बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2024 (19:57 IST)

अ‍ॅपल आणि ChatGPT एकत्र येण्याच्या घोषणेमुळे इलॉन मस्क इतके का चिडले ?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेत सहभागी होत आता अ‍ॅपल कंपनी त्यांच्या सिरी व्हॉईस असिस्टंट आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ओपनAI कंपनीचं ChatGPT आणणार आहे.
 
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या अ‍ॅपलच्या मुख्यालयात कंपनीची वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 10 जूनला पार पडली. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने Siri नव्या रूपात आणण्यासोबतच इतरही काही नवीन फीचर्स कंपनीने जाहीर केली.
 
या नव्या पर्सनलाईज्ड AI प्रणालीला - Apple Intelligence असं नाव देण्यात आलं असून अ‍ॅपल युजर्सना अधिक सोपेपणाने अ‍ॅपलची डिव्हाईसेस वापरता यावी हा यामागचा उद्देश्य असणार आहे.
 
यासाठी चॅट जीपीटी (ChatGPT) विकसित करणाऱ्या ओपन एआय (OpenAI) कंपनीसोबत अ‍ॅपलने करार केला आहे. आयफोन आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टीमच्या अपडेट्सद्वारे ChatGPT ला अ‍ॅक्सेस देण्यात येईल.
 
टेक्स्ट आणि इतर प्रकारच्या साहित्य (Content) निर्मितीसाठीही या ChatGPTची मदत होणार आहे.
यामुळे कंपनीची उत्पादनं एक नवी उंची गाठतील असं अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी म्हटलंय.
 
पण सगळ्यांनीच या घोषणेचं स्वागत केलंय असं नाही. टेस्ला आणि एक्स (ट्विटर) चे मालक असणाऱ्या इलॉन मस्क यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केलीय आणि 'डेटा सिक्युरिटी'च्या कारणामुळे आपल्या कंपन्यांमध्ये आयफोन वापरास बंदी घालण्याची धमकीही दिली आहे.
 
एक्सवर त्यांनी म्हटलंय, "हे अगम्य आहे की अ‍ॅपलकडे त्यांची स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली विकसित करण्याची क्षमता नाही, पण OpenAI तुमच्या डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यांचं संरक्षण करेल, हे मात्र ते खात्रीने सांगत आहेत. एकदा तुमचा डेटा OpenAIला दिला की त्याचं काय केलं जातंय हे अ‍ॅपलला कळणारही नाही. ते तुम्हाला धोकादायक परिस्थितीत लोटत आहेत."
अ‍ॅपलने AI फीचर्स आणण्यामागचं कारण काय?
अ‍ॅपलचे स्पर्धक असणाऱ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांनी यापूर्वीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वीकारत आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे AI फीचर्स आणण्यासाठी अ‍ॅपलवर काहीसा दबाव होता.
 
2023 च्या अखेरपर्यंत अ‍ॅपल ही जगातली सर्वाधिक मूल्य असणारी - Most Valuable Company होती. पण जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्टने आघाडी घेत पहिलं स्थान पटकावलं आणि अ‍ॅपल कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आली. ChatGPT तयार करणाऱ्या ओपनAI कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्टने गुंतवणूक केलेली आहे.
 
त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाच अ‍ॅपल कंपनीला पुन्हा एक धक्का बसला.
 
Nvidia कंपनीनेही त्यांना मागे टाकलं आणि दुसरं स्थान पटकावलं. ChatGPT च्या चॅटबॉटला Nvidia कंपनीच्या 10,000 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) पासून तयार करण्यात आलेल्या सुपर कम्युटरचा वापर करून प्रशिक्षण देण्यात आलंय.
 
अ‍ॅपलच्या उत्पादनांच्या विक्रीतही फार मोठी वाढ नोंदवली जात नव्हती.
टेक्नॉलॉजी क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या CCS इनसाईट कंपनीचे मुख्य विश्लेषक बेन वुड यांनी बीबीसीला सांगितलं, "काहीसे साशंक झालेल्या गुंतवणूकदारांना थोडं शांत करण्यासाठी अ‍ॅपलच्या या नवीन पर्सनल AI सिस्टिमची मदत होईल. पण चॅटGPT आणल्यामुळे कंपनीसाठी काही मोठ्या अडचणीही निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी एखाद्या युजरला मदत करणं सिरीला शक्य होणार नाही, त्यावेळी तिथे ChatGPT पुढे सरसावेल. हे म्हणजे अ‍ॅपलने एकप्रकारे त्यांची कुवत मर्यादित असल्याचं कबूल करण्यासारखं आहे.
 
गेल्या काही महिन्यांमध्ये इतर टेक कंपन्या त्यांची आर्टिफिशियल इंजेलिजन्स असणारी उत्पादनं एका मागोमाग एक आणत असताना अ‍ॅपलचं या क्षेत्रात अस्तित्त्व नसणं उठून दिसत होतं.
 
कंपनी याबाबत जपून पावलं टाकत असल्याचं टिम कुक यांनी 2023मध्ये गुंतवणूकदारांना सांगितलं होतं. जून 2024मध्ये अखेरीस यासाठीची घोषणा करण्यात आली.
 
अ‍ॅपल इंटेलिजन्स काय आहे?
अ‍ॅपल इंटेलिजन्स हे अ‍ॅपलचं स्वतःचं किंवा नवीन प्रॉडक्ट वा उत्पादन नाही. किंवा हे एखादं अ‍ॅपही नाही.
 
अ‍ॅपल इंटेलिजन्स युजर्स वापरत असलेल्या प्रत्येक अ‍ॅप आणि अ‍ॅपल प्रॉडक्टचा एक भाग असेल. म्हणजे तुम्ही लिहीत असलेल्या मेसेजेसाठी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली तुम्हाला मदत करेल.
 
किंवा तुमच्या डायरीत नोंदवलेल्या एखाद्या अपॉइंटमेंटसाठी जायला कोणता रस्ता चांगला आहे हे सुचवेल. तुम्ही एखादी मीटिंग ठरलेल्या वेळेपासून बदलून पुढे नेत असाल तर त्याचा परिणाम पुढे कुठल्या ठिकाणी पोहोचण्यावर होणार आहे का, हे देखील तुम्हाला लगेच कळेल.
 
एकप्रकारे हे मायक्रोसॉफ्टचा AI असिस्टंट असणाऱ्या कोपायलट (Copilot) सारखंच असेल. फक्त यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे भरावे लागणार नाहीत.
 
अ‍ॅपलने 2010 साली सिरी प्रणाली विकत घेतली आणि 2011 साली आयफोन 4S मध्ये पहिल्यांदा सिरी व्हॉईस असिस्टंट फीचर देण्यात आलं. आता या अॅपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरीला एक नवसंजीवनी देण्यात येतेय.
 
आयफोन्सच्या डेटाच्या सुरक्षेविषयीचे प्रश्न
ChatGPT चा समावेश केल्यानंतर अ‍ॅपलची गॅजेट्स किती सुरक्षित राहतील याविषयी इलॉन मस्क यांनी ट्वीट केल्याप्रमाणेच अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती.
 
हा मुद्दा उपस्थित होणार याचा अंदाज असल्यानेच सोमवारच्या अ‍ॅपलच्या कार्यक्रमात सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भर देण्यात आला.
 
नवीन प्रणाली आल्यानंतर युजर्सच्या काही कामांचं प्रोसेसिंग अ‍ॅपलच्या डिव्हाईसेसवरच होईल. पण अधिक क्षमता लागणाऱ्या गोष्टी क्लाऊडकडे पाठवल्या जातील. पण तिथे कोणताही डेटा स्टोअर केला जाणार नसल्याचं अॅपलने आवर्जून सांगितल आहे.
 
आपली डिव्हाईसेस अधिक सुरक्षित असल्याचं सांगत अ‍ॅपल इतरांपेक्षा जास्त किंमत आकारत आलं असल्याने प्रायव्हसीचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
 
ओपन AI आणि अ‍ॅपलचा करार
अ‍ॅपलने आजवर त्यांची उत्पादनं स्वतःपुरतीच मर्यादित ठेवली. त्यामुळेच ओपन AI या दुसऱ्या कंपनीने विकसित केलेली ChatGPT प्रणाली त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये अंतर्भूत करणं वेगळं आणि लक्ष वेधून घेणारं ठरतं.
 
गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या AI सेवांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे त्यांच्यावर टीका केली जात होती.
 
गुगलच्या या AI सर्चने दिलेली विचित्र उत्तरं व्हायरल झाल्यानंतर गुगलला त्यांचं नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्च फीचर मागे घ्यावं लागलं होतं.
 
अनेक वर्षं अ‍ॅपलने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅप स्टोअरच्या बाहेरील अ‍ॅप्स, सुरक्षेच्या कारणास्तव डाऊनलोड करू दिली नाहीत.
 
सोबतच याच कारणामुळे त्यांच्या डिव्हायसेसवर सफारी व्यतिरिक्त इतर कोणताही वेब ब्राऊजरही वापरता येत नव्हता. युरोपियन युनियनच्या सक्तीनंतर अ‍ॅपल कंपनीला हे धोरण बदलावं लागलं.
 
ओपन AI चा दबदबा
Open AI कंपनीची स्थापना 2015 मध्ये झाली. सॅम ऑल्टमन यांनी इलॉन मस्क आणि इतर रिसर्च इंजिनियर्स आणि वैज्ञानिकांसोबत मिळून स्थापन केलेल्या या कंपनीचे सह-अध्यक्ष होते सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क. त्यानंतर 2018 मध्ये इलॉन मस्क या कंपनीतून बाहेर पडले.
 
ChatGPT हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट या कंपनीने तयार केलाय. मायक्रोसॉफ्टने 2023 वर्षात या कंपनीत तब्बल 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली.
 
2022 मध्ये OpenAI ने ChatGPT आणल्यानंतर इतरही कंपन्यांनी कंबर कसली.
 
अ‍ॅपलने ChatGPT सोबत केलेला करार म्हणजे त्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नसल्याचं मान्य करण्यासारखं म्हटलं जातंय.
 
पण भविष्यामध्ये आपण इतर कंपन्यांसोबतही त्यांच्या सेवा वा उत्पादनांचा अ‍ॅपल गॅजेट्समध्ये समावेश करण्यासाठी करार करणार असल्याचं अॅपलने म्हटलंय. पण त्यांनी कोणाचंही नाव जाहीर केलं नाही.
 
Published By- Priya Dixit