मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही- विलासराव

ND
ND
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. देशमुखांच्या या माघारीने अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

देशमुखांनी आज कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न आता हायकमांडच्या पारड्यात असल्याचे सांगितले. देशमुखांच्या या भूमिकेने अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्रिपदावरचा दावा बळकट झाला आहे. जेमतेम दहा महिन्यांची कारकिर्द लाभलेल्या चव्हाणांनी आपण इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले असले तरी निर्णय हायकमांडच घेईल, असे सांगून कॉंग्रेसी संस्कृतीचेच आपण पाईक असल्याचे दाखवून दिले आहे.

त्याचवेळी विलासरावांनी आज घेतलेली माघार चव्हाणांना पुढे चाल देत राणेंना रोखण्याची खेळी असल्याचे मानले जात आहे. या मोबदल्यात देशमुखांचे चिरंजीव व यंदाच आमदार झालेले अमित देशमुख यांना किमान राज्यमंत्रिपद मिळावे ही त्यांची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.