मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. कतरीना
Written By वेबदुनिया|

'कैफ' कतरीनाचा

IFM
अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेल्या 'त्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश तरूणीला हिंदीही धड बोलता येत नव्हतं. म्हणून अनेकांनी तिला हिणवलंही. बॉलीवूडमध्ये येऊनही ती तिथेच ओठंगून उभी होती. पण नशीब बददलं नि आंग्लाळलेल्या हिंदीत बोलणारी 'ती' आता बॉलीवूडवर राज्य करतेय. हिंदी चित्रपटसृष्टीवर तिने गारूड केलंय. जणू सगळ्यांनाच तिचा 'कैफ' चढलाय. तिच्या चाहत्यांची संख्या दर चित्रपटागणिक वाढत जातेय. इंटरनेटवर तिचाच शोध सर्वाधिक घेतला जातोय. ती 'हॉट' आहे. बोल्ड आहे नि ब्युटिफूलही. पण या सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ती बुद्धिमान आहे. आपल्या मर्यादात राहून त्या पलीकडे कसं जायचं हे तिला फार चांगलं कळतं. इतक्या वर्णनानंतरही 'ती' कोण हे तुम्ही ओळखलं असेलच. 'होय, 'ती' म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून कतरीना कैफच आहे.

कतरीना बॉलीवूडवर 'छा गई है'. ती सुपरस्टार नाही. पण त्यापेक्षा कमीही नाही. ऐश्वर्या रायच्या लग्नानंतर बॉलीवूडवर राज्य करणारा नायिकांमधला तो नवा चेहरा आहे. तिला हवा तोच चित्रपट ती निवडते. हव्या त्याच दिग्दर्शकासोबत ती काम करतेय. 'बी' ग्रेडचे चित्रपट हाती लागलेल्या कतरीनाकडे आता ए ग्रेडचे बॅनर्स चालत येताहेत. यशराज फिल्म्सच्या माध्यमातून 'न्यूयॉर्क'सारखा चित्रपट मिळाला नि तिचं नशीब उजळलं. आता 'ए' ग्रेड तारकांच्या यादीत ती आलीय. तिचा हा सगळा प्रवास झाला तरी कसा. त्यासाठी तिच्या भूतकाळात डोकवावं लागेल.

कतरीनाचा जन्म हॉंगकॉंगमध्ये झाला. काश्मिरी मुस्लिम असलेल्या मोहम्मद कैफ आणि ब्रिटिश ख्रिश्चन असलेल्या सुझान आईवडिलांची कतरीना ही कन्या. सात बहिणींपैकी एक. कतरीना लहान असतानाच तिचे आई-वडिल वेगळे झाले आणि कतरीना वडिलांकडे गेले. हवाई बेटावर तिचे लहानपण गेले. पुढे मोठी झाल्यानंतर ती आईकडे म्हणजे लंडनला आली. सौंदर्याने झळाळू लागलेल्या कतरीनाला आपल्या सौंदर्याची किंमत काय आहे ते कळून आले आणि तिने एका एजंटला गाठले. त्याच्याकरवी तिने मॉडेलिंग सुरू केले. तिला चांगला प्रतिसादही मिळाला.

मॉडेलिंग सुरू असतानाच कैझाद गुस्ताद यांच्या नजरेस ती आली. ते त्यावेळी बूम हा चित्रपट बनवत होते. त्यांनी तिला या चित्रपटात घेतले आणि ती मुंबईत आली. सुरवातीला इथेही मॉडेलिंगची कामे मिळाली. पण बॉलीवूडचे दरवाजे काही उघडेनात. अडचण होती ती तिच्या हिंदीची. तिचे आंग्लाळलेले हिंदी उच्चार बॉलीवूडी दुनियेत चालणार नव्हते. त्यामुळे कितीही आकर्षक, देखणी आणि सुंदर असली तरी तिला या दुनियेत महत्त्व नव्हते.

पण नशीब बदलतं कसं ते पहा. रामगोपाल वर्माने सरकार या त्याच्या चित्रपटात कतरीनाला अभिषेक बच्चनच्या मैत्रिणीचा रोल दिला. या चित्रपटाने 'कतरीना की गाडी चल पडी'. लगोलग तिला 'मैने प्यार क्यु किया' हा चित्रपट मिळाला. समोर होता सलमान खान. तिचा प्रियकरवजा मित्र. त्यांची केमिस्ट्री चांगली जुळली नि हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटासाठी तिला नवोदित अभिनेत्रीचे स्टारडस्ट अवार्डही मिळाले.

IFM
२००७ हे वर्ष तिला लकी ठरले. नमस्ते लंडन हा अक्षयकुमारबरोबरचा चित्रपट यशस्वी ठरला नि ही जोडी जमली. वास्तविक या आधी त्यांनी हमको दिवान कर गये हा चित्रपट या दोघांनी एकत्र केला होता. पण तो यशस्वी ठरला नव्हता. 'नमस्ते लंडन'ने हे अपयश धुऊन काढले. त्यानंतर अपने, पार्टनर, आणि वेलकम हे सलग तीन हिट चित्रपट तिने दिले.

'चॉकलेटी' भूमिका करणार्‍या कतरीनाने २००८ मध्ये अब्बास मस्तानच्या 'रेस'मध्ये प्रथमच डार्क म्हणजे खलनायकी भूमिका केली. सैफ अली खानच्या सेक्रेटरीचा हा रोलही गाजला. सैफ अलीशी प्रेम करणारी ही सेक्रेटरी आतून मात्र त्याचा सावत्र भाऊ असलेल्या अक्षय खन्नाबरोबर प्रेमाचे रंग उधळत असते. रेसच्या यशानंतर 'सिंग इज किंग'चे यश तिच्या भाळी लागले. इथेही अक्षयकुमारबरोबर तिची जोडी होती.

एवढ्या वाटचालीनंतर तिच्याकडे बडे बॅनर्सचे चित्रपट येऊ लागले. सुभाष घईनी तिला आणि सलमानला घेऊन युवराज हा चित्रपट गेल्या वर्षी केला. पण दुर्देवाने तो साफ पडला. पण त्यानंतर यशराज फिल्म्सने तिला 'न्यूयॉर्क'साठी घेतले. हा चित्रपट २००९ मधला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील भूमिकेसाटी समीक्षकांनीही तिचे कौतुक केले.

आगामी काळात तिचे अनेक महत्त्वाचे चित्रपट येणार आहेत. यात 'दन दना दन' हा अक्षयकुमारसोबतचा आणि प्रियदर्शन दिग्दर्शक असलेला चित्रपट आहे. शिवाय रणबीर कपूरसोबत 'अजब प्रेम की गजब कहानी' हा दिग्दर्शक राजकुमार संतोषींचा चित्रपट आहे.

कतरीना 'हॉट' सर्चेबल
गेल्या वर्षी म्हणजे २००८ मध्ये कतरीना आशियातील 'सेक्सिएस्ट वूमन' म्हणून निवडली गेली. लोकांमध्ये तिच्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणूनच गुगलमध्ये सर्वांधिक शोध तिच्या नावाचा होतो. तिला आतापर्यंत मैने प्यार क्यू कियासाठी स्टारडस्ट ब्रेकथ्रू परफॉर्मन्स अवार्ड, झी सिने अवार्ड, आयफा अवार्ड आणि सर्वांत लोकप्रिय नायिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे.