वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला, अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका
घरात लहान मुलं असतील तर पालकांना त्यांच्या कडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर ते काहीही पराक्रम करू शकतात. लहान मुलं खेळताना त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांना जीवाचा धोका होऊ शकतो.सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.डेली मिररने या थरारक घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओ मध्ये एक चिमुकला वाशिंगमशीनच्या ड्रायर मध्ये अडकला आहे. मुलाची आई कामात व्यस्त असताना तो वॉशिंग मशीन जवळ खेळत असताना तो ड्रायर मध्ये पडला आणि अडकला. त्याने जोराने रडायला सुरु केले त्याचे रडणे ऐकून आई तातडीनं बाहेर आली आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी धडपड करू लागली.
तिने सर्वोपरी प्रयत्न केल्यावर देखील तिला यश मिळाले नाही तेव्हा तिने वेळीच आपत्कालीन सेवाला फोन लावला. अग्निशमन दलाचे जवान तातडीनं तिथे पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मशीन उघडून ड्रायर कापून चिमुकल्याची सुटका केली. वेळीच मदत मिळाल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला अन्यथा काहीही अघटित घडले असते.
Edited by - Priya Dixit