मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अर्थातच विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे आणि विलासराव देशमुख ही नावे आघाडीवर आहेत.

आज कॉंग्रेसने झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहात काय असे विचारले असता त्यांनी आपण इच्छुक नसल्याचे सांगितले. मात्र, विलासरावांनी आपली इच्छा जाहिरपणे प्रदर्शित केली नाही. त्याचवेळी कॉंग्रेसच्या विजयाचे श्रेय अशोक चव्हाणांचे आहे, असेही निर्विवादपणे सांगितले नाही. नारायण राणे हेही या पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे पद हातातून निसटल्यानंतर थयथयाट करणार्‍या राणेंनी आता मात्र या पदासाठी सावधपणे मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. त्यासाठी जाहीरपणे कोणतीही इच्छा प्रदर्शित केलेली नाही. पण अशोक चव्हाण हेही या पदासाठी इच्छुक असून आपल्याच नेतृत्वाखाली हा विजय मिळाल्याचे 'भासविण्यास' त्यांनी सुरवात केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी तसा उल्लेखही केला.

निवडणुका महाराष्ट्रात झाल्या असल्या तरी आता मुख्यमंत्रिपदासाठी लढाई दिल्लीत सुरू झाली आहे. त्यासाठी हायकमांडची मनधरणी करण्याचे प्रयत्नही सर्व इच्छुक नेत्यांकडून सुरू झाले आहेत.