1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

तिसरी आघाडी सत्तेचा समतोल राखणार - खोत

राज्यकर्त्यांनी चळवळीत असलेल्या लहान लहान पक्षांचा आतापर्यंत वापर करून घेतला आणि या महाराष्ट्रातील सर्व सामान्य गोरगरीब व शेतकर्‍यांचे शोषण केले. या राज्यकर्त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी विचाराची तिसरी आघाडी स्थापन झाली असून ही आघाडी सत्तेचा समतोल राखणार आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राधेय हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात पहिल्यांदाच डावी आघाडी, परिवर्तन आघाडी आणि रिपब्लिकन ऐक्य एकत्रित येऊन महाआघाडी जनतेसमोर एक पर्याय म्हणून पुढे आली आहे. भाजप-सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी महाराष्ट्रातील जनतेची घोर निराशा केली आहे. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम या आघाडी शासनाने केले आहे. आघाडी शासनाने आतापर्यंत वेगवेगळ्या लहान-लहान चळवळीतील पक्षांना सोबत घेऊन त्यांचीसुद्धा निराशा केली आहे. आघाडी शासन विकासाच्या जरी गप्पा मारत असली तरी मात्र सिंचनाचा दर महाराष्ट्रामध्ये १५ टक्के आहे. या १५ टक्क्यांमध्ये शासनाने फक्त ३ टक्केच सिंचन क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले. सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला गेला आणि यातील पैसा हा बारामती पर्यंत पोहोचला व विदर्भात सिंचन क्षेत्र किंवा सिंचनाचे काम कसे वाढणार? राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये महागाईला जबाबदार हे आघाडी शासन आहे.