रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. निवडणूक
  3. लोकसभा निवडणूक
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (12:00 IST)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : नारायण राणे की शिंदे गट लढणार? उमेदवारीवरून रंगत वाढली

rane
नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न सध्या वारंवार वृत्तपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर झळकताना दिसतोय. हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेली एक घडामोड.
 
देशभरात राज्यसभा निवडणुका झाल्या आणि त्यात महाराष्ट्रातल्या सहा जागा होत्या. या सहा जागांमध्ये केंद्रात मंत्रिपदी असलेल्या नारायण राणेंना भाजपनं स्थान दिलं नाही.
 
नारायण राणेंना पुन्हा राज्यसभेत न पाठवण्याचा अर्थ लोकसभेच्या रिंगणात उतरवणं, असाच काढला जातोय आणि हा अर्थ निघणं सहाजिक आहे.
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. असा नजिकचा इतिहास असताना, नारायण राणे मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाल्याने कुठे खमंगपणे, कुठे आश्चर्याच्या धक्क्यात, तर कुठे साशंक होत या चर्चा चघळल्या जात आहेत.
 
किंबहुना, नारायण राणे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनीच खऱ्या अर्थानं रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या राजकारणाला रंगत आणलीय. अर्थात, राणेंनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याला अद्याप तरी दुजोरा दिला नाही, मात्र ते नाकारलंही नसल्यानं तशा शक्यता शाबूत आहेत.
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भूभागाचं नेतृत्व एकेकाळी भारताच्या राजकारणात धुरंधर ठरलेल्या नेत्यांनी केलं आहे.
 
या मतदारसंघाचा थोडक्यात राजकीय इतिहास जाणून घेऊन, त्यानंतर आजची राजकीय समीकरणं आणि मतदारसंघातील समस्या, राजकीय प्रचारातले मुद्दे समजून घेऊ.
 
नाथ पै आणि मधु दंडवतेंचा मतदारसंघाला वारसा
2008 साली लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला.
 
आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात 2009 सालापर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे लोकसभा मतदारसंघ होते.
 
2008 सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेतून या तीन मतदारसंघांचे ‘रायगड’ आणि ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असे दोन मतदारसंघ तयार झाले.
 
यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरला आहे.
 
भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या भूभागावरील या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, तर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी असे विधानसभेचे सहा मतदारसंघ मोडतात.
आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जो भाग येतो, त्या भागाचं 1957 ते 1971 या काळात समाजवादी नेते नाथ पै आणि 1971 ते 1991 या काळात समाजवादी नेते मधु दंडवते यांनी प्रतिनिधित्व केलं होतं.
 
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही 1996 ते 2009 या काळात या भागातून चारवेळा खासदार म्हणून निवडून येत शिवसेनेचं संसदेत प्रतिनिधित्व केलं आहे.
 
इथवर म्हणजे 2009 पर्यंत या मतदारसंघाचं नाव ‘राजापूर’ होतं. 2008 साली पुनर्रचनेनंतर ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असं नामकरण झालं आणि नव्या नावासह झालेल्या 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव करत, काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे हे खासदार बनले.
 
नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या व्रतस्थ राजकारण्यांचा या मतदारसंघाला वारसा आहे. आजही या मतदारसंघातले बुजुर्ग या द्वयींची आदरानं आठवण काढतात. मात्र, वर्तमान राजकारणी पै-दंडवते द्वयींचा वारसा जपतात का, हा प्रश्न इथल्या लोकांना नकारार्थी मान डोलवण्यास भाग पाडतो.
 
आताची राजकीय समीकरणं काय आहेत?
या मतदारसंघातल्या सहा विधानसभा जागांपैकी तीन रत्नागिरी जिल्ह्यात आणि तीन सिंधुदुर्गात येतात. शिवसेनेची ताकद असलेल्या या मतदारसंघात होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानं पक्षात फूट पडल्यानं शिवसेनेची ताकदही ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागली गेलीय.
 
दुसरीकडे, भाजपची ताकद नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशानं वाढली असली, तरी त्या ताकदीलाही मर्यादा आहेत. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे आता भाजपप्रमणित महायुतीतले साथीदार असल्यानं स्वतंत्र भाजपची नसली, तरी महायुती म्हणून ताकद बऱ्यापैकी वाढल्याची दिसून येते.
 
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत गेल्या काही निवडणुकांमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते. मात्र, 2009 साली निलेश राणेंचा विजय वगळता काँग्रेसलाही तिथं काही लक्षणीय कामगिरी करता आली नाहीय. मात्र, यावेळी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोबत असल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत हेच महाविकास आघाडीचे 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसही जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडून, विनायक राऊतांना समर्थन करण्याची शक्यता अधिक आहे.
 
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे चित्र असताना, या दोन्ही गटाची आताची स्थिती कशी आहे, हेही आपण पाहूया.
 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत, तर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत.
 
गेल्या दोन-तीन दशकांपासून कोकणातल्या या भागात शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला दिसतो. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेच्या ताकदीला तडा गेलाय. त्यात लोकसभेची जागा एकनाथ शिंदे शिवसेनेकडे राखतात की भाजप या जागेवरून लढते, यावरही त्यांच्या जय-पराजयचं गणित अवलंबून असेल. कारण शिवसेनेचा मतदार भाजपच्या चिन्हावरील उमेदवाराला स्वीकारतील का, हा एक प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करतात.
 
विनायक राऊतांविरुद्ध तिकीट कुणाला, राणे, चव्हाण, जठार की सामंत?
महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लोकसभेसाठी उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.
 
राष्ट्रवादीने या मतदारसंघात यापूर्वी कधीच निवडणूक लढवली नव्हती आणि काँग्रेसनं नारायण राणे पक्षात असताना निलेश राणेंच्या रुपात खासदार मिळवला होता. नंतर राणे कुटुंबीय भाजपमध्ये गेले आणि त्यामुळे काँग्रेसकडेही या मतदारसंघात ताकद उरली नाहीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत असल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दृष्टीने फायद्याचं गणित झालं आहे.
विनायक राऊत हे 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत इथून खासदार म्हणून निवडून आले. या दोन्हीवेळा ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. आता राऊत उद्धव ठाकरेंसोबत असल्यानं भाजपपासून दूर आहेत.
 
तरीही या लोकसभा मतदारसघांत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्याचा फायदा विनायक राऊतांनी होऊन ते खासदारकीची हॅटट्रिक लगावतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 
दुसरीकडे, विनायक राऊत यांच्या विरोधात इथून भाजपप्रणित महायुतीचा उमेदवार कोण असेल, हे अद्यापही निश्चित नाही. मात्र, उमेदवारांची भाऊगर्दी तेवढी पाहायला मिळतेय.
 
निलेश राणे हे माजी खासदार आहेत, त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील का, हा प्रश्न आहे. 2009 साली काँग्रेसच्या तिकिटावर खासदार बनलेल्या निलेश राणेंचा 2014 आणि 2019 अशा सलग दोनदा विनायक राऊतांनी पराभव केलाय.
 
त्याचसोबत, आता नारायण राणे यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यांना भाजपनं राज्यसभेचं तिकीट दिले नाही, त्यामुळे ते लोकसभेच्या रिंगणात उतरतील का, अशी चर्चा सुरू झालीय.
 
भाजपकडूनच आणखी दोन नावं अधून-मधून डोकं वर काढतात, त्यात एक नाव आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि दुसरं नाव सिंधुदुर्गातील भाजप नेते प्रमोद जठार. मात्र, ही नावंही निवडणूक जवळ येताना मागे पडू लागली आहेत.
 
ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येत असेल, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसं अनेकदा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलूनही दाखवले आहे.
 
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीरपणे प्रकटही केले आहे. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना उमेदवारी देण्यात उदय सामंत यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
 
मतदारसंघातील समस्या काय, प्रचाराचे मुद्दे कोणते?
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्याचा ‘धुरळा’ उडतो आणि तो निवडणूक झाल्यावर निवांत बसतो. यावेळीही हाच मुद्दा येण्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत व्यक्त करतात.
 
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा केवळ प्रचाराचा मुद्दा नाहीय, तो लोकांशी संबंधितही आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे तसाच आहे.
 
उद्योगाचा मुद्दाही या मतदारसंघात महत्त्वाचा आहे आणि प्रचाराच्या केंद्रस्थानी सुद्धा असेल. या संबंधाने बारसू रिफायनरीचा मुद्दा समोर येईल. रिफायनरीला स्थानिक पातळीवर विरोध आहे आणि त्यावर इथले उमेदवार काय भूमिका घेतात, त्यावरून सुद्धा चर्चा होईल.
 
यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छिमारांना येत असलेल्या अडचणी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होऊन समोर आला आहे. शिवाय, पर्यटनाचा मुद्दाही आहेच. कोकणातील पर्यटनाबाबत बरंच बोललं जातं, मात्र पर्यटनाचा व्यवसाय वाढावा, यासाठी आवश्यक सोयीसुविधांची कमतरता इथे आहे. त्यामुळे त्यावर राजकीय पक्ष काही ठोस बोलतात का, यावरही इथल्या लोकांचं लक्ष असेल.
 
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्याशीही बोललो.
 
सतीश कामत म्हणतात, “इथल्या स्थानिक समस्या प्रचारात असतीलच, मात्र नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील की किरण सामंत, यावरही जय-पराजय अवलंबून आहे. शिवाय, शिवसेनेच्या फुटीचा दोन्ही गट कसा प्रचार करतात, यावरही बरंच अवलंबून असेल. कारण शिवसेनेची ताकद या मतदारसंघात मोठी आहे.”
 
तंसच, “या मतदारसंघाच्या भागाचं कधीकाळी नाथ पै, मधु दंडवते अशा दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या भागात हल्लीचे प्रतिनिधी राजकीय व्यासपीठांवरून जी भाषा वापरतात, त्यामुळे दु:ख होतं. आपला राजकीय वारसा इथल्या नेत्यांना पुढे नेता आलं नाही. इतरत्र जी राजकीय संस्कृती दिसते, तीच कोकणात आलीय, असं दुर्दैवानं म्हणावं लागेल,” असंही सतीश कामत म्हणाले.
 
Published By- Priya DIxit