1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (09:40 IST)

कोलकाता 'जितबो', KKR ची तिसऱ्यांदा IPL च्या विजेतेपदाला गवसणी

आज (26 मे) चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत, आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
 
सुमारे दीड महिना चाललेल्या आयपीएल स्पर्धेचा आता अखेर शेवट झाला. हैदराबादने ठेवलेलं 114 धावांचा आव्हान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
 
व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावा करून कोलकात्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलची स्पर्धा जिंकली असून यापूर्वी 2012 आणि 2014 मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती.
 
मागच्या दोन्हीवेळा गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली नाईट रायडर्सनी विजय मिळवला होता आणि यावेळी मात्र तोच गौतम गंभीर मेंटॉर म्हणून संघाची धुरा सांभाळताना दिसला.
 
विशेष म्हणजे टी-20विश्वचषकासाठी निवड न झालेल्या श्रेयस अय्यरने कोलकाताला तिसरं विजेतेपद मिळवून दिलं आहे.
 
तत्पूर्वी पॅट कमिन्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
 
पण संपूर्ण आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभारलेला सनरायजर्सचा संघ अंतिम सामन्यात मात्र पूर्णपणे ढेपाळला. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे सलामीवर पहिल्या दोन ओव्हरमध्येच तंबूत परतले आणि त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांमध्ये तंबूत जाण्याची स्पर्धाच लागली होती.
 
नियमित अंतराने हैदराबादचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हैद्राबादला 113 धावांवरच गुंडाळण्यात यश मिळवलं.
 
आयपीएलच्या अंतिम सामन्यांमधली ही आजवरची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
 
सनरायजर्सने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवातही तशी खराबच झाली. नाईट रायडर्सचा तडाखेबंद सलामी फलंदाज म्हणून ख्याती मिळवलेला सुनील नरीन दुसऱ्याच ओव्हरमध्ये एक षटकार खेचून आउट झाला.
 
सुनील नरीन आउट झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यर आणि अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज यांनी आक्रमक फलंदाजी करत नाईट रायडर्सला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं.
 
विजयासाठी 12 धावा शिल्लक असताना रहमानुल्लाह गुरबाज आउट झाला. त्याने अंतिम सामन्यात 32 चेंडूत 39 धावा केल्या.
 
गुरबाज आउट झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर या अय्यरांच्या जोडीने नाईट रायडर्सची पडझड होऊ दिली नाही आणि नाईट रायडर्सने हैदराबादवर आठ गाडी राखून एकतर्फी विजय मिळवला.
 
नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची धमाल
मिचेल स्टार्कने सुरुवातीलाच दोन झटके देऊन कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली.
 
त्यानंतर हर्षित राणा, वैभव अरोरा, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती या सगळ्या गोलंदाजांनी अगदी गुण्यागोविंदाने राहिलेल्या हैदराबादच्या फलंदाजांचा फडशा पडला.
 
कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 रन्समध्ये 3 विकेट्स काढल्या.
 
मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
 
आयपीएल 2024 मध्ये मोडलेले रेकॉर्डस्
पंजाब किंग्जने आयपीएल 2024 मध्ये ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सच्या 261 धावांचा पाठलाग करताना 262 धावा केल्या आणि आठ विकेट्स राखून विजय मिळवला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.

पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात 42 षटकार खेचले गेले. एका सामान्यातले हे सर्वाधिक षटकार होते.
हैदराबादने बंगळुरूविरुद्ध 287 धावा करून, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. याआधी हैदराबादने 277 धावांचा विक्रम केला होता.

गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 73 धावा दिल्या. आयपीएलच्या इतिहासात एका मॅच मध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आता मोहित शर्माच्या नावावर आहे.
गौतम गंभीर मेंटॉर म्हणून चमकला
2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सक्रिय राजकारणातून काढता पाय घेतलेल्या गौतम गंभीरने आयपीएलमध्ये मात्र स्वतःचा चांगलाच जम बसवला आहे.
 
यापूर्वी त्याने लखनऊ सुपर जायंट्स संघाला मेंटॉर असताना नॉक आउट सामन्यांमध्ये पोहोचवलं होतं.
 
2024च्या आयपीएल स्पर्धेआधी त्याने अनेकवर्ष ज्या संघाची कर्णधार म्हणून धुरा सांभाळली होती त्या कोलकाता संघात तो मेंटॉर म्हणून परतला.
संघ मालक आणि व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला तिसरं विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल करत गंभीरने स्वतःचा ठसा उमटवला.
 
कोलकाता संघातील खेळाडूंची 'बॉडी लँग्वेज' यावर्षी बदललेली दिसली. सुनील नरीनला सलामीला पाठवून बेदरकारपणे फलंदाजी करण्याची दिलेली मुभा असो किंवा मग वेळोवेळी गोलंदाजीत केलेलं बदल असो गंभीरचा प्रभाव सगळीकडे दिसून येत होता.
 
एखाद्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाप्रमाणे गंभीरने प्रत्येक सामन्यात स्वतःला गुंतवून ठेवलं. अंतिम सामन्यात तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाल्या झाल्या मैदानात पाऊल ठेवणारा पहिला माणूस गौतम गंभीर होता. त्याच्या आक्रमक स्वभावाचा आणि नॉक आउट सामने जिंकण्याच्या अनुभवाचा नाईट रायडर्सला फायदा झाल्याचं दिसून आलं.
 
आयपीएल 2024 ही स्पर्धा अनेक अर्थांनी महत्त्वाची होती
पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससाठी विजेतेपद राखण्याचं आव्हान होतं, पाचच वेळा जिंकलेली मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या रूपात एक नवीन कर्णधार नेमून पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरली होती.
 
'इ साला कप नाम दे' म्हणत विराट कोहलीचा संघ यावर्षी विजेतेपदावर दावा सांगत होता तर अनेक गुणी खेळाडूंचा भरणा असलेल्या राजस्थान रॉयल्सने स्पर्धेची धडाक्यात सुरुवात करून आयपीएलच्या चषकाकडे वाटचाल सुरु केली होती.
 
बाकी दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स हेही संघ तेवढ्याच ताकदीने आयपीएल खेळायला रणांगणात उतरले होते.
 
पण दोन संघांची बातच काहीशी वेगळी होती. त्यातला पहिला संघ म्हणजे 'मियाँभाईच शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादचा सनरायजर्स आणि दुसरीकडे पहिल्या आयपीएलपासून लोकप्रिय असलेला बंगालचा कोलकाता नाईट रायडर्स.
 
कोलकाता आणि हैदराबादचा प्रवास
कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी अनेक चुरशीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती.
 
साखळी फेरीत कोलकाता संघाने 14 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला. नॉक आउटमध्येही हैदराबादला क्वालिफायर-1 मध्ये हरवलं आणि अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनण्याचा बहुमत नाईट रायडर्सनी मिळवला.
 
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या हैदराबादने तर कमालच केली. साखळी फेरीत 14 पैकी 8 सामने त्यांनी जिंकले असले तरी त्यांनी जिंकलेले बहुतांश सामने हे एकतर्फी होते.
 
त्याचं कारण होतं हैदराबादच्या फलंदाजांनी केलेली धडाकेबाज फलंदाजी. युवराज सिंगने तयार केलेला डावखुरा भारतीय तरुण अभिषेक शर्मा, भारताच्या संघाला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडकी भरवलेला ऑस्ट्रेलियन ट्रेव्हिस हेड आणि आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढायला उतरलेले हेनरिक क्लासन आणि एडन मार्करम या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची जोडी.
 
हैदराबादच्या फलंदाजांनी 'चले तो चांद तक नही तो शाम तक' या हैदराबादी म्हणीप्रमाणे खेळ करत कधी धावांचे उंचच उंच डोंगर उभारले, उच्चांकी धावसंख्येचे नवनवीन विक्रम मोडले तर कधी धावांचा पाठलाग करताना हीच फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली.
 
असं असलं तरी नॉक आउटमध्ये पोहोचताना शेवटच्या काही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. याचाच फायदा त्यांना झाला आणि क्वालिफायर-1 मध्ये पराभूत होऊनही त्यांनी एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
 
Published By- Priya Dixit