स्विम सूटवर 'ॐ' प्रिंट असलेला कपडा लपेटल्यावरून केंडल जेनरवर टीका; सोशल मीडियावर संताप व्यक्त
अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही स्टार केंडल जेनर सध्या सोशल मीडियावर टीकेची धनी ठरत आहे. तिची बहीण काइली जेनरसोबत एका याट सुट्टी घालवतानाचे काही फोटो समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. या फोटोंमध्ये केंडलने तिच्या स्विमवेअरवर एक 'सारोंग' गुंडाळलेला दिसत आहे, ज्यावर 'ॐ' हे चिन्ह छापलेले आहे.
अनेक भारतीय वापरकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हिंदू धर्मात 'ॐ' हे एक अत्यंत पवित्र चिन्ह आहे आणि फॅशनच्या नावाखाली त्याचा वापर करणे म्हणजे धार्मिक भावना दुखावण्यासारखे आहे. केंडल आणि तिची बहीण काइली, हेली बीबरचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बहामासमध्ये गेल्या होत्या. या सहलीदरम्यान, काइलीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले; एका फोटोमध्ये दोघी एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर पोझ देत आहेत. केंडलने काळ्या बिकिनीवर पिवळ्या आणि लाल रंगाचा 'सारोंग' घातला आहे, ज्यावर 'ओम' चिन्हे आहेत, तर काइलीने काळ्या रंगाचा 'मिडी ड्रेस' घातला आहे.
हे फोटो समोर आल्यानंतर अनेक भारतीय वापरकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. एका वापरकर्त्याने म्हटले की, 'ओम' हे हिंदू धर्मातील एक पवित्र चिन्ह आहे, ते फॅशन ॲक्सेसरी म्हणून वापरले जाऊ नये. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, "माझा हिंदू धर्म ही तुमची फॅशन ट्रेंड नाही." काहींनी असाही प्रश्न उपस्थित केला की, या धार्मिक चिन्हाचे महत्त्व केंडलला माहीत आहे का?
काही वापरकर्त्यांनी असे सुचवले की कदाचित केंडलला या चिन्हाच्या धार्मिक महत्त्वाबद्दल माहिती नसेल, परंतु अनेकांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला.
केंडल जेनरला 'कीपिंग अप विथ द कार्दशियन' या रिॲलिटी शोमुळे ओळख मिळाली. ती २००७ ते २०२१ अशा २० सीझन्सपर्यंत या शोचा भाग होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये तिने भारताला भेट दिली होती आणि जयपूरमध्ये दागिनेही खरेदी केले होते.

