1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

महर्षी महेश योगी यांचे निधन

पाश्चात्य देशाला योग काय आहे, याचा परिचय घडवून देणारे महर्षी महेश योगी यांचे मंगळवारी रात्री हॉलंडजवळ एका गावात निधन झाले. त्यांचे वय त्यावेळी ९१ होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून ते अध्यात्मिक गुरू दीपक चोप्रा यांच्यापर्यंत अनेक त्यांचे शिष्य आहेत.

प्रसिद्ध संगीत बॅंड बीटल्सचे ते गुरू होते. गेल्या महिन्यातच त्यांनी आपल्या संस्थेचे प्रमुखपद सोडले होते. निशब्दतेच्या क्षेत्रात काम करायचे असल्याने आपण हे क्षेत्र सोडत आहोत, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

त्यांचा जन्म जबलपूर येथे झाला होता. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळवली होती. त्यानंतर ते योगसाधनेसाठी हिमालयात गेले होते. १९५५ मध्ये त्यांनी योगाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ज्योर्तिमठाचे शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी महेश वर्मा यांना बाल ब्रह्मचारी अशी उपाधी देऊन त्यांचे महर्षी महेश योगी असे नामकरण केले.

महर्षी महेश योगी यांनी शंकराचार्यांच्या उपस्थितीत रामेश्वरम येथे दहा हजार बाल ब्रह्मचारींना अध्यात्मिक योग व साधनेची दीक्षा दिली.१९५८ मध्ये ते अमेरिकेत गेले. तेथेच १९६७ मध्ये त्यांनी योगसाधना केली.

अमेरिकेतील वित्रान व तंत्रज्ञान संस्थांनी तसेच मेडिकल सायन्सनेही त्यांच्या यौगिक क्रियांना व साधनेला मान्यता दिली होती.

अमेरिकेनंतर महर्षी महेश योगी नेदरलॅंडला गेले व तेथेच स्थायिक झाले. त्यांनी अमेरिका व नेदरलॅंडमध्ये रामनामाचा प्रचार केला.

त्यांच्या जगभरात अनेक संस्था आहेत. त्यांच्या निधनासंदर्भात बोलताना योग गुरू बाबा रामदेव यांनी दुःख व्यक्त केले आहे. महर्षींच्या जाण्याने भारतीय संस्कृतीची हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ब्रह्म निर्वाण, भारतीय संस्कृती व योगाचा जगभरात प्रचार केला, असे त्यांनी म्हटले.