जागतिक विक्रम करणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची आणखी एक मोहीम
१५ ऑगस्टला मोहीम ; तिरंगा फडकवून करणार स्वातंत्र्याचा जागर
आपल्या खडतर व साहसी गिर्यारोहण मोहिमांमुळे गाजत असलेल्या गिरिजा लांडगे (१२) हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच अशा माउंट किलिमांजारो या १९, ३४१ फूट उंच (५८९५ मीटर) शिखराला गवसणी घालण्याची मोहिम हाती घेतली आहे. नुकतेच तिने युरोपमधील माऊंट एल्ब्रुस वरील मोहीम यशस्वी केली . आता गिरिजा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षी आफ्रिका खंडातील या सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा जागर करणार आहे.
देशात व आंतरराष्ट्रीयस्तरावर आपल्या अनेक खडतर व साहसी मोहिमा यशस्वी करून सर्वत्र नावारूपाला आलेली तसेच, पिंपरी चिंचवडकरांचा अभिमान असणारी गिरिजा आपल्या वडिलांसोबत रवाना होत आहे. ती 15 ऑगस्टला मोहिम फत्ते करणार असल्याची माहिती तिचे वडील धनाजी लांडगे यांनी दिली.
माउंट किलिमांजारो टांझानिया देशाच्या ईशान्य भागात व केनियाच्या सीमेजवळ असून त्याची उंची (५८९५ मीटर) म्हणजेच १९,३४१ फूट इतकी आहे. यावेळी गिरिजा स्वत:५६४२ मीटर इतकी उंची असणारं युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एल्ब्रुस हे शिखर सर केल्यानंतर गिरिजा तिचे वडील धनाजी लांडगे यांच्या सोबत अवघ्या दहा दिवसातच ५८९५ मीटर ईतकी उंची असणारं आफ्रिका खंडातील सर्वोच्च असं माउंट किलीमांजारो हे शिखर सर करण्यासाठी निघाली आहे.
याबाबत धनाजी लांडगे म्हणाले, गिरिजा दहा दिवसापूर्वी माउंट एल्ब्रुस सर करून परतली. या शिखरापेक्षा वातावरणाची अतिशय वेगळी परिस्थिती माउंट किलीमांजारो या शिखरावर आहे.या शिखरावर पोहोचण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रदेश व तापमानांचा सामना करावा लागतो .प्रथम जंगल आणि पाउस , नंतर वाळवंट सदृश आणि खडकाळ प्रदेश व भाजणार उन , आणि नंतर बर्फाळ शिखर आणि हाडं गोठवणारी थंडी .अशा तीन एकापेक्षा एक विपरीत प्रदेश आणि ऋतुंचा वातावरणांचा सामना करत शिखरावर चढाई करावी लागते . गिरिजाला या सर्व परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
किलीमांजारो या शिखराविषयी…
माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. तो ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.
या मोहिमेत शारिरीक आणि मानसिक कस लागणार आहे . नुकतीच मी माऊंट एल्ब्रुसवरील यशस्वी मोहीम केली. यातून मानसिक ताकद वाढली असून आत्मविश्वास सुद्धा दुणावला आहे .शारीरिक , मानसिक बळ आणि अंगी असलेल्या जिद्द आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षी आफ्रिका खंडातील या सर्वोच्च शिखरावर मी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल हा विश्वास मला आहे.
– गिरिजा लांडगे.
गिर्यारोहक, भोसरी.