1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Jalgaon family brutally murdered in Gujarat

जळगावच्या कुटुंबाची गुजरातमध्ये निर्घृण हत्या; गाडी थांबवून कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू तर दोन मुले बेपत्ता

गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात जळगावच्या पाटील कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली आहे. कामाच्या शोधात निघालेल्या या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील पाटील कुटुंबातील सहा जणांना गुजरातच्या सुरत जिल्ह्यात कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरातील पाटील कुटुंब कामाच्या शोधात गुजरातकडे निघाले होते. २१ नोव्हेंबर रोजी जळगावच्या एरंडोल तालुक्यातील नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि चार मुले चारचाकी गाडीने कामाच्या शोधात सुरतकडे निघाले होते. सुरत जिल्ह्यातील बारडोली परिसरातील उवा गावाजवळ दुसऱ्या वाहनातून आलेल्या चार जणांनी त्यांची गाडी अडवली आणि सर्वांना जबरदस्तीने उकाई-काकरापार कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिले या घटनेत नितीन पाटील, कविता पाटील आणि त्यांची ९ वर्षांची मुलगी स्वीटी यांचे मृतदेह आढळले. १३ वर्षीय मुलाने कालव्यातील पाईपचा आधार घेत आपला जीव वाचवला. कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात केलेल्या शोधमोहिमेत तीन मृतदेह बाहेर काढले आहे. यामध्ये नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि त्यांच्या ९ वर्षीय मुलीचा समावेश आहे.तसेच या कुटुंबातील १३ वर्षीय मुलगा (करण) कालव्यातील पाईप पकडून बचावला. बाहेर आल्यानंतर त्याने जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या मोठ्या बहिणीला संपर्क साधला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तसेच या घटनेतील १६ वर्षीय मोठा मुलगा हरीश आणि अवघ्या २ वर्षांचा चिमुकला प्रथमेश अद्याप बेपत्ता आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून कालव्यात त्यांचा शोध सुरू आहे.

तसेच सुरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींना पकडण्यासाठी ६० पोलिसांची ६ विशेष पथके तयार करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुढील लेख
हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्यामध्ये वाद; प्रियकराने मैत्रिणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले