शुक्रवार, 4 जुलै 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 जुलै 2025 (15:14 IST)

नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज

Dilip Prabalkar
देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय… कोकणची लाल माती आणि त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय…. हा अवतार म्हणजेच दशावतार!!!

चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू या आणि अशा अनेकविध भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर सजीव करणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एका नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. “ दशावतार “ या निसर्गरम्य कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या , एका  सस्पेन्स थ्रिलर भव्य चित्रपटात ते अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही वेगळीच भूमिका असून रसिकांना ते पुन्हा आश्चर्यचकित करणार आहेत.

झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला हा चित्रपट आहे.  

या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी  केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे असून कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर ला  हा चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. याची पहिली झलक लवकरच झी मराठीवर रसिकांना पाहायला मिळणार आहे.