गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (08:59 IST)

GT vs MI: गुजरातने मुंबईचा 55 धावांनी पराभव केला

आयपीएल 2023 ने अर्धा टप्पा पार केला आहे. सर्व संघांनी सात सामने खेळले आहेत. चेन्नई आणि गुजरातचे 10 गुण आहेत, तर चार संघांचे आठ गुण आहेत. एका संघाने सहा तर तीन संघांनी चार गुण मिळवले आहेत. गुजरात टायटन्सने त्यांच्या सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव केला आणि या हंगामात 10 गुण मिळवणारा दुसरा संघ ठरला. यासह गुजरातने गुणतालिकेत चेन्नईची बरोबरी करत प्लेऑफमधील आपला दावा मजबूत केला आहे. गुणतालिकेत गुजरात आणि चेन्नईचे समान 10 गुण आहेत, पण चांगल्या धावगतीच्या आधारावर चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर आहे. 
 
 
गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल (56 धावा),नूर अहमद (3/37) आणि रशीद खान (2/27) यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांनी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव केला. 
 
गिलच्या अर्धशतकानंतर गुजरात टायटन्सने मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांच्या जोरावर सहा गडी गमावून 207 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 22 चेंडूत 46 धावा केल्या. राहुल तेवतियाने पाच चेंडूत नाबाद 20 धावा केल्या आणि अभिनव मनोहरने 21 चेंडूत 42 धावा केल्याच शिवाय मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी 71धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. 
 
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने पहिल्या षटकात फक्त चार धावा दिल्या. गिलने बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर पहिले चार धावा ठोकल्या. तिसर्‍याच षटकात अर्जुनने वृद्धीमान साहाला (04) झेलबाद केल्यावर मुंबईला पहिली विकेट लवकर मिळाली. 
 
Edited By - Priya Dixit