1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (20:13 IST)

जिनपिंग पंतप्रधानपदाची सूत्रे नव्या नेत्याकडे सोपवणार का?

Xi Jinping
या आठवड्याच्या अखेरीस चिनी कम्युनिस्ट पक्षाची सर्वोच्च संघटना नॅशनल पीपल्स कॉन्फरन्सची बैठक पार पडणार आहे.चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वत:ला देशातील सर्व शक्तिमान नेता म्हणून प्रस्थापित केलंय. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. शी जिनपिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षात असे काही बदल केलेत ज्यामुळे त्यांच्याभोवती सत्तेचं केंद्र निर्माण झालं आहे. सध्या कम्युनिस्ट पक्षात त्यांना आव्हान देईल असा नेता दूरदूर पर्यंत दिसत नाही.
 
मात्र या बैठकीत काही बदल पाहायला मिळणार आहेत. 3000 प्रतिनिधींसोबतच्या या बैठकीत नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
 
देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी चीनच्या पंतप्रधानांवर असते. चीन ही अमेरिकेनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सैद्धांतिकदृष्ट्या बघायचं झाल्यास चीनमधील सत्ता वर्तुळात राष्ट्रपतींनंतर पंतप्रधान ही दूसरी सर्वात मोठी राजकीय व्यक्ती आहे.
 
या बैठकीतील पहिला दिवस रिटायर्ड होणाऱ्या विद्यमान पंतप्रधान ली केचियांग यांच्यासाठी राखीव असेल. पण बैठकीच्या शेवटी ली चियांग यांना पंतप्रधान बनवण्याची घोषणा होऊ शकते.
 
ली केचियांग आणि ली चियांग यांची पक्षनिष्ठेमध्ये बराच फरक आहे. विशेषतः शी जिनपिंग यांच्यावरील निष्ठेच्या बाबतीत. शी जिनपिंग यांनी दहा वर्षापूर्वी भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. यामध्ये त्यांच्या पक्षातील प्रतिस्पर्धी गटातील बड्या नेत्यांचाही सफाया करण्यात आला.
 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या पार्टी काँग्रेसच्या बैठकीत सात सदस्यीय पॉलिटब्युरो स्थायी समितीवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.
 
या नव्या नियुक्त्यांचा अर्थ काय?
या नव्या नियुक्त्यांचा अर्थ बघायला गेलं तर हे स्पष्ट होतं की, देशातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये आता फक्त जिनपिंग निष्ठावंतांचा समावेश असेल.
 
या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या पार्टी काँग्रेसच्या बैठकीत सरकारच्या विविध खात्यांचे आणि मंत्रालयांचे प्रमुख बदलले जातील. आणि या पदांवर जिनपिंग यांच्याच निष्ठावंतांना संधी मिळेल असं म्हटलं जातंय.
 
आता हे निष्ठावंत सोडून पक्षातील इतर लोक मंत्रिपद सांभाळण्याच्या लायक नाहीत अशी काही गोष्ट नाहिये. पण शी जिनपिंग त्यांचा सडेतोड सल्ला स्वीकारण्यास तयार होतील का?
 
बीबीसीशी बोलताना एका अनुभवी व्यावसायिकाने सांगितलं की, "हे वातावरण बघता एका बाजूला असं वाटतं की, नवं नेतृत्व आणून जिनपिंग त्यांना हवं ते करू शकतील, पण दुसरीकडे ते स्वतःचं तयार केलेल्या इको चेंबरमध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही."
 
पण चीनची वाटचाल ज्या दिशेने सुरू आहे ते बघता या नियुक्त्यांचे कोणते अर्थ घेता येतील?
 
तर पक्षात ली चियांग प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ते शांघायमध्ये पक्षप्रमुख राहिलेत. गेल्या वर्षी चीनच्या आर्थिक राजधानीत कोरोना काळात कडक लॉकडाऊन लागू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
 
या लॉकडाऊनमध्ये शांघायमधील लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे शी जिनपिंग यांनी जेव्हा त्यांची पक्ष नेतृत्वात दुसऱ्या क्रमांकावर निवड केली तेव्हा लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता.
 
लोकांच्या मनात लॉकडाऊनविषयी फारसा आकस नव्हता. पण हे लॉकडाऊन ज्या पद्धतीत हाताळण्यात आलं त्यामुळे चिनी लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
 
लॉकडाऊन मध्ये केलेल्या सक्तीमुळे सामानाची ने-आण करणारे लोक सुद्धा घरामध्ये अडकून पडले. त्यामुळे या काळात घरामध्ये कैद असलेल्या कोट्यवधी जनतेपर्यंत ना अन्नधान्य पोहोचलं ना औषध.
 
खाण्यापिण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. पण डिलिव्हरी नॉर्मल झाल्यावर लोकांनी सडलेल्या टोमॅटोचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली.
 
लोक अपरिहार्यता म्हणून टोमॅटोवर आपली वेळ मारून नेत असल्याचा अंदाज वर्तवला जात होता.
 
पण नंतर अशी वेळ आली की लोक या लॉकडाऊनला वैतागले. त्यांना घरात बंदिस्त ठेवण्यासाठी जे नियम लावले होते ते त्यांनी तोडायला सुरुवात केली.
 
लोक गार्ड्सशी भांडू लागले. सरकारच्या झिरो कोव्हिड पॉलिसीचा लोक तिरस्कार करू लागले.
 
पण ली चियांग यांची जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून निवड झाली तेव्हा मात्र लोकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. लोकांचं म्हणणं होतं की, कोरोना लॉकडाऊनच्या काळात लॉजिस्टिक मॅनेजमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरलेल्या या व्यक्तीला देश चालवण्याची जबाबदारी कशी दिली जाऊ शकते.
 
पण ली चियांग यांचा भूतकाळ बघता ते अगदीच वेगळे व्यक्ती वाटतात. मागच्या काही वर्षात ते उद्योग जगतात इनोव्हेटरच्या रूपात पुढे यायला लागले आहेत. पक्षाने आखलेल्या कठोर धोरणांमधून मार्ग काढण्यासाठी त्यांचा नावलौकिक आहे.
 
चीनमधील युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख जोर्ग वुटके सांगतात की, "ते स्मार्ट ऑपरेटर आहेत. पण शी जिनपिंग यांच्या प्रति असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे त्यांना हे पद मिळालंय. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ली चियांग यांना उडी मारायला सांगितली तर ते अगदी उडी सुद्धा मारतील."
 
वुटके यांचं मत आहे की, 1990 पासून ते या व्यवसायात आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध राहिलेत.
 
ते सांगतात की, उद्योग असो वा सामान्य ग्राहक, दोघांनाही झिरो-कोविड पॉलिसीचा समान परिणाम जाणवतोय.
 
ते पुढे सांगतात की, "झिरो कोविड पॉलिसीचा जो काही ट्रॉमा बसलाय त्यामुळे लोक पैसे खर्च करायला, जोखीम घ्यायला घाबरत आहेत. आणि हीच मोठी चिंतेची बाब आहे. लोक अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेत आहेत. विशेषतः शांघायमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येतायत. परदेशी गुंतवणुकीसाठी हे शहर तितकंस आकर्षक राहिलेलं नाही."
 
पण परिस्थितीसाठी केवळ ली चियांग जबाबदार आहेत असं वुटके यांना वाटत नाही. इतर व्यावसायिकही वुटकेंच्या या मताशी सहमत आहेत.
 
टेस्ला शांघायमध्ये आणण्याचं श्रेय ली चियांग यांना दिलं जातं. टेस्लाचा अमेरिकेबाहेर हा पहिलाच कारखाना होता. कंपनीला त्यांच्याच व्हेंचरसाठी परवानगी देण्यात आली. त्यासाठी चिनी भागीदार कंपनीची अट ठेवण्यात आली नव्हती. अशी अट केवळ अन्य कार कंपन्यांसाठी ठेवण्यात आली होती.
 
काही ठिकाणी ली चियांग हे अधिक उदारमतवादी असल्याचं दिसतं. थोडक्यात ते नियम बदलण्यास तयार असतात.
 
पण त्यांना नियमात बदल करण्याइतपत तरी अधिकार मिळतील की नाही हे अजून स्पष्ट नाहीये. त्यांना शी जिनपिंग यांचा पाठिंबा असल्याने ते असे निर्णय घेताना मागे पुढे पाहणार नाहीत असं बोललं जातंय.
 
2016 मध्ये ली चियांग यांना पूर्व चीनमधील श्रीमंत अशा जियांगसु प्रांताचं पक्ष सचिव बनवण्यात आलं होतं. या प्रांतात मोठमोठ्या टेक्नोलॉजीच्या कंपन्या आहेत. त्यावेळी त्यांनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा आणि इतर व्यावसायिक नेत्यांची भेट घेतली होती. या प्रांतातील व्यावसायिक वातावरण आणखीन चांगलं कसं करता येईल यासाठी या भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या.
 
पण तेव्हाचा काळ थोडा वेगळा होता. अलिकडच्या काही वर्षांत, शी जिनपिंग यांनी या उद्योगपतींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यांना असं वाटत होतं की या कंपन्या एवढ्या शक्तिशाली आहेत की त्या आपलं नुकसान करतील. त्यामुळे अशा बलाढ्य कंपन्यांचे प्रमुख गायब होण्याच सत्र वाढतच चाललंय. अलीकडेच अब्जाधीश बँकर बाओ फॅन गायब झालेत. त्यांनी अनेक टेक कंपन्यांसोबत करार केले होते.
 
ली चियांग यांनी भूतकाळात अशा कृतींना प्रोत्साहन नक्कीच दिलं नसणार.
 
शी जिनपिंग आणि ली चियांग बऱ्याच काळापासून एकत्र
जियांगसुच्या आधी चियांग झेजियांगमध्ये होते. त्यावेळी शी जिनपिंग या प्रांताचे पक्षप्रमुख होते. तर ली चियांग त्यांचे चीफ ऑफ स्टाफ होते. पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी हे दोघेजण रात्री उशिरापर्यंत काम करत असायचे.
 
ली केचियांग हे जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांना राष्ट्रपतीपदाचं दावेदार देखील मानलं जातं. शी जिनपिंग यांच्याऐवजी केचियांग राष्ट्रपती असते तर चीनची आजची परिस्थिती वेगळी असती.
 
ली केचियांग हे स्वतः मोठे अर्थतज्ञ आहेत. चीनमध्ये झालेल्या सांस्कृतिक क्रांतीनंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. ली केचियांग यांचा कम्युनिस्ट पार्टीतला प्रवास युथ लीगपासून सुरू झाला आणि नंतर ते पक्षात उच्च स्थानावर पोहोचले. कम्युनिस्ट युथ लीग पक्षाचं पॉवरहाऊस मानलं जातं.
 
मात्र जिनपिंग यांच्याशी असलेल्या सत्तास्पर्धेत त्यांनी राष्ट्रपतीपद गमावलं आणि पंतप्रधानपदापर्यंतच मर्यादित राहिले.
 
त्यांनी चिनी शहरांच्या गल्ल्यांमध्ये वस्तू विकणाऱ्यांना पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली होती. यातूनच चीनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचं म्हटलं जातं.
 
असं म्हटलं जातं की, यामुळे चीनमधील व्यावसायिक वातावरण अधिक उत्साही झालं होतं. मात्र या विक्रेत्यांना पोलिसांमुळे पुन्हा आपला बोजाबिस्तारा गुंडाळावा लागला होता.
 
ली केचियांग यांनी हू जिंताओ यांना समर्थन दिलं होतं. मागच्यावेळी पार पडलेल्या पार्टी काँग्रेसमध्ये शी यांच्या आदेशानंतर हु जिंताओ यांना मंचावरून हटवण्यात आलं होतं.
 
मात्र तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना मंचावरून बाहेर नेण्यात आलं की पक्षात पदोन्नती मिळाली नाही म्हणून त्यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना बाहेर नेण्यात आलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
 
मात्र हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि संपूर्ण जगाने पाहिला होता. बाहेर जात असताना त्यांनी ली केचियांग यांच्या पाठीवर मैत्रीपूर्ण थाप दिली आणि पंतप्रधानांनी सुद्धा मान हलवून त्यांना उत्तर दिलं होतं.
 
ली केचियांग यांना त्यांच्या मजबूत आर्थिक ट्रॅक रेकॉर्डसाठी ओळखलं जातं. पण झिरो-कोविड पॉलिसीमुळे त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे दिवस वादग्रस्त ठरले.
 
ते म्हणाले होते की, अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी काम करावं.
 
झिरो कोविड पॉलिसीमुळे झालेली उलथापालथ, रिअल इस्टेट क्षेत्रातील संकट, बेरोजगारीचा वाढता ग्राफ, टेक्नोलॉजी क्रॅकडाऊन आणि सर्व्हिस इंडस्ट्रीचं झालेलं नुकसान यामुळे चीन हादरला आहे.
 
वुटके सांगतात की, "अर्थव्यवस्था पूर्णपणे डंकाला लागली असताना देखील माओ वाचले कारण त्यावेळी लोकांकडे गमावण्यासारखं फार काही नव्हतं."
 
"पण आता लोकांचं राहणीमान सुधारलंय. एवढं असून देखील मध्यमवर्गीय पालक चिंतेत आहेत कारण त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळणार नाही."
 
मात्र यंदाची नॅशनल पीपल्स काँग्रेस आणि त्यातल्या त्यात लाभाची पदं मिळवणाऱ्या लोकांवर जनतेचं लक्ष राहील.
 
पण जर अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर चीनच्या नेत्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. जर सगळ्याच आघाड्यांवर चीनची कामगिरी चांगली होत नसेल तर मात्र प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात होऊ शकते.
 
Published By- Priya Dixit