शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (12:20 IST)

न्यूझीलंड: व्हाईट आयलंड ज्वालामुखीचा उद्रेक, 'अनेक लोक बेपत्ता'

न्यूझीलंडमध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यानंतर "अनेक लोक बेपत्ता" असल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी सांगितलं.
 
उद्रेक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अनेक पर्यटक व्हाईट आयलंड किंवा व्हाकारी नावाच्या या ज्वालामुखीच्या कडावर चालताना दिसले होते. या ज्वालामुखीतून बाहेर काढण्यात आलेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं 
 
पोलिसांनी सांगितलं.
 
व्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. तरीही त्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज इथे गर्दी करतात. या ज्वालामुखीवरून पर्यटकांसाठी विशेष हवाई सफरीसुद्धा उपलब्ध आहेत.
 
एका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक होतो आणि सर्वत्र काळोख होतो.
 
"सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की साधारण शंभर लोक तिथे होते, मग आता असं वाटतं की 50हून कमी आहेत," पोलिसांनी सांगितलं. "यापैकी काही लोकांना आतून किनाऱ्यावर हलवण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती 
 
गंभीर आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत."
 
न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार "व्हाईट आयलंडच्या या उद्रेकाला भोवतालच्या परिसराला मोठा धोका आहे."
 
अशा प्रकारच्या धोक्यांची पूर्वसूचना देणाऱ्या जिओनेट (GeoNet) या वेबसाईटनुसार, घटनास्थळी असलेल्या यंत्रांनी हा धोका आणखी मोठा होईल, अशी कुठलीही शक्यता वर्तवलेली नाही.
 
मात्र यामुळे होणाऱ्या धुरापासून बचावासाठी लोकांनी या परिसरापासून दूर राहावे, शक्यतो घरांमध्येच, अशी सूचना प्रशासनाने जारी केली आहे.