शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (14:45 IST)

Turkey earthquake तुर्कीमधील भूकंपातील मृतांचा आकडा 8,000 जवळ

turki
तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी (6 फेब्रुवारी) पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला होता. या भूकंपामुळे सीरिया आणि तुर्की या दोन देशांमध्ये मिळून 7,800 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. 15,000 हून अधिक जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
सोमवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.8 होती. पहाटेच्या भूकंपानंतर पुन्हा दुपारी भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला होता. नव्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी आहे.
 
दुसरा भूकंप हा स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.24 झाला आहे. पहिल्या केंद्रापासून 80 मैल दूर असलेल्या एल्बिस्टान या ठिकाणी झाला होता.
 
मंगळवार 7 फेब्रुवारी रोजी भूकंपाचा आणखी एक धक्का मध्य तुर्कीमध्ये जाणवला. गोलबासी इथं जमिनीखाली 10 किमीवर याचं केंद्र असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाच्या माहितीनुसार त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी होती.
 
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
 
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. "तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप आला. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. तुर्की प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्या पद्धतीने आणि वेगवान पातळीवर कशी मदत पोहोचवता येईल याचं नियोजन सुरू आहे," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.
 
पहिल्या धक्क्यानंतर काही मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. यानंतरही अनेकदा धक्के बसत राहिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
 
तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
turki
भूकंपाची झळ बसलेल्या भागातील इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.
 
मदतीसाठी भारताकडून NDRF, श्वानपथके आणि डॉक्टर्सची टीम तुर्कीला जाणारभूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन भारताने सर्वोतपरी मदत देण्याची घोषणा केली आहे. NDRF आणि डॉक्टर्सच्या टीम ताबडतोब पाठवणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
 
यामध्ये 100 NDRF जवानांच्या दोन टीमचा समावेश असणार आहे.तुर्कीमधील भूकंपग्रस्त भागात बचावकार्य करण्यासाठी हे जवान कार्य करतील. त्यांच्यासोबत श्वान पथकंही असणार आहेत.
 
तसंच सोबत प्रशिक्षित डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ असणार आहे. तुर्की सरकारशी चर्चा करून मदतीच्या सगळे साहित्यही पाठवले जातील असंही पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
 
अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या सीरियाच्या सीमेनजीक गाजिएनटेपच्या जवळच्या कहमानमारश इथे होता.
 
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4.17 वाजता तुर्कीत भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. थोड्या वेळानंतर दुसरा धक्का जाणवला. तुर्कीची राजधानी अंकारासह अन्य ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
तुर्कीतील 10 प्रमुख शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला आहे. कहमानमारश, हैटी, गाजिएनटेप, ओस्मानिये, अदियामान, सनलिऊर्फा, मलेटिया, अदाना, दियारबाकिएर, किलिस या शहरांमध्ये भूकंपाने प्रचंड नुकसान झालं आहे.
 
दक्षिण पूर्व भागात 50 इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.
 
अर्दोआन यांनी भूकंपासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. "भूकंपाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या वेदनेप्रती मी संवेदना व्यक्त करतो. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गृह मंत्रालय सुटकेच्या मोहिमांवर लक्ष ठेऊन आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
 
भूकंपामुळे अनेक इमारती कोसळून लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एक शॉपिंग मॉल भुईसपाट झाल्याचं बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधीने सांगितलं.
 
गाझा पट्टीतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं बीबीसी प्रतिनिधीने सांगितलं. 45 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असं या प्रतिनिधीने म्हटलं आहे.
 
भूकंपाची शक्यता असलेल्या संवेदनशील क्षेत्रात तुर्की मोडतं. गेल्या काही वर्षांपासून तुर्कीत नियमितपणे भूकंप येत आहेत. 2020 जानेवारीत एलाजिग इथे 6.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
2022 मध्ये एजियन सागरात आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी होती. यामध्ये 114 लोकांचा मृत्यू झाला होता. हजारहून अधिक नागरिक जखमी झाले होते.
 
1999 साली दूजा इथे 7.4 क्षमतेचा भूकंप आला होता. 17 हजारहून अधिक नागरिकांनी यामध्ये जीव गमावला. हजारहून अधिक लोक इस्तंबूल शहरातच गेले.