इरसाल राजकारणाची भानगड मांडणार 'गाव थोर पुढारी चोर'
राजकारण म्हंटले की त्यातील डावपेच, छक्के-पंजे आणि हेवेदावे ओघाने आलेच. राजकरणाचे सूत्र कधी बदलेल, आणि कोणाच्या खांद्यावर स्वार होऊन कोण कधी सत्ताधारी बनेल याचा नेम नाही! अशा या राजकारणी लोकांच्या इरसाल भानगडीचा आढावा लवकरच 'गाव थोर पुढारी चोर' या आगामी मराठी सिनेमातून घेतला जाणार आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो, खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या पुढाऱ्यांवर निशाणा साधणारा हा विनोदी सिनेमा लोकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार आहे.
'गाव थोर पुढारी चोर' हा सिनेमा मनोरंजनासोबतच राजकीय कर्तव्याची जाणीव देखील प्रेक्षकांना करून देणारा ठरणार आहे. मंगेश मुव्हीज प्रस्तुत या सिनेमात 'पॉलिटीकल' या भारदस्त शब्दाचा अर्थ अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पितांबर काळे यांनी केला आहे. निर्माते मंगेश डोईफोडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. राजकीय वर्तुळातील डावपेच विनोदीशैलीतून मांडणाऱ्या या सिनेमामध्ये दिगंबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुणे आणि दौंड परिसरात या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, येत्या १७ फेब्रुवारीला हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.