाटलं की ती जगातील सर्वात आनंदी महिला आहे. पण आता ती आणि तिचे काही जवळचे मित्र अडचणीत आले आहेत.
 
तिला पैसे परत करावे लागतील, असा निकाल ऑस्ट्रेलियन न्यायालयानं या खटल्यात दिला आहे. याशिवाय तिला यावर व्याज आणि कायदेशीर कारवाईसाठीचे शुल्कही भरावे लागणार आहे.
 
हे सर्व मे 2021 मध्ये सुरू झाले जेव्हा Crypto.com ने मनीवेलच्या खात्यात शंभर ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या प्रलंबित पेमेंटसाठी व्यवहार केला.
 
पण ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात राहणाऱ्या मनीवेल याच्या खात्यात 100 डॉलर्सऐवजी ज जवळपास 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमा झाले.
 
ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, ही चूक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची मानवी चूक होती. जिथं रक्कम टाकायची होती, तिथं त्यानं मनीवेलचा खाते क्रमांक टाकला आणि ही चूक झाली.
 
चुकीची भावना
मनीवेल एका झटक्यात कोट्यधीश बनली होती आणि हे पैसे सांभाळण्यासाठी तिच्याकडे वेळेची कमतरता नव्हती.
 
पुढील काही महिन्यांत या महिलेने खात्यातील पैशांचा मोठा भाग तिच्या मित्रासोबत शेअर केलेल्या खात्यात ट्रान्सफर केला.
 
त्या मित्राने आपल्या मुलीच्या खात्यात सुमारे तीन दशलक्ष डॉलर्स पाठवले आणि मेलबर्नच्या उत्तरेस एक घरही विकत घेतलं. हे घर त्यांनी मलेशियामध्ये राहणारी त्यांची बहीण थिलगावथी गंगादरी हिच्या नावावर विकत घेतलं.
 
चार खोल्या, चार बाथरूम, सिनेमा रूम, जिम आणि दुहेरी गॅरेज असलेले हे घर 500 स्क्वेअर मीटरवर बांधले गेले होते आणि त्यासाठी 13.5 दशलक्ष डॉलर देण्यात आले.
 
त्याच वेळी क्रिप्टोकरन्सी कंपनीला आपली चूक लक्षात येण्यासाठी अनेक महिने लागले.
 
ऑस्ट्रेलियन प्रांत व्हिक्टोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेम्स एलियट यांनी शुक्रवारी सांगितले की, "असे दिसते की याचिकाकर्त्याला ही चूक सात महिन्यांनंतर कळली."
 
न्यायालयाचा निर्णय
न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देताना केवळ संपूर्ण रक्कमच नाही तर त्यावरील व्याज आणि कायदेशीर खर्चही देण्याचे आदेश दिले आहेत.
 
मनीवेलच्या बहिणीला ते घर विकावे लागेल, कारण चुकीनं आलेल्या पैशातून ते घर खरेदी केलं आहे, असा आदेश न्यायालयाने दिला.
 
क्रिप्टोकरन्सी कंपनीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कायदेशीर कारवाई सुरू केली आणि मनीवेलशी जोडलेली खाती गोठवण्यात यशस्वी झाली.
 
असं असलं तरी क्रिप्टोने खाती गोठवली तोपर्यंत मनीवेलने बहुतेक पैसे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते.
 
मनीवेलची मालमत्ता गोठवल्यानंतर दोन आठवड्यांनंतर तिची बहीण घराची मालक बनली होती.
 
मनीवेलच्या बहिणीचे खातेही गोठवण्यात यावे, अशी मागणी क्रिप्टोकरन्सी कंपनीने केली होती. आता न्यायालयाने त्यांना घर विकण्याचे आदेश दिले आहेत.