बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (23:26 IST)

चेन्नई ‘अजिंक्य’; मुंबई बालेकिल्ल्यात पराभूत

Chennai Super Kings
अजिंक्य रहाणेच्या देखण्या अर्धशतकाच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच बालेकिल्ल्यात दिमाखात हरवलं. फिरकी आक्रमणाच्या बळावर चेन्नईने मुंबईला 157 धावांतच रोखलं. अजिंक्यच्या वेगवान अर्धशतकामुळे चेन्नईचा विजय सोपा केला.
 
फॉर्ममध्ये घसरण झाल्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर फेकला गेला आहे. त्याआधी त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं. ऑस्ट्रेलियात दुखापतींनी ग्रस्त संघाची मोट बांधत मालिका विजयाचं शिवधनुष्य रहाणेने पेललं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्याचं संघातलं स्थान धोक्यात आलं.
 
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या वार्षिक करार सूचीतूनही त्याला डच्चू देण्यात आला.
 
अजिंक्य डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्व करत होता. आयपीएल लिलावात अजिंक्यला कोणत्या संघाचा भाग होणार यासंदर्भात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सने सुखद धक्का देत अजिंक्यला आपल्या ताफ्यात सहभागी केलं.
चेन्नईच्या संघाचं फलंदाजीचा क्रम बऱ्यापैकी पक्का होता. यामध्ये अजिंक्यला कुठे फिट करणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. शनिवारी अजिंक्यच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर तो योग जुळून आला. बेन स्टोक्स आणि मोईन अली दुखापतग्रस्त असल्याने चेन्नईने अजिंक्यला पदार्पणाची संधी दिली.
 
विजयासाठी 158 धावांचं लक्ष्य मिळालेल्या चेन्नईची सुरुवात डळमळीत झाली. पण तिसऱ्या क्रमांकावर खेळायला उतरलेल्या अजिंक्यने कलात्मक फलंदाजीचा वस्तुपाठच सादर केला. चौकार, षटकारांची लयलूट करत अजिंक्यने पॉवरप्लेचा अचूक उपयोग करुन घेतला. आयपीएल स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजिंक्यने 27 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची देखणी खेळी साकारली.
 
अजिंक्य रहाणेचा हा आयपीएल स्पर्धेतला सहावा संघ आहे. याआधी तो दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघातर्फे खेळला आहे.
 
अजिंक्य-ऋतुराज जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 44 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली.
 
अजिंक्य बाद झाल्यानंतर ऋतुराजने शिवम दुबेच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 43 धावांची भागीदारी करत विजयाचा मार्ग सुकर केला. दुबे बाद झाल्यानंतर ऋतुराज आणि अंबाती रायुडूने विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋतुराजने 40 तर रायुडूने 20 धावा केल्या.
 
दरम्यान चांगल्या सुरुवातीनंतरही मुंबईची घसरणच झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 38 धावांची सलामी दिली. तुषार देशपांडेने रोहितला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. रोहित बाद झाल्यावर इशानने सूत्रं हाती घेतली. पहिलं षटक टाकतानाच चेन्नईचा दीपक चहर दुखापतग्रस्त झाला. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे दीपक पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईने प्रमुख गोलंदाज गमावूनही उत्तम पुनरागमन केलं.
 
मनमुराद फटकेबाजी करु लागलेल्या इशान किशनला रवींद्र जडेजाने रोखलं. त्याने 21 चेंडूत 32 धावांची खेळी केली. इशान बाद झाला तेव्हा मुंबईचा संघ 64/2 अशा स्थितीत होता. ट्वेन्टी20 जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवला मिचेल सँटनरने पायचीत पकडलं. त्याला केवळ एका धावेचं योगदान देता आलं.
 
पुढच्या षटकात रवींद्र जडेजाने कॅमेरुन ग्रीनचा स्वत:च्या गोलंदाजीवर अफलातून असा झेल टिपला. सँटनरने अर्शद खानलाही झटपट तंबूत धाडलं. स्पर्धेत चांगली सुरुवात केलेल्या तिलक वर्माने धावफलक हलता ठेवला. पण रवींद्र जडेजाने त्याला फार काळ टिकू दिलं नाही. त्याने 22 धावा केल्या.
 
आयपीएल पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या सिसांदा मगालाने ट्रिस्टन स्टब्सला माघारी धाडलं. तो केवळ 5 धावा करु शकला. टीम डेव्हिडने एका बाजूने किल्ला लढवत 31 धावांची खेळी केली. मुंबईने रडतखडत 157 धावांची मजल मारली. चेन्नईतर्फे जडेजाने 3 तर तुषार देशपांडे आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
वानखेडेवर कसोटी खेळायला आवडेल-अजिंक्य रहाणे
"मोईन अलीला बरं नसल्याने मी संघात असल्याचं नाणेफेकीच्या थोडा वेळ आधी कळलं. मी नेट्समध्ये उत्तम खेळत होतो. महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पहिल्या दिवसापासूनच स्वातंत्र्य दिलं. तू तुझा नैसर्गिक खेळ कर असं सांगितलं. आयपीएल मोठी स्पर्धा आहे. तुम्हाला कधी संधी मिळेल सांगता येत नाही. मोईनला बरं नसल्यामुळे मला संधी मिळाली. वानखेडेवर मला खेळायला आवडतं. खेळपट्टी समजून फटके लगावले तर मोठी खेळी करता येते. या मैदानावर मी अनेक वर्ष खेळलो आहे. इथे खेळायला मजा येते. पण मी अजूनही वानखेडेवर कसोटी खेळलो नाहीये. मला वानखेडेवर कसोटी खेळायला आवडेल", असं अजिंक्य रहाणेने समालोचकांशी बोलताना सांगितलं. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तय्यार असल्याचे संकेत अजिंक्यने दिले आहेत.

स्टोक्स, मोईन, आर्चर खेळण्यासाठी अनुपलब्ध
एल क्लासिको असं वर्णन होणाऱ्या या महत्त्वपूर्ण लढतीत बेन स्टोक्स, मोईन अली आणि जोफ्रा आर्चर हे खेळू शकले नाहीत. सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या बेन स्टोक्सला चेन्नईने .. कोटी रुपये खर्चून संघात घेतलं. स्टोक्सला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास आहे. स्टोक्सने संघासोबत हलका सराव केला पण तो खेळण्यासाठी उपलब्ध नव्हता. मोईनलाही बरं नसल्याचं धोनी म्हणाला.
 
दुसरीकडे जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त नाहीये पण सावधगिरीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देत आहोत असं मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी स्पष्ट केलं.
 
Published By- Priya Dixit