शेकडो वर्षांपासून एका खांबाच्या टेकूवर उभे आहे हे मंदिर
चीनच्या फुजियान प्रांतात एक अनोख्या रचनेचे मंदिर आहे. 'गंलू' नावाच्या या मंदिरात जगभरातून मोठ्या संख्येने लोक भेट देतात. मात्र या मंदिरात लोकांना तिथल्या देवतेपेक्षा त्याची रचना पाहण्यामध्ये जास्त रस असतो. त्याचे कारण म्हणजे हे मंदिर शेकडो वर्षांपासून फक्त एका खांबाच्या आधारे उभे आहे. जगातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर आहे. 'गंलू मंदिरा'ची निर्मिती 1146 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून ते एकाच खांबावर उभे आहे. फुजियान प्रांताच्या वायव्येकडील डोंगराळ भागात बनलेले हे मंदिर जमिनीपासून 260 फूट उंचीवर बांधलेले आहे. या मदिरांत भगवान बुद्धाची पूजा होते. त्याबाबत लोकांमध्ये अशी एक धारणा आहे की, ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होतनाही, त्यांनी मंदिरात येऊन भगवान बुद्धांची प्रार्थना केल्यास अपत्यसुख प्राप्त होते. मात्र भगवान बुद्धाची पूजा व दर्शनापेक्षा लोक तिथे या मंदिराला तोलून धरणारा खांब पाहाण्यासाठी येतात. शेकडो वर्षांपूर्वीच्या या मंदिराची निर्मिती 'जे जुकिया' नावाच्या एका व्यक्तीने आपल्या आईच्या स्मृत्यर्थ केली होती. मात्र एवढ्या वर्षानंतरही हे मंदिर लाकडाच्या एका खांबावर कसे काय टिकून राहू शकते, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.