1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (15:08 IST)

इस्रायलचा गाझावरील जमिनीवरचा हल्ला कसा असेल?

इस्रायल गाझावर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.पुढील 24 तासांत गाझी पट्टीच्या उत्तरेकडील 1.1 दशलक्ष लोकांना दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यास इस्रायलतर्फे सांगण्यात आलंय. दरम्यान, ते सीमारेषेच्या नजिक हजारो सैन्य, रणगाडे आणि शस्त्रात्रे जमा करतायत.
 
परंतु गाझाच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागात लष्कर पाठवणे ही अतिशय धोकादायक मोहीम ठरू शकते.
 
जमिनीवरील संभाव्य हल्ला किती मोठा असेल म्हणजेच लष्कर शहराच्या किती आतमध्ये जाईल आणि किती काळासाठी हे देखील अद्याप स्पष्ट नाहीये.
 
ते कधी होऊ शकते?
जमिनीवर हल्ला करण्यासाठी आवश्यक लष्करी कवायती सुरू झाल्या आहेत.
 
इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि गाझामधील मागील मोहिमांचा अनुभव असलेले मेजर जनरल आमोस गिलियड म्हणतात की, भविष्यातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळविण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीयांचे एकत्रित सरकार तयार करणे हे इस्रायलसमोरील पहिले आव्हान आहे.
 
वरिष्ठ यूएस आणि युरोपियन राजकारण्यांच्या अलिकडील उच्च स्तरीय राजनैतिक भेटींमध्ये इस्रायलला आंतरराष्ट्रीय समर्थन वाढवण्याची परवानगी देण्यात आलेय, पण हे युद्ध जितकं जास्त काळ सुरू राहील आणि नागरिकांची जीवितहानी जितकी वाढेल तितकी ही एकता डळमळीत होऊ शकते. इस्रायलच्या लष्करी मोहिमेत लष्कराची होणारी लक्षणीय जीवितहानी देखील त्यांच्या स्वत: च्या निर्णयावरही परिणाम करेल.
 
लष्करी हल्ल्यासाठी इस्रायलने आधीच गाझा सीमेजवळ आपलं सैन्य जमा केलंय. 160,000 पेक्षा अधिक सशस्त्र सैन्यासह, सुमारे 300,000 राखीव सैन्यांना देखील सज्ज करण्यात आलंय.
 
 
अलिकडेच दक्षिण भागात आलेल्या काही राखीव सैनिकांशी आम्ही बोललो - त्यांचं मनोबल उंचावलेलं दिसत होतं आणि ते लढायला तयार आहेत.
 
हमासच्या हल्ल्याची बातमी पहिल्यांदा ऐकली तेव्हा निस्सीम श्रीलंकेत होता, पण त्याच्या युनिटमध्ये सामील होण्यासाठी तो पहिल्या विमानाने इस्रायलला परतला. तो म्हणाला, "हे आमचं घर आहे. त्यासाठी आम्हाला लढावंच लागेल."
 
शुकीने त्याची 'सेल्स'ची नोकरी लगेच सोडली. त्याने सांगितलं, "आम्हाला शांतता राखायला आवडेल." "दुर्दैवाने ते शक्य नाहीए. आम्ही आनंदी जीवन जगतो, म्हणून आम्हाला जगण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे."
 
कारवाईची गरज असताना इस्रायल एकत्रित झाल्याचं दिसतंय, पण युद्धाच्या आदेशाची वाट पाहण्यात वेळ निघून जातोय. सैन्याला जितकं जास्त वेळ थांबावं लागेल तितकी तत्परता आणि मनोबल राखणं कठीण होईल.
 
इस्रायलने गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना दक्षिणेतून पळून जाण्याचा दिलेला इशारा हा त्यांच्या लष्करी कारवाईचा पुढील टप्पा जवळ येत असल्याचे संकेत आहे.
 
हल्ल्याची तयारी
 
स्वतःचा प्रदेश सुरक्षित करणं हे इस्रायलसमोरील पहिलं आव्हान आहे आणि हमासच्या त्या हल्लेखोरांना मारणं किंवा पकडणं आणि त्यांची चौकशी करणं ज्यांनी सीमा ओलांडून 1,300 हून अधिक लोकांना मारलं आणि 150 जणांना ओलिस ठेवलंय.
 
इस्रायल आधीच हमासची महत्त्वाची लष्करी ठिकाणं आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करून तीव्र हवाई हल्ले करतोय. गेल्या सहा दिवसांत त्यांच्या हवाई दलाने गाझावर 6,000 हून अधिक बॉम्ब टाकलेत. तुलनाच करायची झाली तर, 2011 मध्ये लिबियातील संपूर्ण युद्धादरम्यान नाटो सहयोगींनी 7,700 बॉम्ब टाकले होते.
 
गाझामध्ये हवाई हल्ल्यात आतापर्यंत 1500 हून अधिक लोक मारले गेलेत.
 
आक्रमणाची योजना ही अतिशय गुप्तपणे आणि बारकाईने अभ्यास करून आखावी लागेल, परंतु इस्रायल अनेक वर्षांपासून यासाठी तयारी करतोय. मिनी-गाझा म्हणून ओळखल्या जाणार्‍या दक्षिणेकडील लाखो-कोटी डॉलर्सच्या शहरी युद्ध केंद्रात ते सैन्याला प्रशिक्षण देतायत.
 
तिथे त्यांना दाटीवाटीने बांधलेल्या इमारती आणि भुयारांच्या चक्रव्यूहांचा सामना करत कसं लढायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलंय, कारण असं मानलं जातंय की हमासने 1,000 हून पेक्षा अधिक इमारती आणि भुयारं बांधली आहेत.
 
जेरुसलेम पोस्टचे माजी संपादक आणि इस्रायलच्या लष्करावरील अनेक पुस्तकांचे लेखक याकोव्ह कॅट्झ म्हणतात की, आपला उद्देश साध्य करण्यालाठी लष्कराच्या विशेष तुकड्यांना सज्ज केलं गेलंय - रणगाडे आणि शस्त्रांस्त्रांसोबतच सशस्त्र बुलडोझर हाताळणा-या अभियंत्यांना एकत्र करण्यात आलंय.
 
शहरी युद्धभूमी आणि भुयारं
 
माजी आयडीएफ कमांडर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल याकोव्ह अमिद्रोर हे कबूल करतात की हमाससोबत लढणं कठीण असेल. हमासने शहरांच्या प्रवेशद्वारं आणि अरुंद रस्त्यांवर बूबी सापळे आणि आधुनिक स्फोटकं असलेली उपकरणं बसवून ठेवली आहेत.
 
इस्रायलचा अंदाज आहे की हमासचे सुमारे 30,000 सैनिक आहेत. त्यांच्याकडील शस्त्रांमध्ये ऑटोमॅटिक रायफल, रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि काही रशियन बनावटीचे कॉर्नेट्स आणि फॅगॉट्सचा समावेश आहे.
 
हमासकडे अजूनही रॉकेटचा मोठा साठा आहे ज्याचा ते इस्रायलवर वर्षाव करतायत. याकोव्ह कॅट्झ म्हणतात की, हमास स्वतःचे छोटे ड्रोन देखील तयार करतंय - ज्यामध्ये स्वत:हून फुटणा-या ड्रोन्सचाही समावेश आहे. ते म्हणतात की हमासकडे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या खांद्यावरील कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा फारच मर्यादित असू शकतो. त्यांच्याकडे इस्रायलच्या तुलनेत सशस्त्र वाहनं, रणगाडे आणि मोठ्या तोफा नाहीएत.
 
पण इस्रायलसमोर दाट लोकवस्तीच्या शहरी भागात समोरासमोर लढण्याचे आव्हान असेल.
 
इस्रायलकडे भुयारातील युद्धासाठी विशेष तुकड्या आहेत, ज्यात याहलोम नावाचे अभियांत्रिकी युनिट आणि कॅनाइन लढाईत पटाईत असलेल्या ओकेट्झचा समावेश आहे.
 
कॅटझ म्हणतात की जोपर्यंत आवश्यकता भासत नाही तोपर्यंत इस्रायली सैन्याने भुयारात जाणं टाळलं पाहिजे, कारण हमास त्यांच्यासोबत लढण्याऐवजी स्फोटकं टाकून भुयारं नष्ट करेल
 
ओलिसांचे भवितव्य
इस्त्रायलचे ओलिस हमासच्या ताब्यात असल्याने जमिनीवरील हल्ला गुंतागुंतीचा ठरणार आहे.
 
इस्रायली सैनिक गिलाड शालितची सुटका करण्याच्या वाटाघाटीत मेजर जनरल गिलियड सामील होते. शालितला 2006 ते 2011 अशी पाच वर्षे हमासने ताब्यात ठेवलं होतं, अखेरीस 1,000 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात त्यांची सुटका करण्यात आली.
 
मेजर जनरल गिलियड म्हणतात की लष्कराला ओलिसांचे भवितव्य विचारात घेणं आवश्यक आहे, "जर आपण काही ठोस उपाय केले नाहीत तर आपल्याला अधिक कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो".
 
परंतु मेजर जनरल अमिद्रोर म्हणतात की ओलिसांमुळे कोणतीही कारवाई थांबवली जाणार नाही. "आम्ही हमासशी शेवटपर्यंत लढा देऊ आणि मोहिमेदरम्यानच आम्हाला त्या ओलिसांचा शोध घ्यावा लागेल."
 
इस्रायलचा उद्देश काय आहे?
हमासचा नायनाट करणं हे इस्रायलचं उद्दिष्ट आहे.
 
IDF मध्ये 30 वर्षे सेवा केलेले मेजर जनरल गिलियड म्हणतात की, गाझामधील इस्त्रायलची पूर्वीची मोहिम ही नियंत्रणापुरतीच मर्यादित होती पण यावेळी ते त्याच्या पलिकडे गेलेत.
 
ते म्हणतात यावेळी "आम्हाला काहीतरी जास्त नाट्यमय करण्याची गरज आहे". निर्णायक लष्करी कारवाईमुळे या प्रदेशातील इस्रायलचे इतर शत्रू म्हणजेच हिजबुल्लाह आणि इराण यांनादेखील रोखणं शक्य होईल, असा त्यांना विश्वास आहे.
 
कॅट्झचा विश्वास आहे की इस्रायलची उद्दिष्टे अधिक व्यावहारिक असतील - हमासकडे पुन्हा कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची लष्करी क्षमता राहणार नाही याची खातरजमा केली जाईल. ते म्हणतात की इस्रायलला "गाझावर पुन्हा नियंत्रण मिळवायचे नाहीए आणि त्यांना विरोध करणाऱ्या वीस लाख लोकांच्या सुरक्षेचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल".
 
तरीही, अलीकडचा इतिहास असं सांगतो की आक्रमणे क्वचितच ठरवलेल्या योजनेनुसार होतात.
 
जगातील सर्वात प्रगत सैन्य देखील लवकरच अडचणीत येऊ शकतं - इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे काय झाले आणि अगदी अलीकडे युक्रेनमध्ये रशियाचं काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलं.
 
इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजचे लेफ्टनंट जनरल सर टॉम बेकेट म्हणतात की, गाझामधील लष्करी मोहिमेचा पल्ला फक्त 25 मैलांचा (40 किमी) आहे, तरीही त्याचे परिणाम काय होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
"खरं तर गाझामध्ये इस्रायलने जमिनीवरून आक्रमण करण्याशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही. एक लष्करी संघटना म्हणून हमासला पराभूत करण्यासाठी मोहिम कितीही यशस्वी झाली तरीही हमासची राजकीय गरज आणि प्रतिकारासाठी लोकांचा पाठिंबा कायम राहील.
 
"गाझावर नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायल एकतर पुन्हा ताबा घेईल किंवा आक्रमणानंतर माघार घेऊन तो प्रदेश प्रतिकार करणा-या लोकांच्या स्वाधीन करेल."
 




















Published By- Priya Dixit