1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

महिलांना मतदारसंघातच निवडणूक ड्यूटी

येत्या १३ ऑक्टाबर रोजी होणार्‍या विधानसभा मतदान प्रक्रियेत महसूल कर्मचारी वर्गासह सर्वच महिला कर्मचारी वर्गाची नेमणूक ते राहत असलेल्या मतदार संघ अथवा तालुक्यातच करावी अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. स्त्री कर्मचार्‍यांची केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक करु नये अशीही स्पष्ट सूचना आयोगाने दिली असून त्यामुळे समस्त महिला कर्मचार्‍यांना एक दिलासा दिला आहे.

विधानसभा निवडणूकीची प्रक्रीया पार पाडण्यासाठी महसूल कर्मचार्‍याबरोबरच अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचीही मदत घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणूकीतही अशाच प्रकारे हजारो कर्मचार्‍यांची नेमणूक करुन प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणूकीत शासकीय कर्मचार्‍यांनी आपली भूमिका निष्पक्षपणे पाळावी, यासाठी कर्मचार्‍यांच्या विविध कामांवर नेमणूका करताना आयोगाने अनेक मार्गदर्शक तत्वे घालन दिली होती. कर्मचार्‍याचे मूळ गाव, रहिवास तसेच तो नोकरीस असलेले ठिकाण ज्या मतदारसंघात येत असेल त्याची नेमणूक करण्यात आली होती. अशा प्रकारची नेमणूक करताना आयोगाने स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सरमिसळ पध्दतीने मतदारसंघात व मतदान केंद्रावर कर्मचार्‍यांच्या नेमणूका केल्या होत्या. त्यामुळे कर्मचार्‍यांना आपल्या घरातून शंभर ते दिडशे किलोमीटर अंतरावर जावे लागत होते. त्यातही पुन्हा महिला कर्मचार्‍याची नेमणूक मतदान साहित्य घेऊन मतदान झाल्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना व्हावे लागले होते.

आदिवासी, अतिदुर्गम भागात महिला कर्मचार्‍यांच्या नेमणूका झाल्यामुळे त्यांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागले होते. तसेच सरमिसळ पध्दतीने नेमणूका करण्यात आल्यामूळे काही मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचार्‍याचींच नेमणूक झाली. याबरोबर मतदान प्रक्रीया पार पडल्यानंतर मतदान यंत्र जमा करण्यासाठी या महिला कर्मचार्‍यांना चोवीस तासांपेक्षा अधिक काळ ताटकळत रहावे लागले होते. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून महिला कर्मचार्‍यांची नेमणूक न करता पुरुष कर्मचार्‍याचीच नेमणूक केली जावी, एका केंद्रावर सर्वच महिला कर्मचार्‍यांची नेमणूक करु नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आयोगाच्या या आदेशाच्या आधारे निवडणूक यंत्रणेने महिला कर्मचार्‍याची माहिती मागविण्यास सुरवात केली आहे.

दुर्गम भागातील आणि किमान निवासी व्यवस्थाही नसणार्‍या गावातील मतदान केंद्रात मुक्कामी येणार्‍या महिला कर्मचार्‍यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळेच या निवडणूकीच्या सूचनाबद्दल महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा