शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (17:49 IST)

पावसाळतील माळशेज घाट

माळशेज घाट हा नगर-कल्याण रसत्यावर आहे. मुसळधार पावसातील शहरातील बंदीस्त वातावरण, चिखल, ट्रॅफिक जाम हे सर्व सोडून शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी एखाद्या घाटात यावं असं वाटणं साहजिक आहे. अशा घाटात काही ठिकाणी विशेषत: माळशेज घाटात हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता असते. चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो.
 
हिंदी चित्रपटसृष्टीची दृष्टी आता इकडे वळली आहे. आता काही चित्रपटांचं चित्रीकरण येथे केले जाते. काहींच मते हा परिसर स्वित्झर्लडपेक्षाही प्रेक्षणीय आहे. निळ डोंगर रांगाच वेस्टर्न घाट परिसरातला हा माळशेज घाट मुंबई-पुण्यापासून जवळच आहे. कल्याणहून 86 कि.मी.चा टप्पा दीड-दोन तासात संपतो. कल्याणहून बससेवा उपलब्ध आहे.
 
या स्थळाची लोकप्रियता पाहता परदेशी पर्यटक मुंबईत उतरल्यावर व्यस्त जीवनशैली टाकून सरळ विश्रंतीसाठी माळशेज घाटाकडे वळतात. त्यामुळे मुंबई विमानतळापासून तिथे जाण्यासाठी टॅक्सी सहज मिळते. एकदा काय माळशेज परिसरात आलं की उंचच उंच गिरीशिखरं दिसतात. सर्वात प्रथम मनात भरतो तो इथला हरिश्चंद्र गड. पावसाळ्यात येथे डोंगरातून झरे लागलेले दिसतात. मखमली हिरवळीतून डोकावणारे दगडी डोंगर, त्यातून दुडूदुडू वाहणारे खटय़ाळ झरे, कुठे डोंगरातून थेट अंगावर वर्षाव करणारे झरे. अशावेळी आपल्याबरोबर आलेल्या चिमुरड्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहात असतो. या परिसरात एखादं हनीमून साजरा करण्यासाठी आलेलं जोडपं पाहायला मिळतं. अर्धवतरुळाकार कोकण कडा पाहणं, हरिश्चंद्र गड चढून जाणं, भैरवगडाची कठीण चढण चढून जाणं, कुठे कुठे पावसाळ्यात निसरडय़ा वाटेवरून जाणं असे अनुभव घेता येतात.
 
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गूढ, रम्य डोंगरातून जाणारा नाणेघाट चढणं, गोरखगड चढणं याचा आनंद आगळाच असतो. हे सर्व पाहताना जबरदस्त भूक लागते. न्याहरी करून निघालं तरी पुन्हा भूक लागते. वाटेत हॉटेल्स असतातच असे नाही. त्यासाठी आपल्याबरोबर भरपूर शिदोरी असणं आवश्क आहे. पावसाळत सह्याद्रीच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला कळतं की खरा निसर्ग काय आहे. असं म्हणावंसं वाटतं की माळशेजसारखा नयनरम्य निसर्ग कुठेही नसेल. प्रत्येक पावसाळ्यात भारतातील आणि भारताबाहेरील पर्यटक येथे आवर्जून येतात.