1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. world map has changed Europe and America will look smaller India has openly supported the move

जगाचा नकाशा बदलला! आफ्रिका खंड मोठा, अमेरिका-युरोप लहान; भारताचे निर्णयाला समर्थन

संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) जगाचा नवा नकाशा स्वीकारण्यासाठी मतदान केले आहे, ज्याचा उद्देश खंडांचे मूळ आकार अधिक अचूकपणे दर्शवणे हा आहे. या निर्णयामुळे आफ्रिका खंडाचे आकारमान मोठे आणि अधिक ठळक दिसून येईल, तर उत्तर अमेरिका आणि युरोपचा आकार पूर्वीपेक्षा लहान दिसेल. या पावलाला अमेरिकेने (US) विरोध केला आहे. या प्रस्तावाच्या बाजूने १६४ देशांनी मतदान केले, तर अमेरिकेने याविरोधात मतदान केले आणि ६ देश तटस्थ राहिले.
 
'इक्वल अर्थ' नकाशा म्हणजे काय?
'इक्वल अर्थ कार्टोग्राफिक प्रोजेक्शन' (Equal Earth cartographic projection) म्हणून ओळखला जाणारा हा नकाशा जगाचे भौगोलिक प्रतिनिधित्व अधिक अचूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात सर्व सदस्य देशांना १५६९ मध्ये डच कार्टोग्राफर गेरार्डस मर्केटर यांनी सागरी प्रवासासाठी तयार केलेल्या पारंपारिक 'मर्केटर प्रोजेक्शन' (Mercator projection) नकाशाऐवजी 'इक्वल अर्थ' नकाशा वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
नकाशा बदलण्याची गरज का भासली?
पारंपारिक 'मर्केटर नकाशा' हा जमिनीचे आकार आणि कोन योग्य ठेवण्यासाठी डिझाइन केला गेला होता, परंतु तो खंडांचे वास्तविक क्षेत्रफळ अचूकपणे दाखवत नाही. गोल पृथ्वी सपाट कागदावर दाखवताना हा फरक पडतो. यामध्ये उत्तर ध्रुवाकडील प्रदेश मोठे दिसतात, तर विषुववृत्ताजवळील प्रदेश लहान दिसतात. परिणामी, युरोप आणि उत्तर अमेरिका त्यांच्या मूळ आकारापेक्षा खूप मोठे दिसतात, तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका लहान दिसतात.
 
उदाहरणाच सांगायचे तर, जुन्या नकाशामध्ये ग्रीनलँड हा संपूर्ण आफ्रिका खंडाएवढा मोठा दिसतो, तर प्रत्यक्षात आफ्रिका खंड हा ग्रीनलँडपेक्षा १४ पट मोठा आहे.
 
अमेरिकेचा विरोध का?
अमेरिकेने या प्रस्तावावर टीका करत म्हटले आहे की, युएन महासभेने अधिक गंभीर जागतिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अमेरिकेच्या प्रतिनिधी यारिना फेरेन्सेव्हिच यांनी सांगितले की, "अशा प्रकारच्या उपक्रमांमुळेच या संस्थेची विश्वासार्हता कमी होत आहे. खऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ही संस्था १६ व्या शतकातील नकाशा प्रकल्पांवर आणि त्याशी संबंधित वादांवर चर्चा करत आहे."
 
नव्या नकाशाचे वैशिष्ट्य काय?
''इक्वल अर्थ' नकाशा २०१८ मध्ये कार्टोग्राफर्सच्या एका गटाने विकसित केला होता. हा नकाशा आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि ओशनिया या प्रदेशांना त्यांचा वास्तविक आकार देतो. हा नकाशा खंडांचे मूळ क्षेत्रफळ जसेच्या तसे राखतो आणि ग्लोबवर जसे आकार दिसतात तसेच दाखवण्याचा प्रयत्न करतो.
 
प्रस्तावाचे सह-प्रायोजक असलेल्या फ्रान्सनेही आता जुना मर्केटर नकाशा वापरणे बंद करण्याची घोषणा केली आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, "नकाशा बदलल्याने जग बदलत नाही, परंतु चुकीचे चित्र दुरुस्त करणे हे सत्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे."
पुढील लेख
उपांत्यपूर्व फेरीत स्पर्धेत अनाहत सिंग मलेशियाच्या शिवसंगारीकडून पराभूत