1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (17:31 IST)

इस्रायल-हमास युद्ध: व्हाईट फॉस्फरस म्हणजे काय, त्याबद्दल चिंता का वाढतेय?

Israel hamas war
गाझावर इस्रायलचे बॉम्बहल्ले सुरूच आहेत. इस्रायल लष्कराच्या म्हणण्यानुसार, पाच दिवसांमधे गाझावर सुमारे 6000 बॉम्ब टाकण्यात आले आहेत.
 
गाझा आणि लेबनॉनमधील लष्करी कारवायांमध्ये इस्त्रायल बॉम्बहल्ल्यामध्ये व्हाईट फॉस्फरसचा वापर करतंय, असं मानवी हक्क संघटना 'ह्युमन राइट्स वॉच'ने म्हटलं आहे. त्यांच्या मते अशा शस्त्रांच्या वापरामुळे लोकांना गंभीर दुखापत होऊ शकते.
 
'ह्युमन राइट्स वॉच'ने म्हटलं आहे की, जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या गाझामध्ये व्हाईट फॉस्फरसच्या वापरामुळे नागरिकांच्या जीवाला असलेला धोका वाढतोय आणि ही कृती आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं उल्लंघन करते.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा इस्रायली लष्कराला या आरोपांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, सध्या गाझामध्ये व्हाईट फॉस्फरस शस्त्रे वापरल्याबद्दल कोणतीही माहिती नाही. इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर कोणतंही भाष्य केलं नाही.
 
'ह्युमन राइट्स वॉच'ने सांगितलं की त्यांनी 10 ऑक्टोबर रोजी लेबनॉन आणि 11 ऑक्टोबर रोजी गाझा येथे घेतलेल्या व्हीडिओंची सत्यता पडताळून पाहिली आहे. त्यात गाझा शहर बंदर आणि इस्रायल-लेबनॉन सीमेजवळील दोन ग्रामीण भागात तोफखान्यातून गोळीबार केलेले व्हाईट फॉस्फरसचे अनेक हवाई स्फोट दिसले होते.
 
'ह्युमन राइट्स वॉच'चे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका संचालक लामा फकीह म्हणतात, "जेव्हा दाट लोकवस्तीच्या भागात व्हाइट फॉस्फरसचा वापर केला जातो तेव्हा त्यापासून त्वचेची तीव्र जळजळ होते आणि आयुष्यभर वेदना होण्याचा धोका असतो."
 
2013 मध्ये इस्रायली सैन्याने सांगितलं होतं की ते युद्धभूमीवर स्मोकस्क्रीन तयार करण्यासाठी व्हाईट फॉस्फरसचा दारूगोळा वापरणं थांबवणार आहे.
 
इस्त्रायली लष्कराने तेव्हा म्हटलं होतं की तोफगोळ्यांमध्ये गॅस वापरून स्मोक्सस्क्रीनचा प्रभाव तयार केला जाईल. गाझा संघर्षादरम्यान त्यावेळीही मानवी हक्क संघटनांनी इस्रायलने केलेल्या पांढर्‍या फॉस्फरसच्या वापराचा निषेध केला होता.
 
व्हाइट फॉस्फरस म्हणजे काय?
व्हाइट फॉस्फरस त्याच्या ज्वलनशील गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हा एक रासायनिक पदार्थ आहे जो ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर जळतो. तोफांचे गोळे, बॉम्ब आणि रॉकेटमध्ये याचा वापर केला जातो.
 
व्हाइट फॉस्फरस ऑक्सिजनच्या संपर्कात आला की, रासायनिक अभिक्रियेतून 815 अंश सेल्सिअस पर्यंत तीव्र उष्णता निर्माण होते.
व्हाईट फॉस्फरस जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा ज्वलनामुळे प्रकाश आणि दाट धूर तयार होतो ज्याचा वापर लष्करी कारवायंमध्ये केला जातो. परंतु माणसे व्हॉइट फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास शरीराला भयंकर जखमा होतात.
 
यामुळे भयंकर आग लागू शकते आणि इमारती, पायाभूत सुविधा नष्ट होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं.
 
व्हॉइट फॉस्फरस कसा वापरला जातो?
व्हाइट फॉस्फरसचा वापर जमिनीवरील लष्करी कारवायांमध्ये सैनिकांना लपविण्याच्या उद्देशाने केला जातो. व्हॉइट फॉस्फरसचा वापर करून लष्करी सैनिक एक स्मोकस्क्रीन तयार करतात आणि आपल्या हालचाली लपविण्याचा प्रयत्न करतात.
 
व्हाइट फॉस्फरस इन्फ्रारेड ऑप्टिक्स आणि शस्त्र ट्रॅकिंग प्रणालीमध्ये हस्तक्षेप करतं आणि लष्करी दलांना टँकविरोधी क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रास्त्रांपासून संरक्षण देतं.
व्हाइट फॉस्फरस जमिनीवरील स्फोटापेक्षा हवेतील स्फोटादरम्यान मोठ्या क्षेत्राला व्यापतो आणि मोठ्या लष्करी कारवायांना लपवण्यात मदत करतो.
 
गाझासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात हवेत पांढर्‍या फॉस्फरसचा स्फोट घडवणं हे तिथल्या लोकांच्या जीवासाठी धोकादायक आहे.
 
व्हाइट फॉस्फरसचा वापर आग लावणारे शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो. 2004 मध्ये इराकमधील फालुजाच्या दुसऱ्या लढाईदरम्यान लपलेल्या हल्लेखोरांचा पर्दाफाश करण्यासाठी व्हाइट फॉस्फरसचा वापर करण्यात आला होता.
 
व्हाइट फॉस्फरसमुळे किती नुकसान होते?
व्हाइट फॉस्फरसच्या संपर्कात आल्यावर माणसांच्या त्वचेला तीव्र जळजळ जाणवते, ही जळजळ हाडांपर्यंत पोहोचू शकते. या जळजळीमुळे झालेल्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो आणि संसर्ग होण्याची शक्यता असते.
 
व्हाइट फॉस्फरसच्या जळजळीमुळे मानवी शरीराच्या केवळ 10 टक्के भागावर जखमा झाल्या तरी ते प्राणघातक ठरू शकतं.
 
त्याच्या संपर्कात आल्यावर माणसाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ शकतात.
व्हाइट फॉस्फरसमुळे झालेल्या दुखापतींमधून वाचलेल्यांना आयुष्यभर वेदना सहन कराव्या लागतात, त्यांची हालचालीवर परिणाम होतो आणि त्यांच्या शरीरावर उरलेल्या जखमांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
 
व्हाइट फॉस्फरसमुळे लागलेल्या आगीमुळे घरं आणि इमारतींचेही नुकसान होऊ शकतं, पिके नष्ट होतात आणि पशुधनही मारलं जातं.
 
व्हाइट फॉस्फरस संबंधित कायदेशीर आणि नैतिक प्रश्न
सशस्त्र संघर्षांमध्ये व्हाइट फॉस्फरसच्या वापरावर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीअंतर्गत अनेक बंधनं आहेत.
 
पारंपरिक शस्त्रास्त्रे वापराच्या (सीसीडब्ल्यू) प्रोटोकॉल III अंतर्गत नागरिक किंवा नागरी क्षेत्रांमध्ये आग लावणारे शस्त्र म्हणून व्हाइट फॉस्फरसचा वापर करण्यास मनाई आहे.
 
प्रोटोकॉल अंतर्गत, ते केवळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या तत्त्वांनुसार सिग्नलिंग, स्क्रीनिंग आणि चिन्हांकित करण्यासाठी वापरले जायला हवे.
 
सशस्त्र संघर्षांमध्ये पांढऱ्या फॉस्फरसच्या वापरावरून महत्त्वपूर्ण चर्चेला वाचा फोडली आहे, काहींनी नागरिक आणि पर्यावरणाला कमी हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने कडक नियम आणि अधिक देखरेखीची मागणी केली आहे.
 
सशस्त्र संघर्षांदरम्यान नागरिक आणि पर्यावरण या दोघांवर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी व्हाइट फॉस्फरसची शस्त्रे वापरताना सशस्त्र दलांनी सावधगिरी बाळगणे आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे आणि अधिवेशनांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, यावर अनेकदा चर्चा होताना दिसते.
 





















Published By- Priya Dixit