गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (14:25 IST)

बायकोची आणि नवजात बाळाची अंत्ययात्रा त्याने वाजतगाजत काढली, कारण...

photo @shrinath solanki :मी गेल्यानंतर माझी लग्नाच्या वरातीसारखी अंत्ययात्रा काढा, अशी श्रीनाथ यांच्या पत्नीची इच्छा होती.
तिची हीच शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांच्या श्रीनाथ सोळंकी यांनी आपली पत्नी आणि नवजात बाळाची अंत्ययात्रा वाजतगाजत काढली.
 
गुजरातमधल्या जुनागढ शहरात राहणाऱ्या श्रीनाथ आणि मोनिका यांचं 2017 मध्ये प्रेमविवाह झाला. त्यांच्या लग्नाला 5 वर्षं झाली आणि सगळं काही सुरळीत सुरू होतं. आता या दोघांच्या आयुष्यात नवीन पाहुण्याचं आगमनही होणार होतं.
 
डोहाळजेवणाच्या कार्यक्रमानंतर मोनिका या वेरावळ येथील आपल्या माहेरी गेल्या.
 
9 महिन्यांच्या गरोदर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
श्रीनाथ सांगतात, "ती 9 महिन्यांची गरोदर होती आणि त्यामुळे आम्ही गोड बातमीची वाट पाहत होतो. मी माझ्या सासऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की, मोनिका सीरियस आहे आणि आम्ही तिला रुग्णालयात दाखल केलंय. तिला काय झालंय ते आम्हाला कळत नाहीये."
प्रसूतीदरम्यान मोनिका यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर नवजात बालकालाही वाचवू शकले नाहीत. पत्नी आणि नवजात मुलाचा मृत्यू हा श्रीनाथ यांच्यासाठी मोठा धक्का होता.
 
आपली अंत्ययात्रा भव्य आणि धूमधडाक्यात काढावी, अशी मोनिका यांची नेहमीच इच्छा होती. तीच इच्छा सोळंकी कुटुंबीयांनी पूर्ण केली.
 
श्रीनाथ सांगतात,"जेव्हा मी माझा शेवटचा श्वास घेईन तेव्हा अगदी धूमधडाक्यात मला निरोप द्या. एक बॅण्ड बोलवा आणि वाजतगाजत माझी अंत्ययात्रा काढा. यात स्मशानभूमीपर्यंत डान्ससुद्धा करा, असं ती म्हणायची.
 
"ती खूप प्रेमळ होती. कायम आनंदी राहायची. सतत मजा, मस्ती करण्याचा तिचा स्वभाव होता. एकदा ती मला म्हणाली, की आज तुला माझ्या असण्याची किंमत नाहीये, पण मी नसताना तुला माझी किंमत कळेल. मला ते शब्द सहन नाही झाले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला म्हटलं अशा विचित्र गोष्टी बोलू नकोस."
 
"ती मला 'डिअर' म्हणायची. ती एकदा म्हणाली की, डिअर तू का टेन्शन घेतोस? मी जेव्हा माझा शेवटचा श्वास घेईन तेव्हा एक बॅण्ड भाड्याने घ्या. तू अंत्ययात्रेत सगळ्यात पुढे राहा आणि स्मशानभूमीपर्यंत अख्खा रस्ता डान्स करत जा," श्रीनाथ पुढे सांगतात.
मोनिका यांचे कुटुंबीय सांगतात की, ती नेहमी सगळ्यांना मदत करायची. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतरही लोकांना मदत व्हावी यासाठी तिने तिचे डोळे दान केले. एवढंच नाही तर तिच्या मृत्यूनंतर रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं.