शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (15:00 IST)

वयाच्या 10व्या वर्षीच दारू पिऊन यकृत खराब झाल्यासारखी लक्षणं, नक्की हा आजार कोणता?

Megan McGillin
-अलीन मोयनाघ
मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या यकृताची जी अवस्था असते त्याप्रमाणे तिचंही यकृत खराब झालं होतं.
 
उत्तर आयर्लंडमधील मेगन मॅकग्लिन या तरुणीला 11 वर्षांपूर्वी सिरोसिसचा त्रास झाला होता. त्यामुळे तिचं यकृत नीट काम करत नव्हतं. तिच्या यकृताला जखमा झाल्या होत्या.
 
लहान मुलांना असा यकृताचा आजार होणं दुर्मिळ आहे. एका यकृततज्ज्ञाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जर आपण निरोगी आणि तंदुरुस्त असू तर यकृतही स्थिर स्थितीत असतं.
 
सिरोसिस बरा होऊ शकत नाही. मुलांमध्ये सोरायसिसची कारणं ठरणारे बहुतेक यकृत विकार टाळता येत नाहीत.
 
मेगनला हा आजार कसा झाला हे कोडं डॉक्टरांनाही उलगडलेलं नाही. पण डॉक्टर सांगतात, तिचं यकृत कधीही बंद पडू शकतं.
 
मेगन सांगते, "जेव्हा मला कळलं की मला अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आहे, तेव्हा 18 व्या वर्षी माझ्या यकृताचं प्रत्यारोपण करण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण मी तेव्हा तंदुरुस्त आणि बरी होते."
 
"पुढे जेव्हा मी 16 वर्षांची झाले तेव्हा डॉक्टर म्हणाले मला 21 वर्षी प्रत्यारोपणाची गरज आहे. मी नोव्हेंबर महिन्यात 21 वर्षांची झाले तरीही यकृत प्रत्यारोपण झालं नाही. डॉक्टर मला प्रत्यारोपणाची नेमकी वेळ सांगत नाहीत."
 
खेळ सोडावे लागले...
सिरोसिससारख्या यकृताच्या आजारामुळे पोर्टल हायपरटेन्शन म्हणजेच शिरांवर दाब येऊ शकतो. यामुळे प्लीहाची वाढ होऊ शकते. म्हणून मेगनला काही खेळ सोडून द्यावे लागले. तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती.
 
त्यामुळे मेगनने रोइंग या खेळात सहभागी व्हायचं ठरवलं. रोइंग मध्ये वल्हे वापरुन नाव चालवावी लागते. माध्यमिक शाळेत असताना ती काही वर्ष हाय परफॉर्मन्स नॉर्दर्न आयर्लंड रोइंग संघात होती. यामुळे मेगन तंदुरुस्त झाली.
 
ती सांगते, "मी खूप मेहनत घेतली. सततच्या प्रशिक्षणामुळे हे शक्य झालं. या खेळात तुम्हाला खूप ताकद हवी असते त्यामुळे मी शारीरिकदृष्ट्या माझी काळजी घेतली."
 
तंदुरुस्त राहिल्याने तिचं यकृत आणखी काम करेल असा तिचा विश्वास आहे.
 
दहा लाखांत एक...
बर्मिंगहॅम महिला आणि बाल रुग्णालयातील बालयकृतरोग विशेषज्ञ डॉ. गिरीश गुप्ते सांगतात की ते, वर्षातून सहा वेळा रॉयल बेलफास्ट हॉस्पिटलमध्ये मुलांची भेट घेतात.
 
गिरीश सांगतात की, "लहान मुलांमध्ये यकृताचे आजार फार दुर्मिळ असतात. त्यामुळे बहुतेक लोकांनी यकृताच्या तीव्र समस्या असलेल्या मुलांबद्दल कधीच ऐकलेलं नसतं. 10,000 लोकांपैकी केवळ एकाला यकृताचा आजार असू शकतो."
 
गिरीश म्हणाले, अलिकडच्या दशकांत यकृताच्या आजाराची प्रकरणं वाढत आहेत कारण तंत्रज्ञानाने जी प्रगती केली आहे त्यामुळे अशी प्रकरणं समोर येत आहेत.
 
डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये अशा आजाराचं प्रमाण वाढण्यामागे पर्यावरणीय घटक आणि जीवनशैली कारणीभूत आहे.
 
"यकृत रोग असलेल्या सर्व मुलांना यकृत प्रत्यारोपणाची गरज नसते. यापैकी बहुतेक परिस्थिती चांगल्या वैद्यकीय उपचारांनी आणि निरोगी जीवनशैलीने नियंत्रित केली जाऊ शकते."
 
"पण काही मुलांचे यकृत दिवसागणिक बिघडते. अशा लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते" असं डॉ. गिरीश सांगतात.
 
"तंदुरुस्त राहणं, यकृतावर चरबी जमा होण्यापासून रोखणं यामुळे यकृत निरोगी राहतं. यामुळे यकृताचं प्रत्यारोपण पुढे ढकलता येतं."
 
'अल्कोहोलिक लिव्हर'
बऱ्याच लोकांना असं वाटतं की सिरोसिस हा एक रोग आहे. तसेच अती मद्यपान केल्यामुळे हा आजार होतो. आणि हा आजार बहुतांश प्रौढ लोकांनाच होतो. पण लहान मुलांना ही सिरोसिस हा आजार होऊ शकतो.
 
एकदा मेगन खूप आजारी पडली. चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितलं की अती मद्यपानामुळे मेगनचं यकृत खराब झालं आहे.
 
मेगनने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी याआधी कधीही मद्यपान केलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा मला अल्कोहोलिक लिव्हर असल्याचं निदान झालं तेव्हा माझ्या आईला धक्काच बसला.
 
ती सांगते की, जेव्हा यकृताचा आजार होतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की हे दारूच्या व्यसनामुळेच झालं आहे.
 
'मी माझ्या समवयस्कांपेक्षा थोडी वेगळी आहे'
मेगनला यकृताचा आजार झाल्याचं लोकांना समजलं. यावर तिने कधीही दारूला हात लावला नसल्याचं सांगितलं तेव्हा त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
 
काहींनी विचारलं की, तू इतक्या लहान वयात दारू प्यायला सुरुवात केली होतीस का? तर काहींनी विचारलं की तू तुझ्या तरुणपणात काय करणार? लोकांचं हे विचारणं मेगनला सहन झालं नाही.
 
पण मेगन म्हणते की, तिच्यामुळे लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची संधी तिला मिळाली आहे. यकृताचा आजार नेहमीच दारुशी संबंधित असतो असं नाही.
 
मेगन सांगते, हा आजार होणं तिच्यासाठी खूप भयावह होतं.
 
बाहेरून मी सामान्य दिसते, सामान्य गोष्टी करते. पण मी माझ्या समवयस्कांपेक्षा वेगळी असल्याचं मेगन सांगते.
 
"मला मर्यादा आहेत. मी काही गोष्टी करू शकते तर काही गोष्टी माझ्या आवाक्याबाहेर आहेत. हे माझ्या शरीरातील ताकदीवर अवलंबून आहे."
 
मेगन तिच्या भविष्याबाबत सकारात्मक असली तरी, तिला यकृताचा आजार असल्यामुळे काही गोष्टींचं नियोजन करावं लागतं, जे खूप कठीण आहे.
 
ती सांगते, "मला कधीही कावीळ होऊ शकते. पिवळी पडलेली माझी त्वचा, माझं यकृत खराब झाल्याचं लक्षण आहे."
 
"त्यामुळे अखेरीस यकृत प्रत्यारोपण करावं लागेल. कदाचित ते पुढच्या आठवड्यात, पुढच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात, कधीही करावं लागू शकतं, मला माहित नाही."
 
मेगन म्हणाली की, जेव्हा ती वेळ येईल तेव्हा दुसर्‍या व्यक्तीकडून अवयव मिळवणं खरंच खूप अविश्वसनीय असेल, त्यामुळे ती प्रत्यारोपण करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
 
मेगन पुढे सांगते की, "अवयव दान खरोखरच एखाद्याचा जीव वाचवू शकते, परंतु तरीही तो एक भीतीदायक निर्णय असू शकतो कारण तुम्हाला काय होणार आहे हे देखील माहित नाही. पुढे तुम्ही आजारी पडाल की नाही हे देखील तुम्हाला माहीत नाही? तुमचं शरीर नवीन अवयव स्वीकारेल की नाही, सांगता येत नाही. ऑपरेशननंतर पुन्हा नवा रोग आणि संक्रमण होण्याची भीती देखील असू शकते, कारण ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे."
 
सध्या माझं यकृत काम करत आहे. त्याचं काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे असंही नाही, पण ते सुरू आहे. माझ्याकडे माझं स्वतःचं यकृत आहे, मी जन्मले तेव्हाही ते माझ्याकडे होतं आणि आताही ते माझ्याकडे आहे ही माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट असल्याचं मेगन सांगते.