शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

पर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-दोन)

पर्यटनाला नियोजन अचुक करावे लागते. पर्यटनासाठी योग्य ठिकाण व वेळ चुकले तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. 
 
जंगल सफारीला जाताना
अभयारण्यात जाऊन वन्यप्राणी पाहणे किंवा एखाद्या जंगलात फिरायला जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या ठिकाणी जाताना तेथील नियमांची माहिती समजून घेणे आवश्यक असते. याकरिता मित्रांपैकी कुणी या ठिकाणी पूर्वी पर्यटनासाठी गेले असतील तर त्यांच्याकडून किंवा इंटरनेटवरील संबंधित अभयारण्याच्या संकेतस्थळावरून माहिती जाणून घ्यायला हवी. बहुतांश अभयारण्ये ही आठवड्यातून एक दिवस बंद असतात. त्यामुळे त्याची माहिती घ्यायला हवी. तसेच कोणत्या वाहनांचा वापर करावा, कोणत्या वस्तू सोबत घेऊन जाव्यात व कोणत्या घेऊन जाऊ नये, याचे विविध राज्यातील अभयारण्यात वेगळे नियम असतात. ताडोबा किंवा कान्हा अभयारण्यात फिरायला जाताना अभयारण्याच्या वाहनानेच प्रवास करणे अनिवार्य आहे. येथे फिरताना वाहनाच्या खाली उतरणे किंवा जंगलात पायी फिरण्यावर बंदी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटनाला जाताना प्रशासनाच्या अटी व शर्ती मान्य करून तेथील नियमानुसारच वागणे सोयीस्कर ठरते. 
 
निवास व्यवस्था
सर्वांना भेडसावणारी समस्या असते ती निवासव्यवस्थेची. बहुतांश पर्यटनस्थळावर पर्यटक ठराविक काळातच जातात. त्यामुळे या ठिकाणी निवासाची स्वस्त व उत्तम व्यवस्था सहसा उपलब्ध होत नाही. ऐनवेळी मिळेल त्या ठिकाणी निवास करावा लागतो. त्यामुळे ‘मूड ऑफ’ होतो व पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना आधीच नियोजन करून जेथे जायचे आहे तेथे इंटरनेटच्या मदतीने किंवा दूरध्वनीद्वारे निवासव्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असते. आपण ज्या हॉटेलमध्ये किंवा विश्रामगृहात राहणार, त्याबाबतही आधीच माहिती घ्यावी व नंतरच तेथे मुक्काम करावा. सध्या पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल्सची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. 
 
विदेशात पर्यटनाला जाताना
देशात विदेशात पर्यटनाला जाताना करावी लागणारी तयारी पूर्णपणे वेगळी असते. विदेशात पर्यटनाला जाताना त्या देशातील कायदे व नियमांची पूर्ण माहिती घ्यावी. एकदा न्यूझीलंडमध्ये क्रिकेटपटू हरभजन सिंगला पायातील मोजांचा वास आल्यामुळे दीड लाख रूपये दंड झाला होता. त्यामुळे बारीकसारीक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. बहुधा टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित ट्रीपला गेलेले अधिक सोईस्कर असते. 
 
विदेशात पर्यटनाला जाताना आवश्यक वस्तूंची वेगळी व अनावश्यक वस्तूंची वेगळी बॅग करावी. विमानाने प्रवास करताना सोबत असलेल्या बॅगेत कुठल्याची प्रकारच्या लोखंडी किंवा टोकदार वस्तू, काचेच्या बाटल्या नकोत. तसेच ज्या देशात आपण पर्यटनाला जात आहोत तेथील वातावरणानुसार कपडे सोबत घेऊन जायला हवेत.
 
- अंकूश बाहे