शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (09:35 IST)

IPL Auction 2022: सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. या लिलावाच्या निमित्ताने सगळ्याच संघांचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.
 
भारतीय खेळाडूंसह जगभरातील असंख्य खेळाडूंवर बोली लागेल आणि काहींची कोटीच्या कोटी उड्डाणं होतील. लिलावाबाबतचे सगळे तपशील जाणून घेऊया
 
लिलाव कधी?
15व्या हंगामासाठी संघांना खेळाडू मिळवून देणारा महालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूत होणार आहे.
 
लिलावात किती खेळाडू?
क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये अतिशय लोकप्रिय अशा या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू उत्सुक असतात. दीड महिन्यात वर्षभराची पुंजी मिळवून देणारी स्पर्धा असंही आयपीएलचं वर्णन केलं जातं.
 
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार लिलावासाठी 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली होती. चाळणी प्रक्रियेनंतर अंतिम लिलावात 590 खेळाडू असणार आहेत.
 
370 भारतीय तर 220 विदेशी खेळाडूंची नावं लिलावात आहेत. असोसिएट देशांचे 7 खेळाडू रिंगणात आहेत.
 
लिलावात अफगाणिस्तान (17), ऑस्ट्रेलिया (47), बांगलादेश (5), इंग्लंड (24), आयर्लंड (5), न्यूझीलंड (24), दक्षिण आफ्रिका (33), श्रीलंका (23), वेस्ट इंडिज (34), झिम्बाब्वे (1), नेपाळ (1), अमेरिका (1), नामिबिया (3), स्कॉटलंड (1)
 
48 खेळाडूंनी स्वत:ची बेस प्राईज 2 कोटी निश्चित केली आहे. 20 खेळाडूंची बेस प्राईज 1.5 कोटी तर 34 खेळाडूंनी 1 कोटी बेस प्राईज ठेवली आहे.
 
दक्षिण आफ्रिकेचा 42 वर्षीय फिरकीपटू इम्रान ताहीर लिलावातील सगळ्यात मोठ्या वयाचा खेळाडू असणार आहे. अफगाणिस्तानचा नूर अहमद हा 17 वर्षीय खेळाडू लिलावातला सगळ्यात लहान वयाचा खेळाडू असणार आहे.
 
कोणत्या संघांकडे किती पैसे?
लिलावासाठी प्रत्येक संघाकडे किती पैसे आहेत यावर सगळं अवलंबून असतं. ज्या संघांनी 4 खेळाडू कायम केले आहेत त्यांच्याकडे लिलावात कमी पैसे उपलब्ध आहेत.
 
चेन्नई सुपर किंग्स (48), दिल्ली (47.5), कोलकाता (48). मुंबई (48), पंजाब किंग्ज (72), राजस्थान रॉयल्स (62), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (57), सनराझझर्स हैदराबाद (68) सर्व आकडे कोटींमध्ये आहेत.
 
पंजाब किंग्ज संघाकडे लिलावात प्रचंड पैसा हाताशी असणार आहे. सनरायझर्स हैदराबादलाही चांगला संघ बांधण्यासाठी लिलावात पुरेसा पैसा आहे. बाकी संघांनी प्रमुख खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांच्याकडे लिलावात मर्यादित रक्कम असेल.
 
लखनौ-अहमदाबादचं पदार्पण
यंदाच्या हंगामापासून संघांची संख्या 8 वरून 10 झाली आहे. लखनौ आणि अहमदाबाद या संघांची भर पडली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन खेळाडू निवडले आहेत.
 
लखनौचं नेतृत्व के.एल.राहुलकडे असणार आहे तर अहमदाबाद संघाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे आहे. लखनौने राहुलसह रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉइनस यांना घेतलं आहे. अहमदाबादकडे हार्दिकच्या जोडीला रशीद खान आणि शुभमन गिल आहेत.
 
संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
जे खेळाडू संघाच्या भविष्यकालीन योजनेचा भाग आहेत त्यांना रिटेन म्हणजेच संघात कायम राखण्याची संधी आयपीएल संघांना मिळते. प्रत्येक संघाला 4 खेळाडू रिटेन करता येतात. रिटेन केल्यामुळे हे खेळाडू लिलावात नसतात.
 
पंजाब किंग्ज संघ- मयांक अगरवाल आणि अर्शदीप सिंग
 
चेन्नई सुपर किंग्स-महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मोईन अली
 
मुंबई इंडियन्स-रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरेन पोलार्ड, जसप्रीत बुमराह
 
कोलकाता नाईट रायडर्स- वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती
 
सनरायझर्स हैदराबाद-केन विल्यमसन, उमरान मलिक, अब्दुल समद
 
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज
 
राजस्थान रॉयल्स- जोस बटलर, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल
 
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अँनरिक नॉर्किया
 
कोणावर असेल लक्ष?
सनरायझर्स हैदराबाद आणि डेव्हिड वॉर्नर यांचे ऋणानुबंध शेवटच्या हंगामात दुरावले.
 
संघाच्या कर्णधारपदावरून, संघातून वगळण्यात आलेल्या वॉर्नरने हॉटेलच्या टीव्हीवर बसून सामन्याचा आनंद लुटला होता.
 
वॉर्नरचं नाव लिलावात आहे. सातत्याने धावांची टांकसाळ उघडणारा बॅट्समन, यशस्वी कर्णधार आणि इन्स्टाग्रामवर नृत्याच्या, रील्सच्या माध्यमातून भारतात प्रचंड चाहतावर्ग असणाऱ्या वॉर्नरला ताफ्यात घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक आहेत.
 
श्रेयस अय्यरने दिल्ली संघाची मोट बांधली होती. दिल्लीने ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवल्याने श्रेयस बाहेर पडला आहे. गुणी फलंदाज आणि हुशार कर्णधार अशा श्रेयससाठी संघ आतूर आहेत.
 
भारताचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन, सलामीवीर शिखर धवन, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार, फलंदाज अजिंक्य रहाणे यांच्यावर लक्ष असेल.
 
शार्दूल ठाकूर, दीपक चहर, युझवेंद्र चहल, मनीष पांडे, इशान किशन, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा या भारतीय खेळाडूंना संघात घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक आहेत.
 
विदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक, फलंदाज फॅफ डू प्लेसिस हे रिंगणात आहेत.
 
जगभरातल्या विविध ट्वेन्टी20 लीगमध्ये चांगलं प्रदर्शन करणारे असंख्य खेळाडू लिलावाच्या पटावर असणार आहेत. आयपीएलमध्ये छाप उमटवण्यासाठी हे सगळेजण आतूर आहेत.
 
लिलावात यांची अनुपस्थिती
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने लिलावासाठी नाव नोंदवलेलं नाही. स्फोटक खेळींसाठी, स्टाईलसाठी प्रसिद्ध ख्रिस गेल यंदाच्या हंगामात खेळताना दिसणार नाही. इंग्लंडसाठी खेळायला प्राधान्य देत असल्याने अष्टपैलू बेन स्टोक्सने लिलावातून माघार घेतली आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने बायोबबलचं कारण देत लिलावासाठी नाव दिलेलं नाही. आयपीएल स्पर्धेत याआधी पंजाब आणि चेन्नईसाठी खेळलेल्या सॅम करनने दुखापतीच्या कारणामुळे लिलावातून माघार घेतली आहे. न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनचं नावही लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंच्या यादीत नाहीये.
 
नवे आहेत पण छावे आहेत
भारताच्या U19 संघातील खेळाडू लिलावात चर्चेत असतील. सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. कर्णधार यश धूलसह राज बावा, राजवर्धन हंगेरकर, विकी ओत्सवाल, अंगक्रिश रघुवंशी, रवी कुमार यांना ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी संघ उत्सुक असतील.
 
यंदाचं आयपीएल कुठे?
कोरोनाच्या प्रादुर्भावापुढे आयपीएलचा हंगाम भारतात आयोजित करणं आव्हान आहे. एकाच शहरात सगळे सामने झाले तर प्रवास आणि कोरोना संसर्गाची शक्यता कमी होते. हे लक्षात घेऊन यंदाचं आयपीएल मुंबईतच होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आयपीएल प्रशासनाने अधिकृत घोषणा केलेली नाही.
 
वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम यांच्यासह मुंबईत सरावासाठी अन्य मैदानं उपलब्ध असल्याने संपूर्ण स्पर्धा मुंबईतच खेळवण्याचा प्रयत्न आहे. आपात्कालीन परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास, स्पर्धा युएई, दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत आयोजित केली जाऊ शकते.
 
यंदाच्या हंगामासाठी व्हिवोऐवजी टाटा स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असतील. डीएलएफ, पेप्सी, व्हिवो, ड्रीम11, व्हिवो या कंपन्यांनी प्रायोजकत्व निभावलं आहे. टाटा कंपनीला पहिल्यांदाच आयपीएलचे मुख्य प्रायोजक होण्याचा मान मिळाला आहे.