इंडियन प्रीमिअर लीगचा चौदावा आणि कोरोनामुळे स्थगित झालेला हंगाम सुरू होतो आहे. कोरोना संसर्गामुळे अर्धवट राहिलेल्या हंगामातील सामने आता युएईत खेळवण्यात येणार आहेत.
काही संघांतील खेळाडू युएईत दाखल झाले आहेत तर काही संघांचे खेळाडू देशात एकत्र जमले आहेत. क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते युएईला रवाना होतील.
2 मे रोजी आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला शेवटचा सामना झाला होता. त्यानंतर खेळाडूच कोरोना पॉझटिव्ह आढळल्याने हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन उर्वरित हंगाम युएईत होणार आहे.
पंजाबला धक्का; 22 कोटी मानधनाचे 2 खेळाडू बाहेर
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन एलिसला करारबद्ध केलं आहे. रिले मेरडिथ आणि झाय रिचर्डसन उपलब्ध नसल्याने पंजाबने हा निर्णय घेतला आहे.
एलिसने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशात पदार्पणाच्या लढतीतच हॅट्ट्रिक घेण्याची करामत केली होती. ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात राखीव म्हणून त्याची निवड झाली आहे. अचूकतेसह प्रचंड वेग हे एलिसचं वैशिष्ट्य आहे.
हासारंगा, चमीरा बेंगळुरूच्या ताफ्यात
दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने संघात वानिंदू हासारंगा, दुश्मंत चमीरा आणि टीम डेव्हिस यांना समाविष्ट केलं आहे. अडम झंपा, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स उपलब्ध नसल्याने बेंगळुरूने नव्या खेळाडूंना समाविष्ट केलं आहे. न्यूझीलंड संघात निवड झाल्याने फिन अलन तसंच स्कॉट कुगलेजिन हेही उपलब्ध नसतील.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात हासारंगाच्या फिरकीने तसंच फलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केलं. फिरकीपटू झंपा अनुपलब्ध असल्याने बेंगळुरूने हासारंगाला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 24वर्षीय हासारंगाने 4 टेस्ट, 26 वनडे तर 22 ट्वेन्टी-20 सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
सुसाट वेगासह गोलंदाजी करणारा 29वर्षीय दुश्मंत चमीरा आता बेंगळुरूकडून खेळताना दिसेल. गेल्या हंगामात बेंगळुरूने श्रीलंकेच्याच इसरू उदानाला समाविष्ट केलं होतं. मात्र हंगाम संपल्यानंतर उदानाचा करार वाढवण्यात आला नाही. 11 टेस्ट, 34 वनडे आणि 28 ट्वेन्टी-20 सामन्यांचा असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला चमीरा सध्या उत्तम फॉर्मात असून त्याचा वेग फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सिंगापूरचा आक्रमक फलंदाज टीम डेव्हिड बेंगळुरूकडून खेळणार आहे. बिग बॅश आणि पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत आपल्या बॅटची ताकद दाखवून देणारा डेव्हिड बेंगळुरूसाठी उपयुक्त ठरू शकतो.
इंग्लंडमध्ये नुकत्याच आटोपलेल्या हंड्रेड स्पर्धेतही तो खेळला आहे. दीडेशहून अधिक स्ट्राईक रेट हे त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे.
दरम्यान बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणास्तव हे पद सोडलं आहे. क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माईक हेसन आता प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत असतील.
बटलरऐवजी ग्लेन फिलीप
गरोदर पत्नी बाळाला जन्म देणार असल्याने तिच्याबरोबर थांबायचं असल्याने जोस बटलर उर्वरित हंगामात दिसणार नाही.
राजस्थान रॉयल्सला उर्वरित हंगामात बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर यांची अनुपस्थिती जाणवणार आहे. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या हंगामात लायम लिव्हिंगस्टोन बायोबबलला कंटाळून मायदेशी परतला होता. तो उर्वरित हंगामात खेळणार का याविषयी स्पष्टता नाही.
बटलरऐवजी राजस्थानने न्यूझीलंडच्य ग्लेन फिलीपला संघात समाविष्ट केलं आहे. फिलीप कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळून नंतर युएईत दाखल होईल. न्यूझीलंडसाठी 25 ट्वेन्टी-20 सामने खेळलेल्या फिलीपने 46 चेंडूत शतक झळकावले होतं.
श्रेयस अय्यर, नटराजन फिट
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर तसंच सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी.नटराजन दुखापतग्रस्त झाले होते.
श्रेयस दुखापतग्रस्त झाल्याने दिल्लीने कर्णधारपद ऋषभ पंतकडे सोपवलं होतं. श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. नटराजनच्या पायाला लागलं होतं.
रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता दोघेही फिट आहेत आणि आपापल्या संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.