महात्मा गांधींच्या पुतळ्याची समाज कंटकांकडून तोडफोड
शनिवारी समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या कांस्य पुतळ्याची अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन मध्ये तोडफोड केली. या घटनेवर भारतीय वाणिज्य दूतावास ने नाराजी व्यक्त केली आहे. तर भारतीय-अमेरिकन समुदायानेही या घटनेबद्दल निराशा व्यक्त केली.
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, शनिवारी पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली. "पुतळ्याची तोडफोड करण्याच्या या घटनेचा वाणिज्य दूतावास तीव्र निषेध करतो," असे निवेदनात म्हटले आहे.
दूतावासाच्या म्हणण्यानुसार, "तत्काळ तपासासाठी हे प्रकरण अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडेही नेण्यात आले आहे. या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.” गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाऊंडेशनने आठ फूट उंच पुतळा दान दिला आणि 2 ऑक्टोबर 1986 रोजी गांधींच्या 117 व्या जयंतीनिमित्त त्याची स्थापना केली.
2001 मध्ये पुतळा हटवण्यात आला आणि 2002 मध्ये पुन्हा स्थापित करण्यात आला. गेल्या वर्षीही काही अज्ञात हल्लेखोरांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अशाच प्रकारे आणखी एका गांधी पुतळ्याची तोडफोड केली होती.