'बेबी मलिंगा' चेन्नईला पावला; बंगळुरूला नमवलं
बंगळुरू-चेन्नई या सदर्न डर्बी मुकाबल्यात चेन्नईला श्रीलंकेच्या युवा मथिशा पथिराणाने शानदार विजय मिळवून दिला. लसिथ मलिंगाप्रमाणेच स्लिंगिंग अॅक्शन असलेल्या पथिराणाला 'बेबी मलिंगा' या टोपणनावाने ओळखलं जातं. 227 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या तडाखेबंद भागीदाराने सामन्याचं पारडं बंगळुरूच्या दिशेने झुकलं होतं. पण पथिराणाने 18व्या आणि 20व्या षटकात टिच्चून गोलंदाजी करत चेन्नईला जिंकून दिलं. शेवटच्या षटकात बंगळुरूला विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. पण पथिराणाने बंगळुरूला चमत्कार करु दिला नाही. बंगळुरूने 218 धावा केल्या.
बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. उत्तम फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडला मोहम्मद सिराजने झटपट बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. ऋतुराज केवळ 3 धावा करु शकला. ऋतुराजच्या जागी आलेल्या अजिंक्य रहाणेने डेव्हॉन कॉनवेला उत्तम साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूत 74 धावांची चांगली भागीदारी केली. या दोघांनी पॉवररप्लेच्या षटकांचा अचूक फायदा उठवला. वानिंगू हासारंगाने रहाणेला बाद केलं. त्याने 20 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर कॉनवेला शिवम दुबेची साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 80 धावांची वेगवान भागीदारी केली.
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या कॉनवेला हर्षल पटेलने बाद केलं. त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 83 धावांची खेळी केली. पाठोपाठ शिवम दुबेही तंबूत परतला. दुबेने 27 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 52 धावांची आक्रमक खेळी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेले दोघेही बाद झाल्याने चेन्नईची धावगती काहीशी मंदावली. अंबाती रायुडू (6 चेंडूत 14), रवींद्र जडेजा (8 चेंडूत 10) यांनी उपयुक्त खेळी केल्या. चेन्नईने 226 धावांचा डोंगर उभारला. बंगळुरूने 6 गोलंदाजांचा वापर केला. प्रत्येकाने एक विकेट पटकावली.
या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूला पहिल्याच षटकात धक्का बसला. आकाश सिंगचा चेंडू विराट कोहलीने मारला. बॅटची खालची कड घेऊन चेंडू विराटच्या बूटांवर आदळला. त्यानंतर दुसऱ्या पायाला लागून घरंगळत स्टंप्सवर गेला. विचित्र पद्धतीने बाद होऊन कोहली तंबूत परतला. तो 6 धावा करु शकला. त्याच षटकात महेश तीक्षणाने महिपाल लोमरुरला जीवदान दिले. पण तो फार काळ तग धरु शकला नाही. तुषार देशपांडेने त्याला बाद केलं.
कर्णधार डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 61 चेंडूत 126 धावांची तडाखेबंद भागीदारी केली. हे दोघं खेळत असताना बंगळुरू हा सामना सहज जिंकेल असं चित्र होतं.
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मॅक्सवेलला तीक्षणाने बाद केलं. महेंद्रसिंग धोनीने त्याचा झेल टिपला. मॅक्सवेलने 36 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची वेगवान खेळी केली. मॅक्सवेल बाद झाल्यावर डू प्लेसिसने सूत्रं हाती घेतली पण मोईन अलीने त्याचा अडथळा दूर केला. धोनीनेच त्याचा झेल टिपला. डू प्लेसिसने 33 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 62 धावांची खेळी केली.
फिनिशर म्हणून प्रसिद्ध दिनेश कार्तिकने लगेचच चौकार-षटकारांची खैरात सुरू केली. दिनेश कार्तिक 14 चेंडूत 28 धावांची खेळी करुन परतला. तुषार देशपांडेने ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तीक्षणाच्या हातात जाऊन विसावला. मथीशा पथिराणाने शाहबाज अहमदला बाद केलं. यानंतरही बंगळुरूसाठी विजय अशक्य नव्हता पण चेन्नईने शेवटच्या 4 षटकांमध्ये शिस्तबद्ध गोलंदाजी करत बंगळुरूला वेसण घातली. चेन्नईतर्फे तुषार देशपांडेने 3 तर पथिराणाने 2 विकेट्स घेतल्या.
"बंगळुरूत जास्तीतजास्त धावा करणं आवश्यक असतं. कारण इथे दव पडतं. शिवम दुबे खणखणीत फटके लगावतो. तरुण खेळाडूंवर प्रचंड दडपण असतं. यॉर्कर टाकणं सोपं नाही. ड्वेन ब्राव्हो आमचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी कशी करावी याचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. त्याचा अनुभवाचा फायदा युवा गोलंदाजांना होतो. गोलंदाजीवर धावा लुटल्या जाऊ शकतात पण तरी संयम ठेऊन गोलंदाजी करणं आवश्यक असतं", असं महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
Published By - Priya Dixit