शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

चेन्नईचा मालक मैयप्पनला अटक

WD
आयपीएल बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मालक गुरुनाथ मैयप्पन यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली.

मुंबई पोलिसांनी मैयप्पन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अडीच तास सलग चौकशी केल्यानंतर सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे भवितव्य टांगणीला लागले आहेत.

मुंबईचे पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही बीसीसीआयचे चेअरमन श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई संघाचे मालक गुरुनाथ मैयप्पन यांना समन्स पाठविले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीत मैयप्पन यांचा स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना आम्ही अटक केली आहे.

चित्रपट अभिनेता विंदू दारासिंग याने दिलेल्या माहितीच्या आधारे 35 वर्षीय गुरुनाथ मैयप्पन याला चौकशीसाठी बोलावले होते. मुंबई विमानतळावरून त्याला मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. 9-30 वाजता चौकशीला प्रारंभ झाला. 12 वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली.

मुंबई पोलीस दोन दिवसांपासून मैयप्पन यांच्या मागावर असून काल चेन्नईत गेलेल्या क्राइम ब्रँचच्या पथकाला हुलकावणी देणारे मैयप्पन आज पोलिसांसमोर हजर झाले आहेत.