मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (19:47 IST)

IPL 2022: रैना बीती जाएं... आयपीएल लिलावात 'अनसोल्ड'

आयपीएल लिलावात सुरेश रैनाचं नाव आल्यावर सगळ्या नजरा 'चेन्नई सुपर किंग्स'च्या टेबलकडे वळल्या. चेन्नई संघव्यवस्थापनाच्या टेबलवर शांतता होती. खेळाडू विकत घ्यायचा असेल तर पेडल उंचवावं लागतं. पिवळ्या रंगाचं पेडल टेबलवर तसंच राहिलं. चेन्नईचा नूर पाहून बाकी संघांनाही सूचक मौन बाळगलं आणि काही मिनिटातच 'सुरेश रैना-अनसोल्ड' हे शब्द लिलावकर्त्याने उच्चारले.
 
त्या शब्दांसह आयपीएल स्पर्धा यशस्वी करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या रैनाची कारकीर्द थांबल्याचं स्पष्ट झालं. काही दिवसांपूर्वीच रैनाच्या वडिलांचं निधन झालं. काही तासातच आयपीएल लिलावाच्या पटावर कुठल्याही संघाने त्याला विकत घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. नशिबाचे फेरे कसे फिरतात याचं हे जिवंत उदाहरण.
 
सहकाऱ्याचं शतक झाल्यावर किंवा त्याने पाच विकेट घेतल्यावर रैनाला बघावं. ज्याने शतक केलं किंवा पंचक मिळवलं त्यापेक्षा जास्त आनंद सुरेश रैनाला झालेला असे.
 
ट्वेन्टी20 प्रकारात गोलंदाजांची कत्तल होते. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी असेल तर गोलंदाजांना प्रहाराला सामोरं जावं लागतं. एखाद्या षटकात मार पडला तर त्या गोलंदाजांना शांत करून, त्याला प्रोत्साहन देणारा पहिला खेळाडू रैना असे. एखाद्या खेळाडूने झेल टिपला किंवा रनआऊट केला तर त्याचं अभिनंदन करणारा पहिला खेळाडू रैना असे. गोलंदाजाला विकेट मिळाल्यानंतर धावत येऊन त्याचे केस उडव, पाठीवर शाबासकीची थाप देणारा पहिला खेळाडू रैना असे. रैना चेन्नईचं चैतन्य होतं. रैनाच्या देहबोलीतून चेन्नई कॅम्पमधलं वातावरण समजत असे.
 
दुसऱ्याच्या आनंदात स्वत:चा आनंद पाहणारा रैना दुर्मीळ होता. काश्मीरी पंडित कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला रैना लहानाचा मोठा झाला उत्तर प्रदेशात. घरची परिस्थिती सर्वसाधारण. उत्तर प्रदेशातल्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये राहून खेळाचे संस्कार अंगी बाणवलेला रैना कधी दांडगटभाई झाला नाही. त्याचं लक्ष खेळावर राहिलं.
 
माणसांना टोपणनावं सवयींवरून, लकबींवरून मिळतात. एखादा खेळाडू त्या विशिष्ट स्पर्धेचं अंशरुप होऊन जावा तसं रैना झाला होता. म्हणूनच त्याला मिस्टर आयपीएल म्हटलं जातं. उन्हाळा सरतो, पाऊस येतो हे जितकं नैसर्गिक आहे तितकं आयपीएल स्पर्धेचे पडघम वाजू लागणं, रैनाने त्यात खेळणं-बॅटने मैदान गाजवणं नैसर्गिक आहे.
 
रैना आयपीएल स्पर्धेत दोन संघांसाठी खेळला असला तरी तो अख्ख्या स्पर्धेचाच शुभंकर होता. भारतीय संघाला सध्या एक समस्या भेडसावते आहे. ती म्हणजे गोलंदाजी करू शकेल असा फलंदाज नसणं. रैनाने सगळी वर्ष हे काम चोखपणे केलं. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केली. जेव्हाही कर्णधार चेंडू सोपवत असे- त्याने बॉलिंगही केली. फिल्डर तर तो अफलातून होताच.
रैना एक अनुभव आहे. त्याला मरगळलेलं कधीच पाहिलं नाही. गली आणि पॉइंट या दोन प्रदेशांची तटबंदी सांभाळं सोपं नाही. रैनाने ती प्राणपणाने जपली. आकाशाला गवसणी घालायला गेलेला चेंडू टिपणं सोपं नाही. रैनाच्या नावावर अनेक चित्तथरारक झेल आहेत. सलामीवीरांनी गाशा गुंडाळल्यावर तिसऱ्या क्रमांकावरच्या माणसाला यावं लागतं. रैना असा अनेकदा आला. त्याने संघाला तारलं. रैना चेन्नईचा विश्वास होता. धोनीचा गो टू मॅन होता. रैनाला मैदानावर पाहिलं की सळसळती ऊर्जा काय असते ते जाणवायचं.
 
भारतीय क्रिकेटमधल्या एका मोठ्या स्थित्यंतराचं रैना साक्षीदार आहे. गांगुली-तेंडुलकर-द्रविड-लक्ष्मण-सेहवाग यांच्या काळात खेळायला सुरुवात केलेला रैना धोनी-कोहली-रोहित यांच्या काळातही खेळत होता. आयपीएलपूर्व काळातही रैना होता आणि आयपीएलमधली कोटीच्या कोटी उड्डाणंही त्याने पाहिली. स्वत:च्या कामगिरीवर कोणत्याही आयपीएल संघाचा रैना कर्णधार होऊ शकला असता. पण धोनीसेनेत राहून रैना त्याचा उजवा हात झाला. चेन्नई संघावर बंदीची कारवाई झाली तेव्हा रैना गुजरात संघाचा कर्णधार झाला. त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. पण कारवाई पूर्ण होताच रैना पुन्हा चेन्नईकडे परतला. उत्तर प्रदेशात वाढलेला रैना चेन्नईकरांच्या गळ्यातला ताईत झाला.
 
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रैना चौथ्या स्थानी आहे. 14 हंगाम खेळल्यानंतर रैनाची ही आकडेवारी त्याच्या सातत्याचं द्योतक आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात तो जुना रैना दिसलाच नाही. त्याचे फटके फिल्डरच्या हातात जाऊन विसावू लागले. तो त्रिफळाचीत होऊ लागला. त्याचे पूल, हूक मिसहिट ठरू लागले.
 
रैनाला कधी संघातून वगळावं लागेल असं क्रिकेटरसिकांना कधीही वाटलं नसेल. पण तसं झालं. गेल्या हंगामात रैना बाराच सामने खेळला. रैनाचा ढासळत जाणारा फॉर्म पाहून चेन्नईने रैनाच्या जागी रॉबिन उथप्पाला घेतलं. रैनाचा बालेकिल्ला असणारा नंबर तीन चेन्नईने मोईन अलीला दिला. त्याने या संधीचं सोनं केलं. चेन्नईने मोईन अलीला रिटेन केलं तेव्हाच रैनाचा आयपीएल प्रवासाचा शेवट जवळ आल्याचं स्पष्ट झालं.
 
आयपीएल, रैना आणि सातत्य यांचं एक वेगळंच गुळपीठ आहे. यासंदर्भातली एक आकडेवारी अचंबित करणारी आहे. रैना आयपीएलचे सलग 143 सामने खेळला. 9 वर्षानंतर रैना आयपीएलची मॅच खेळू शकला नाही. त्याचं कारणही तो फिट नव्हता असं नाही. मुलीच्या जन्मावेळी बायकोबरोबर असावं म्हणून तो नेदरलँड्सला रवाना झाला म्हणून मॅच मिस केली. एवढी वर्ष सतत सगळे सामने खेळायला कामगिरीत सातत्य असावं लागतं. आयपीएल स्पर्धेत ढिगावरी खेळाडू येतात, जातात. रैना अविचल खडकासारखा राहिला.
2020 मध्ये आयपीएल स्पर्धेचा ताफा कोव्हिडच्या कारणामुळे युएईला रवाना झाला. सुरेश रैनाही चेन्नई संघाचा भाग म्हणून रवाना झाला. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधी वैयक्तिक कारणांमुळे रैना मायदेशी परतला. अख्खा हंगाम रैना खेळला नाही असं पहिल्यांदाच झालं. रैना नसणं, अन्य खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफला कोरोना होणं यातून चेन्नई सावरलंच नाही. त्यावर्षी चेन्नईला नॉकआऊट राऊंडसाठी पात्रही ठरता आलं नाही. रैनाचं नसणं चेन्नईला चांगलंच महागात पडलं. काय कारणांमुळे रैना परतला याबाबत त्याने स्वत: आणि चेन्नई संघव्यवस्थापनाने काहीही सांगितलं नाही.
 
चेन्नई आणि सुरेश रैना यांचे ऋणानुबंध दुरावले ते कायमसाठीच. ट्वेन्टी20 लीग स्पर्धांमध्ये संघ बदलत राहतात. पण चेन्नईचा संघ एखाद्या मोठ्या कुटुंबाप्रमाणे आहे. 2008 पासून धोनीकडे या संघरुपी कुटुंबाची धुरा आहे. सुरेश रैना या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. नव्या खेळाडूंना हुरुप देणं, धोनीला त्याच्या योजना राबवण्यात मदत करणं, खेळाडूंचा उत्साह वाढवणं ही व्यवस्थापन स्वरुपाची कामं रैनाने मनापासून केली. चेन्नईने या स्पर्धेत अद्भुत सातत्य राखलं आहे. ते राखण्यात धोनीच्या बरोबरीने रैनाचा सिंहाचा वाटा आहे.
 
हसरा चेहरा, बोलके डोळे, स्प्रिंग लावल्यागत पळणारे पाय, प्रचंड ऊर्जा हे सगळं लेवून सातत्याने चांगलं खेळणाऱ्या रैनाने जगभरातल्या क्रिकेटरसिकांवर गारुड घातलं. अनसोल्ड घोषणेसह हे चैतन्य मैदानापल्याड गेलं आहे.